सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा पराभव, दिवेआगार ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ता गेली
रायगडच्या दिवेआगारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बालेकिल्ल्यातच पक्षाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

Published : April 29, 2026 at 8:31 PM IST
रायगड : जिल्ह्यातील 18 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार ग्रामपंचायत विशेष चर्चेत आली आहे. मंत्री आदिती तटकरे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या भागात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिवेआगर विकास आघाडीचे विजय तोडणकर हे सरपंचपदी विजयी झाले असून, त्यामुळे दिवेआगर ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीविरोधी सत्ता स्थापन झाली आहे.
यापूर्वीच म्हसळा नगरपंचायत आणि श्रीवर्धन नगरपालिका निवडणुकांमध्येही राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता दिवेआगर ग्रामपंचायतीतील पराभवामुळे श्रीवर्धन मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलत असल्याचं चित्र दिसत आहे.
'हुकूमशाही राजकारणाला स्थान नाही' : नवनिर्वाचित सरपंच विजय तोडणकर यांनी, मनमानी आणि हुकूमशाही राजकारणाला स्थान नसल्याचं स्पष्ट करत, स्थानिक पातळीवर बदलाची सुरुवात झाल्याचं मत व्यक्त केलं.
विशेष म्हणजे, दिवेआगर ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकरांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
'तटकरेंच्या राजकीय परतीचा प्रवास सुरू' : दिवेआगर ग्रामपंचायतीत सरपंचपदी विजयी झालेल्या विजय तोडणकर यांचं अभिनंदन करताना घोसाळकरांनी सुनील तटकरे यांचा राजकीय परतीचा प्रवास सुरू झाल्याचा दावा केला. तसंच श्रीवर्धन मतदारसंघात परिवर्तनाची लाट सुरू झाली असून, तटकरेंना हद्दपार करून पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राजकारण तापणार : दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात सलग होणाऱ्या पराभवांमुळे स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये बदल होत असल्याचं चित्र आहे. दुसरीकडे शिवसेना पुरस्कृत आघाडीचा प्रभाव वाढत असल्याचं चित्रही स्पष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन मतदारसंघातील राजकारण पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा

