नवे जाहिरात फलक धोरण पुढील दोन आठवड्यात लागू होण्याची शक्यता
नव्या जाहिरात फलक धोरणानुसार, मुंबईत 40 फुटांपेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना परवानगी नाकारण्यात येणार आहे.

Published : November 15, 2025 at 4:23 PM IST
मुंबई – 31 मे 2024 रोजी घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने 16 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर प्रशासनाने मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून नवे जाहिरात फलक धोरण तयार करून लागू करण्याचा निर्णय घेतलाय. आता महापालिकेच्या या नव्या जाहिरात फलक धोरणाची दोन आठवड्यांत अंमलबजावणी होईल, अशी शक्यता महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली असून, नव्या जाहिरात फलक धोरणानुसार, मुंबईत 40 फुटांपेक्षा मोठ्या जाहिरात फलकांना परवानगी नाकारण्यात येणार आहे.
दीड वर्षांनंतरही नवीन जाहिरात फलक धोरणाला अंतिम स्वरूप नाहीच : भोसले समितीच्या 21 निष्कर्षांनुसार होर्डिंगच्या मसुद्यात बदल करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना राज्य मंत्रिमंडळाने महापालिकेला केल्या होत्या. त्या सूचनांमध्ये अनधिकृत होर्डिंग हटवण्याचे आणि त्यावर दंड आकारण्याचे अधिकार पालिकेकडे देण्याची सूचनाही अहवालात करण्यात आली आहे. घाटकोपर येथे 13 मे 2024 मध्ये कोसळलेल्या जाहिरात फलक दुर्घटनेनंतर पालिकेने नवीन फलकांना परवानगी देणे थांबवले असले तरी दीड वर्षांनंतरही नवीन जाहिरात फलक धोरणाला अंतिम स्वरूप मिळालेले नाही.
अंदाजे होर्डिंग्जचे 50 प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत : या दुर्घटनेनंतर 2018 पासून रखडलेल्या नवीन धोरणाचा मसुदा अखेर प्रसिद्ध करून पालिकेने त्यासाठी हरकती आणि सूचना मागविल्या. विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते, हेरिटेज संवर्धन संस्था अशा विविध संघटना तसेच रेल्वे, बीपीटी यासारख्या प्राधिकरणांनी आपली मते नोंदवली आहेत. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेने तातडीने सर्व नवीन परवानग्या थांबवून, जाहिरात फलकांसाठी नवीन धोरण तयार करण्याचा निर्णय घेतला होता. नवीन जाहिरात फलक धोरण लागू न झाल्याने शहरात अंदाजे होर्डिंगचे 50 प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती समोर आली आहे.
प्रत्येक फलकामागे सरासरी 24 लाख रुपये महसूल : मिळालेल्या माहितीनुसार, परवानगी थांबल्यामुळे पालिकेला सरासरी 24 लाख रुपये महसूल प्रत्येक फलकामागे असे मागील दीड वर्षात या बंदीमुळे 16 ते 17 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, त्यामुळे पालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. सध्या पालिकेचे अनेक महत्त्वाचे प्रकल्प सुरू आहेत, त्याकरिता निधीची गरज असल्याने हे नुकसान परवडणारे नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
इमारतींच्या टेरेसवरदेखील होर्डिंग्ज लावण्यास मनाई : नव्या जाहिरात फलक धोरणात 40 फूट आकारापेक्षा मोठ्या होर्डिंग्जला मुंबईत कुठेही परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट म्हटले असून, रस्त्यांवरील कमानी रस्त्यांवरील डिव्हायडर फुटपाथ अंडरग्राउंड हाय व्होल्टेज विद्युत वाहिन्या जिथे असतील त्या भागात होर्डिंग्ज लावण्यास या नव्या जाहिरात फलक धोरणात मनाई करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर इमारतींच्या टेरेसवरदेखील होर्डिंग्ज लावण्यास मनाई असल्याचे या नव्या धोरणात स्पष्ट म्हटले आहे.
पालिका निवडणुकीच्या तोंडावर अंमलबजावणी होणार का? : दरम्यान, भोसले समितीच्या सूचनांचा नवीन जाहिरात धोरणाच्या मसुद्यात अंतर्भाव करून त्या महिनाभरात लागू करण्याच्या सूचना राज्य मंत्रिमंडळाने महापालिकेला दिल्या होत्या. मात्र, पालिकेकडून अद्याप या संदर्भात हालचाली नसल्याने पालिका निवडणुकीच्या तोंडावर याची अंमलबजावणी होणार का? की धोरण पुन्हा लांबणीवर पडणार? हे सध्या विचारले जात आहेत. या संदर्भात आम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, भोसले समितीच्या आवश्यक सूचनांचा अंतर्भाव करून नवीन जाहिरात धोरण तयार आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये आपण त्याच्या अंमलबजावणीची तयारी करत आहोत," अशी प्रतिक्रिया गगराणी यांनी दिली आहे.
हेही वाचाः

