नेपाळ पूर : नाशिक जिल्ह्यातील 50 हून अधिक प्रवासी सुरक्षित, लवकरच परतीचा प्रवास
नेपाळमध्ये आलेल्या भीषण महापुरामुळे नाशिक जिल्ह्यातील 50 हून अधिक पर्यटक काठमांडू आणि सीमाभागात अडकले असून, ते सर्वजण सध्या सुरक्षित ठिकाणी आहेत.

Published : August 29, 2026 at 2:51 PM IST
नाशिक : नेपाळमध्ये आलेल्या जलप्रलयाचा फटका नाशिक जिल्ह्यातील 50 हून अधिक पर्यटकांना बसला आहे. पेठ तालुक्यातील 11, तर पंचवटी येथील 40 प्रवासी नेपाळमध्ये अडकले आहेत. रस्ते बंद झाल्यामुळे सध्या भारतात परतण्याचा मार्ग बंद आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. मात्र, हे सर्व प्रवासी काठमांडू येथे सुरक्षित असून, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन त्यांच्या संपर्कात आहेत. "नेपाळमधील पर्यटकांना लवकरच नाशिकला घेऊन येऊ," असा विश्वास मंत्री महाजन यांनी पर्यटकांना दिलाय.
परतीचा मार्ग मोकळा होण्याची प्रतीक्षा : मिळालेल्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील 11 जणांचा गट खासगी ट्रॅव्हल्सद्वारे गोरखपूरमार्गे नेपाळ पर्यटनासाठी गेला होता. या गटात विशाल शिंदे, रूपेश घोंगे, अर्जुन शिंदे, रोहित शिंदे, अभिषेक पवार, आकाश कोतुळकर, ओम शिंदे, पीयूष शिंदे, आयुष शिंदे, करण शिंदे आणि शुभम शिंदे यांचा समावेश आहे. हे सर्वजण सध्या काठमांडू येथे अडकल्याची माहिती मिळाली आहे; तर पंचवटीतील 40 नागरिक नेपाळमध्ये अडकले आहेत. हे नागरिक इंडो-नेपाळ ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून नेपाळ पर्यटनासाठी गेले होते. सध्या ते भारत-नेपाळ सीमेवर असून, परतीचा मार्ग मोकळा होण्याची प्रतीक्षा करीत आहेत.
जलप्रलयामुळे ठिकठिकाणी रस्ते आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे परतीचे मार्ग बंद झाले आहेत. या पर्यटकांचा परतीचा प्रवास गुरुवारी दि. 27 रोजी नियोजित होता; मात्र, त्यापूर्वीच निर्माण झालेल्या आपत्तीमुळे त्यांचा परतीचा प्रवास खोळंबला आहे. भारतात परतण्यासाठी आवश्यक रस्ते आणि वाहतूक व्यवस्था पूर्ववत होण्यास अजून काही दिवस लागू शकतात, अशी माहिती आहे.
''दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही बचावलो'' : ''मनकामना देवीचं दर्शन घेऊन पुढील प्रवासासाठी निघाल्यानंतर, अवघ्या दोन तासांतच नेपाळमध्ये जलप्रलयाची परिस्थिती निर्माण झाली. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे सर्वत्र भीतीचं वातावरण निर्माण झाले होतं; मात्र, वेळीच सुरक्षित ठिकाणी पोहोचल्यानं मोठा अनर्थ टळला. दैव बलवत्तर म्हणूनच आम्ही बचावलो आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचलो," अशी माहिती अर्जुन शिंदे यांनी दिली.
''डोळ्यांसमोर नदीच्या पाण्याची पातळी वाढली'' : "श्री दत्त मंदिर देवस्थानच्या वतीनं आम्ही 190 प्रवासी 14 ऑगस्ट रोजी दत्तगुरूंच्या पादुकांसोबत नाशिकहून नेपाळला यात्रेला निघालो होतो. नेपाळची राजधानी काठमांडू येथे पोहोचल्यावर पशुपतीनाथाचे दर्शन घेतलं आणि 'पशुपती फ्रंट' या हॉटेलमध्ये आमचा मुक्काम होता. हे हॉटेल ज्या नदीला महापूर आला, अगदी तिच्या काठावर, पात्रापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर आहे. आमच्या डोळ्यांसमोर नदीच्या पाण्याची पातळी वेगानं वाढत होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तातडीनं तेथून सुरक्षित स्थळी निघण्याचा निर्णय घेतला," असं भूषण काळे यांनी म्हटलं.
हेही वाचा -

