ETV Bharat / state

'नसरापूर प्रकरणातील आरोपीच्या फाशीची तातडीनं अंमलबजावणी करा', उद्धव ठाकरेंची मागणी, मुख्यमंत्र्यांबद्दल केलं मोठं विधान

नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपीच्या फाशीची तातडीनं अंमलबजावणी करा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

uddhav thackeray Nasrapur case verdict
शिर्डीत माध्यमांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 29, 2026 at 5:28 PM IST

|

Updated : June 29, 2026 at 5:58 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी - नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपीला पुणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. घटनेच्या अवघ्या दोनच महिन्यात न्यायालयाने निकाल देत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालावर शिवसेना - उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. "नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपीच्या फाशीची तातडीनं अंमलबजावणी करा," अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

"नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला कोर्टाने फाशीचीच शिक्षा सुनावली पाहिजे, अशी संपूर्ण महाराष्ट्राची भावना होती. कोर्टाने या प्रकरणात योग्य आणि महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मात्र, केवळ निर्णयावर समाधान न मानता या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली पाहिजे," अशी आग्रही मागणी शिवसेना - उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीत प्रसार माध्यमांशी बोलताना केली.

शिर्डीत माध्यमांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे (ETV Bharat Reporter)

तारीख पे तारीख नको, तत्काळ कारवाई व्हावी - न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना उद्धव ठाकरे यांनी विलंबाच्या प्रक्रियेवर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, "जर या निर्णयावर पुन्हा अपील, त्यावर तारीख पे तारीख असं चक्र सुरूच राहिलं, तर या प्रकरणाची मोठी पंचायत होईल आणि पीडितेला न्याय मिळण्यास उशीर होईल. कोर्टाने सर्व बाजू आणि पुरावे तपासूनच हा निर्णय दिला आहे. त्यामुळे आता वेळ न दवडता या नराधमाला तातडीने फाशी देण्यात यावी, तरच गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण होईल. अशा प्रकारच्या क्रूर गुन्ह्यांमध्ये जर तातडीने कठोर कारवाई झाली तरच समाजात वावरणाऱ्या इतर नराधमांच्या मनात कायद्याचा आणि शिक्षेचा धाक निर्माण होईल."

विरोधकांवर जोरदार निशाणा - संसदेत कोणतेही विधेयक किंवा बिल मंजूर करताना केंद्र सरकारने विरोधकांशी कोणताही समन्वय साधला नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. "आम्ही विरोधी पक्षात असलो तरी जनतेचे प्रतिनिधी आहोत. कोणताही कायदा आणण्यापूर्वी प्रमुख पक्षांच्या नेत्यांना बोलावून त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या पाहिजेत. आज तुम्ही सत्तेत आहात, उद्या आम्ही असू," असे सांगत त्यांनी लोकशाहीत समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.

फडणवीसांच्या पंतप्रधान पदाच्या स्वप्नांवर वक्तव्य - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय भवितव्याबाबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मोठे वक्तव्य केले. "कोणताही महाराष्ट्रीयन माणूस जर पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहत असेल तर त्यात काही गैर नाही. पूर्वी नितीन गडकरी यांचे नाव चर्चेत होते. आता देवेंद्र फडणवीस हा एक चांगला चेहरा समोर येत आहे. त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा आहे, असे माझ्या कानावर आले आहे," असे ठाकरे म्हणाले.

फडणवीसांच्या करिअरची मनापासून काळजी वाटते - उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, "संघाचा पाठिंबा असलेला माणूस या शर्यतीत येऊ नये म्हणून त्यांच्याविरुद्ध काही कारस्थान सुरू आहे का? आणि त्यामध्ये शहा-सेना म्हणजेच मिंधे गट त्यांची सुपारी घेऊन काम करत आहे का? अशी शंका येते, म्हणूनच मला देवेंद्र फडणवीस यांच्या करिअरची मनापासून काळजी वाटते."

पक्षात मोठी फूट पडल्याने नकारात्मक वातावरण आहे का? या प्रश्नावर उत्तर देताना ठाकरे यांनी हे वृत्त फेटाळून लावले. "लोक पक्ष सोडून गेलेले नाहीत. उलट गद्दारीमुळे संतापलेले कार्यकर्ते अधिक जिद्दीने कामाला लागले आहेत. जे लोक कंटाळून गेले होते ते पुन्हा पक्षात सक्रिय होत आहेत," असे ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना ते म्हणाले, "माझे सरकार पाडण्यासाठी 40 आमदार फोडण्यात आले. त्यानंतर अवघ्या 15 दिवस आधी मिळालेल्या नवीन चिन्हावर आणि बाळासाहेबांच्या चेहऱ्यावर आम्ही निवडणूक लढवली. काही लोकांना वारंवार आपला बाप बदलावा लागतो. कधी दिल्लीत तर कधी इतर कुठे फोटो वापरावे लागतात. आम्ही मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोच्या आणि नवीन चिन्हाच्या जोरावर निवडणूक लढवून शिवसेनेचे 9 खासदार निवडून आणले."

हेही वाचा -

  1. नसरापूर प्रकरणात न्याय मिळाला, मुख्यमंत्र्यांचं कौतुक; आता संतोष देशमुख प्रकरणी तोच नियम लावा, मनोज जरांगेंची भूमिका
  2. भाजपा आता भारतीय नव्हे तर पाकिस्तान जनता पार्टी; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
  3. फुटीर खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे हुंकार भरणार, फडणवीस अन् ठाकरे एकाच विमानात बसल्यानं चर्चांना उधाण
Last Updated : June 29, 2026 at 5:58 PM IST