नाशिकच्या चांदीला पेशवेकालीन इतिहास, शुद्धतेमुळं जगभरात प्रसिद्ध, दरवर्षी पाचशे कोटींची उलाढाल!
नाशिकच्या चांदीचे वैशिष्ट्य म्हणजे चांदीची भांडी घडवितांना मिळणारी धातूची शंभर टक्के शुद्धता.

Published : February 19, 2026 at 4:47 PM IST
|Updated : March 9, 2026 at 9:45 AM IST
नाशिक : नाशिक हे धार्मिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वसा लाभलेलं शहर आहे. याशिवाय, आल्हाददायक वातावरण, द्राक्ष, कांदा आणि वाईनसाठी नाशिक जसं प्रसिद्ध आहे, तसंच नाशिक हे चांदीसाठी देखील प्रचलित आहे. नाशिकच्या चांदीला पेशवेकालीन इतिहास आहे. शुद्ध चांदीवर कुशल कारागिरांनी केलेलं नक्षीकाम, यामुळं देशात नाही तर परदेशातून देखील मोठी मागणी आहे. नाशिकमध्ये चांदीच्या विक्रीतून दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल होते. चांदीची भांडी बनवणारी अनेक शहरे आहेत. पण चोख टंचाची (वस्तूतील चांदीचं प्रमाण) भांडी म्हटलं की, नाशिक हे नाव हमखास समोर येतं. नाशिकच्या चांदीचे वैशिष्ट्य म्हणजे चांदीची भांडी घडवितांना मिळणारी धातूची शंभर टक्के शुद्धता. त्यामुळंच नाशिकच्या चांदीने स्वत:चं असं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
पाचशे कोटींची उलाढाल होते : चांदीच्या वस्तूंनी केवळ ताट, वाटी, तांब्या, पूजेसाठी वापरली जाणारी भांडी इतकंच नाही, तर कलाकुसरीच्या आणि हस्तकलेतही किमया करून दाखविली आहे. नाशिक घाटाची भांड्यांवरील घडणावळ, नक्षीकाम हे वेगळेपण नाहीतर या वेगळेपणाला जगभरात ओळख मिळाली आहे. शुद्ध चांदीची भांडी आणि मूर्ती हे नाशिकच्या कुशल कारागिरांचे वैशिष्ट्य आहे. या भांड्यांना आणि मूर्तींना देशभरातून मागणी असल्यामुळं दरवर्षी नाशिकमध्ये चांदीची सुमारे पाचशे कोटी रुपयांची उलाढाल होते.
नाशिकला चांदीचा इतिहास : नाशिकला हजारो वर्षांची पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. येथील धार्मिक स्थळे पाहिल्यावर पुरातन काळाचे महत्व कळतं. त्यासोबतच नाशिकच्या व्यापार उद्योगाचा इतिहासही अतिशय प्राचीन आहे. विविध प्रकारचे व्यवसाय. सोबतच सोने-चांदी व रत्ने यांचाही व्यवसाय इथं शेकडो वर्षापासून सुरू आहे. पेशवे काळात नाशिकला उपराजधानीचा दर्जा मिळाल्याने 1725 नंतर नाशिकची प्रगती झाली. हाच काळ नाशिकच्या सरासरी व्यवसायिकाला पोषक ठरला. याच काळात नाशिकचा सराफ व्यवसाय जोमाने वाढला. परंपरागत सोन्याच्या दागिन्यांबरोबरच चांदीची भांडी व इतर वस्तूचे उत्पादन इथं होऊ लागले. यातूनच नाशिक हे शुद्ध चांदीची बाजारपेठ म्हणून आज देशभरात नावारूपाला आलं आहे. नाशिकमध्ये आज 40 हून अधिक चांदीचे कारखाने आहेत. यातील अनेक चांदीचे कारखाने हे शंभर वर्षांपूर्वीचे आहेत.

