ETV Bharat / state

नसरापूर प्रकरणातील आरोपीला शिवकालीन 'चौरंग' शिक्षा द्या, अभिनेता रितेश देशमुख संतप्त

नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावर अभिनेत्रा रितेश देशमुखनं संतप्त प्रतिक्रिया दिली.

Actor Riteish Deshmukh
माध्यमांशी संवाद साधताना अभिनेता रितेश देशमुख (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 3, 2026 at 3:45 PM IST

|

Updated : May 3, 2026 at 4:10 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

पुणे - भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची तीव्र लाट उसळली आहे. या घटनेबाबत अभिनेता रितेश देशमुख याला विचारलं असता तो म्हणाले, "अशा घटना जेव्हा घडतात, तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या शिक्षेची नराधमांचा 'चौरंग' करण्याची आठवण येते. अशा गोष्टीचा खूप राग येतो. विकृत मानसिकतेच्या लोकांमध्ये कायद्याचा प्रचंड दरारा असणं गरजेचं आहे."

माध्यमांशी संवाद साधताना अभिनेता रितेश देशमुख (ETV Bharat Reporter)

छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला अत्याचार प्रकरणी दिलेली अत्यंत कठोर शिक्षा म्हणजे 'चौरंग शिक्षा'. यामध्ये दोषीचे हात आणि पाय (कोपरापासून आणि गुडघ्यापासून) कलम केले जात, जेणेकरून तो आयुष्यभर अपंग होऊन आपल्या कृत्याचा पश्चाताप करेल. हा शिवकाळातील स्त्री सुरक्षेसाठीचा एक ऐतिहासिक न्याय होता.

Actor Riteish Deshmukh
अभिनेता रितेश देशमुखनं घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन (ETV Bharat Reporter)

रितेश देशमुखनं घेतलं गणरायाचं दर्शन - अभिनेता आणि दिग्दर्शक रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून, या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. रितेश देशमुखनं रविवारी पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात येऊन बाप्पाचं दर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्याने नसरापूर घटनेवरुन संताप व्यक्त केला.

तातडीनं कठोर शिक्षा झाली पाहिजे - "नसरापूरसारखी घटना जेव्हा घडते तेव्हा राग हा येतोच. आपल्याकडं कायदे आणि संविधान आहे. पण, अशा प्रकरणांमध्ये निर्णय लवकरात लवकर लागणं महत्त्वाचं आहे. फास्ट ट्रॅक कोर्टाच्या माध्यमातून गुन्हेगारांना तातडीनं कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून कोणाचीही अशी कृती करण्याची हिंमत होणार नाही. पोलीस आणि सरकारनं यावर रोखठोक कारवाई करावी," अशी मागणी रितेश देशमुख यानं केली.

Actor Riteish Deshmukh
अभिनेता रितेश देशमुखनं घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन (ETV Bharat Reporter)

आरोपीला पोलीस कोठडी - भोर तालुक्यातील नसरापूर येथे शुक्रवारी घडलेल्या साडे तीन वर्षाच्या चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी वेगवान कारवाई करत अवघ्या दीड तासात आरोपीला अटक केल्याची माहिती समोर आली. या घटनेनं संपूर्ण जिल्हा हादरला असतानाच पोलिसांच्या तत्परतेमुळं आरोपी लवकर पकडला गेल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणातील आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 7 मेपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. यानंतर आरोपीला न्यायालयातून पोलीस स्टेशन येथे घेऊन जाताना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आरोपीला मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Actor Riteish Deshmukh
अभिनेता रितेश देशमुखनं घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन (ETV Bharat Reporter)

पुण्यात आल्यावर बाप्पाचं दर्शन घेणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. माझे वडील (विलासराव देशमुख) दरवर्षी येथे यायचे, तीच परंपरा मी आणि देशमुख कुटुंब पुढे चालवत आहोत. चित्रपटाच्या यशाबद्दल आभार मानण्यासाठी मी येथे आलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांचे संस्कार आपल्या मुलांना कळावेत यासाठी पालकांनी हा चित्रपट नक्की दाखवावा. महाराजांच्या राज्यात स्त्रियांचा सन्मान आणि न्याय कसा असायचा हे आजच्या पिढीला समजणं अत्यंत आवश्यक असल्याचं यावेळी रितेश देशमुख म्हणाला.

हेही वाचा -

  1. 'आरोपीला कठोर शिक्षा देणार', उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट, नागरिकांनी मुंबई-बंगळुरु महामार्ग अडवला
  2. नसरापूर अत्याचार हत्या प्रकरणातील आरोपीला 7 मेपर्यंत पोलीस कोठडी, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आरोपीला मारहाणीचा प्रयत्न
Last Updated : May 3, 2026 at 4:10 PM IST