नाशिक टीसीएस प्रकरण : मोबाईल 'क्लोनिंग'मधून जिहादचा कट उघड; आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी
टीसीएस प्रकरणात पोलिसांनी मोबाईल क्लोनिंगद्वारे डिलीट केलेला डेटा मिळवला आहे. यातून महिला अत्याचार, दहशतवादाचे मोठे धागेदोरे हाती लागले असून एटीएससह बड्या यंत्रणा तपास करत आहेत.

Published : April 18, 2026 at 8:20 PM IST
नाशिक : टीसीएस महिला अत्याचार प्रकरणाचे भक्कम डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. बहुराष्ट्रीय टीसीएस कंपनीत महिला अत्याचार, धार्मिक भावना दुखवणं, धर्मांतर प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांच्या आठ मोबाईलमधून डिलीट केलेले चॅट्स आणि मेसेजेस क्लोनिंग तंत्रज्ञानाद्वारे पुन्हा मिळवण्यात यश आलं आहे. जप्त केलेल्या मोबाईलमधून रिकव्हर डाटा आधारे जिहाद आणि दहशतवादाचा मोठा कट असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या तांत्रिक पुराव्याच्या आधारे एटीएस, एसआयटी आणि एएनआय या यंत्रणा तपास करत आहे. त्यामुळं मोबाईल क्लोनिंगमधून मोठे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असून या प्रकरणात आणखी खुलासे उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दोन दिवसांची पोलीस कोठडी : "टीसीएस प्रकरणातील गुन्ह्यामध्ये शफी शेख, रजा मेमन यांना महिला विनयभंगाच्या दुसऱ्या गुन्ह्यात शनिवारी (दि.18) न्यायालयात हजर केलं. यावेळी न्यायालयानं त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून मोबाईल ताब्यात घेतले आहेत. त्यातील डेटा रिकव्हर करण्यासाठी तसंच त्यांची सोशल मीडिया अकाउंट आहेत, त्याचे पासवर्ड घेण्यासाठी पोलीस कोठडीची गरज आहे, अशी विनंती आम्ही न्यायालयाला केली. यानंतर न्यायालयानं दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे," अशी माहिती सरकारी अभियोक्ता किरण बेंडभर यांनी दिली.
निदा खानच्या अटकपूर्व अर्जावर सोमवारी सुनावणी : "निदा खानवर केवळ देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप आहे. इतर कुठलेही आरोप नाहीत. निदा खान गरोदर असून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे निदा खान एचआर नसून त्या असोसिएट पदावर कार्यरत होत्या. त्यामुळं तिच्याकडं पीडित महिलांनी तक्रारी आणण्याचं कारण उद्भवत नाही," असं निदा खानचे वकील साहिल सैय्यद यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा :
- मुंबई नाशिक मार्गावर भीषण अपघात, काही महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या बँक कर्मचारी पती-पत्नीचा मृत्यू
- मंत्रतंत्रानं कॅन्सर बरा करण्याचा बनाव; भोंदूगिरी प्रकरणात वडगावपान येथील राजेंद्र गडगे महाराज अखेर अटकेत
- सिव्हिल हॉस्पिटलमधील खाबुगिरीचा फाटला बुरखा! सोनोग्राफी सेंटरच्या परवान्यासाठी लाच घेताना शिपायाला पकडलं रंगेहात