देवी-देवतांच्या भरीव मूर्ती : नाशिकमधील आणखी एक मोठं उत्पादन म्हणजे धातूंच्या ओतीव मूर्ती. येथील बाजारपेठेत ओतीव काम करून देवी-देवतांच्या भरीव मूर्ती तयार केल्या जातात. दरम्यान, येथील कारागिरांनी संत निवृत्तीनाथांचा रथ हा संपूर्ण चांदीचा बनला आहे. हा रथ 230 किलो चांदीमध्ये बनला आहे. तसंच पंढरपूरमधील उत्सव मूर्ती, सप्तशृंगी देवीचा गाभारा, नाशिकच्या कालिका मंदिराच्या गाभारा, शिर्डी येथील मंदिरातील चांदीचे खांब, फ्रान्समधील प्रती शिर्डी मंदिराचा मुख्य दरवाजा नाशिकच्या कारागीरांनी घडवला आहे.

पाच पिढ्यांपासून व्यवसाय : "शुद्ध चांदीपासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा व्यवसाय आम्ही गेल्या पाच पिढ्यांपासून करत आहोत. शुद्ध चांदीच्या भांड्याला नाशिकसह देशात आणि विदेशात देखील मोठी मागणी आहे. सध्या चांदीचे भाव जरी जास्त असले, तरी मागणी मोठ्या प्रमाणात आहे. आम्ही चांदीचे नक्षीकाम करतो. आम्ही शिर्डीला मोठं चांदीचे सिंहासन बनवलं आहे. बालाजी मंदिरात मोठी समई बनवली आहे. तसंच चांदीचे घंगाळे, पिंप, समई, कन्यादानासाठी लागणारी पाच भांडी तयार करत असतो," असं चांदीचे कारागीर संजय जुन्नरकर यांनी सांगितलं.

मागणी जास्त, पुरवठा कमी : "जागतिक चांदीचे प्रमुख उत्पादक देश मेक्सिको, पेरू आणि चीन यांच्यातील खाण क्षमतेत घट झाल्याने चांदीचा पुरवठा मर्यादित झाला आहे. नवीन खाणी सापडण्याचा दर कमी झाला असून जागतिक स्तरावर तुटवडा निर्माण झाला आहे. पुरवठा कमी आणि मागणी प्रचंड असं समीकरण झालं आहे. त्यामुळं किंमती वाढल्या आहेत. आजचा दर फक्त सुरुवात असून पुढील वाढ अजून दीर्घकालीन व स्थिर राहण्याची शक्यता आहे," असं चांदी विश्लेषक चेतन राजापूरकर यांनी म्हटलं आहे.


चांदीत गुंतवणूक फायदेशीर : "शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि क्रिप्टोकरन्सी यासारख्या गुंतवणुकीत जोखीम जास्त असते. बाजार भावातील चढ-उतारांमुळे परताव्याचा अंदाज करणं कठीण असतं. त्याच्या उलट चांदी ही सुरक्षित आणि प्रत्यक्ष गुंतवणूक आहे. ग्राहकांनी कागदी गुंतवणूकीऐवजी प्रत्यक्षात चांदीच्या स्वरूपात बिस्किटे, नाणी किंवा वजनदार बार खरेदी करावी. यामुळं गुंतवणुकीवर पूर्ण नियंत्रण राहते आणि भविष्यात किंमत वाढल्यास विक्री करून नफा मिळवता येतो. घरात साठवलेली चांदी म्हणजे भविष्याचा हमी निधी आहे," असंही चांदी विश्लेषक चेतन राजापूरकर यांनी सांगितलं.


हेही वाचा :
- शिवजन्मोत्सव! महिलांनी नऊवारी साडीत 21 फूट उंच रॉक क्लायंबिंग करत हिरकणीला केला मानाचा मुजरा
- 'शिवराय कणाकणात, शिवराय मनामनात'; पिंपरीच्या तरुणाची सूक्ष्म कलेतून अनोखी शिवभक्ती!
- शिवनेरीवर शिवजयंती उत्साहात; ४००वी जयंती भव्य आणि जागतिक स्तरावर साजरी करणार - देवेंद्र फडणवीस

