ETV Bharat / state

शिर्डीला जागतिक धार्मिक पर्यटन केंद्र बनवण्यासाठी सक्षम विश्वस्त मंडळाची गरज; भाविकांसह ग्रामस्थांची मागणी

शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातील लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. शिर्डीला जागतिक पर्यटन केंद्र बनवण्यासाठी सक्षम विश्वस्त मंडळाची गरज असल्याची मागणी भाविकांसह ग्रामस्थांनी केली आहे.

SHIRDI SAIBABA SANSTHAN
शिर्डी साईबाबा (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : December 12, 2025 at 2:31 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी : श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबा हे देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचं श्रद्धास्थान आहे. दरवर्षी कोट्यवधी रुपयांची देणगी भाविकांकडून साई संस्थानला मिळते. या प्रचंड निधीचा योग्य वापर झाला तर शिर्डीचे रूपांतर जागतिक दर्जाच्या धार्मिक पर्यटन केंद्रात होऊ शकते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून साई संस्थानवर विश्वस्त मंडळ नसल्यानं अनेक विकासकामं रखडली असून, निधी असूनही प्रकल्प ठप्प पडल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे.

यामुळं वर्षानुवर्षे थांबल्या अनेक योजना : सध्या साईबाबा संस्थानचा कारभार उच्च न्यायालयाच्या देखरेखीखालील तात्पुरत्या तदर्थ समितीकडं आहे. या समितीत जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी असे मर्यादित सदस्य आहेत, त्यांना केवळ दैनंदिन प्रशासकीय कामकाजाचा अधिकार आहे. मोठ्या प्रकल्पांबाबत निर्णय घेण्याचे अधिकार नसल्यानं अनेक योजना वर्षानुवर्षे थांबल्या आहेत.

सहा वर्षापासून एकही योजना साकारली नाही : साईबाबा संस्थानच्या लेझर शो गार्डन, साई वॅक्स म्युझियम, होलिओग्राफिक शो, साई नॉलेज पार्क, साई प्लॅनेटोरियम, सायन्स पार्क, डान्सिंग फाउंटन, स्काय वॉक, स्टार गेजिंग गॅलरी, साई आयएएस अकॅडमी तसंच कॅन्सर हॉस्पिटल आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या विस्तारासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प लालफितीत अडकले आहेत. या सर्व प्रकल्पांना तत्कालीन अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या समितीने मान्यता दिली होती. मात्र गेल्या सहा वर्षांत एकही योजना प्रत्यक्षात साकारलेली नाही.

अनेक कारणांमुळं नागरिकांमध्ये नाराजी : शिर्डी ग्रामस्थ आणि भाविकांना अपेक्षा होती की, साई संस्थानकडून रुग्णालयांचा दर्जा उंचावेल, नव्या सुविधा उभारल्या जातील आणि पर्यटन व्यवस्थेत आधुनिकता येईल. मात्र सध्याच्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या समस्या, सुविधांचा अभाव आणि विकासकामांचा वेग यामुळं नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

निधी फक्त कागदोपत्री योजनांपुरताच मर्यादित : राज्य सरकारनं तातडीनं साई संस्थानवर कायदेशीर चौकटीतील निर्णयक्षम विश्वस्त मंडळाची स्थापना करावी, अशी मागणी होत आहे. सक्षम मंडळ स्थापन झाल्यास निधीचा योग्य वापर होईल. भाविकांसाठी सुविधा वाढतील तसंच शिर्डी शहराच्या सर्वांगीण विकासालाही नवी दिशा मिळेल. विश्वस्त मंडळ आल्यानंतरच साई संस्थानचा निधी योग्यरीत्या वापरात येईल आणि शिर्डीतील अर्थकारणाला नवसंजीवनी मिळेल. अन्यथा लाखो भाविकांच्या अपेक्षा आणि श्रद्धेनं अर्पण केलेला निधी फक्त कागदोपत्री योजनांपुरताच मर्यादित राहील.

संस्थानच्या विश्वस्त मंडळाची स्थापना होणं गरजेचं : नाशिक इथं होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात शिर्डीचा समावेश करून भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या पार्श्वभूमीवर साईबाबा संस्थानवर विश्वस्त मंडळाची स्थापना होणं गरजेचं आहे. भाविकांच्या सुविधा, रुग्णालयांचा विस्तार आणि पर्यटनवाढीसाठी दीर्घकालीन नियोजन करायचे असल्यास स्थिर आणि सक्षम विश्वस्त मंडळ गरजेचं आहे.

नवीन विश्वस्त मंडळाची रचना करण्याची मागणी : या मंडळात स्थानिक नागरिकांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, जेणेकरून शिर्डीच्या वास्तव गरजांची पूर्तता होईल आणि स्थानिक विकासाला न्याय मिळेल. यासाठी 2004 च्या साई संस्थान नियमावलीत आवश्यक दुरुस्त्या करून नवीन विश्वस्त मंडळाची रचना करण्याची मागणी होत आहे. विश्वस्त मंडळाला कायदेशीर स्थैर्य मिळालं तर साई संस्थानचा निधी योग्य नियोजनातून वापरता येईल आणि शिर्डीचं रूपांतर खऱ्या अर्थानं जागतिक धार्मिक पर्यटन केंद्रात होईल.

हेही वाचा :

  1. विधिमंडळ परिसरात माहितीचा खजिना! ‘लोकराज्य’च्या 1964 वर्षांपासूनच्या निवडक दुर्मीळ अंकांचे प्रदर्शन
  2. उद्योग पतंगांचा! अनेक कुटुंबं करतात पतंग बनवण्याचं बारमाही काम, पण महागाईमुळं करावा लागतोय अडचणींचा सामना
  3. रंगांतून सांगितलेला भारताचा जिवंत इतिहास; 'क्रिशन खन्ना' सामाजिक स्थित्यंतराचा साक्षीदार कलाकार