ETV Bharat / state

डी कंपनीच्या ड्रग्ज तस्करीचा कणा सलीम डोलाला आणलं मुंबईत: गुरूवारी एनडीपीएस कोर्टात करणार हजर

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज साम्राज्याची धुरा सांभळणाऱ्या सलीम डोलाला बुधवारी सायंकाळी मुंबईत आणण्यात आलं. डोलाला उद्या सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

NCB Brings Salim Dola to Mumbai
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 29, 2026 at 10:33 PM IST

|

Updated : April 30, 2026 at 9:52 AM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज साम्राज्याची धुरा सांभळणाऱ्या सलीम डोला (59) ला बुधवारी सायंकाळी मुंबईत आणण्यात आलं. एनसीबीचे अधिकारी गुरूवारी त्याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनडीपीएस कोर्टात हजर करून त्याची रिमांड घेणार आहेत. गेल्या अनेक दशकांपासून तपास यंत्रणांना गुंगारा देत असलेल्या सलीम डोलाला टर्कीत अटक झाल्यानंतर त्याला भारतीय तपासयंत्रणांच्या हवाली करण्यात आलं. अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक सबस्टन्स कायद्यांतर्गत त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया भारतीय तपास यंत्रणांनी पूर्ण केली. त्यानंतर त्याला दिल्लीत आणण्यात आलं, तिथं पटियाला कोर्टात हजर करून त्याची दोन दिवसांची ट्रानझिट रिमांड घेण्यात आली.

इस्तंबूलमध्ये झाली सलीम डोलाला अटक : भारतातील अनेक गुन्ह्यांमध्ये सलमी डोला हा फरार गुन्हेगार आहे. अमली पदार्थ तस्करी प्रकरणातच सलीम डोला याला टर्कीची राष्ट्रीय गुप्तचर संस्था आणि स्थानिक पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेतलं होतं. डोला हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत जवळचा सहकारी असून तो भारतासह परदेशात होणाऱ्या अमली पदार्थ तस्करीच्या जाळ्यातील एक मुख्य समन्वयक होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि अनेक राज्यांतील पोलीस पथकांकडून करण्यात आलेल्या तपासादरम्यान अमली पदार्थ तस्करीच्या अनेक प्रकरणांमध्ये त्याचं नाव समोर आलंय.

सलीम डोलाला आणलं मुंबईत (ETV Bharat)

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करीतील मोठा मासा : गेल्या काही वर्षांपासून नार्कोटीक्स एजन्सीच्या रडारावर असलेल्या डोलाचे संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्ज कार्टेल्सशी जोडलेले आहेत. साल 1998 मध्ये मुंबई विमानतळावर 40 किलो मँड्रॅक्ससह डोलाला पहिल्यांदा अटक झाली होती. मिर्चीनंतर डी-कंपनीच्या अमली पदार्थांशी संबंधित सारा व्यवहार डोलाच सांभाळत होता. ड्रग्ज शिवाय 1 हजार कोटी रूपयांचा फेंटॅनिलचा साठा आणि डीआरआय तपास करत असलेल्या गुटखा तस्करीच्या प्रकरणातही त्याचं नाव समोर आलं. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं सलीम डोलाची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केलं होतं.

कोण आहे सलीम डोला : सलीम डोला हा प्रामुख्यानं मेफेड्रोन (MD) उत्पादन करणारा दाऊद इब्राहिमचा मुख्य हस्तक म्हणून ओळखला जातो. मूळचा डोंगरीचा रहिवासी असलेला डोला हा सुमारे 10 वर्षांपूर्वी भारतातून पसार झाला, तेव्हापासून तो परदेशातूनच आपले सारे काळे धंदे चालवत होता. डोला हा परदेशातून अनेक देशांत पसरलेल्या अमली पदार्थांचं नेटवर्क चालवत होता. साल 2024 मध्ये मुंबई गुन्हे शाखेनं कुर्ल्यातून 4 किलो एमडी जप्त केल्यानंतर, या प्रकरणात डोला याचा सहभाग उघड झाला होता. पुढील तपासात सांगली ते सूरतपासून व्हाया युएई आणि टर्कीपर्यंत पसरलेली साखळी उघड झाली होती. डोला हा परदेशात बसूनच आपल्या हस्तकांमार्फत हे सार ड्रग्ज ऑपरेशन चालवत होता. गेल्या वर्षी इंटरपोलच्या माध्यमातून त्याचा मुलगा ताहेर आणि पुतण्या मुस्तफा मोहम्मद कुब्बावाला यांना युएईतून हद्दपार करण्यात आलं. तेव्हापासून डोलाचं नेटवर्क काहीसं कमकुवत झाल्याचा दावा केला जात होता.

हेही वाचा :

  1. दाऊद इब्राहिम मोठा झटका! साथीदार सलीम डोलाला इस्तंबूलहून भारतात आणलं
  2. दाऊदशी संबंधित जमिनीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिकांना आरोप अमान्य, खटल्याची दैनंदिन सुनावणी जानेवारीपासून
  3. किंमत 30 टक्क्यांनी कमी करूनदेखील दाऊदची मालमत्ता घ्यायला कुणी तयार होईना; लिलावात शून्य प्रतिसाद
Last Updated : April 30, 2026 at 9:52 AM IST