ETV Bharat / state

लासलगाव गोदामात कांद्याला कीड आणि अळ्या; नाफेडच्या खरेदी प्रक्रियेवर कांदा उत्पादक संघटनांचे गंभीर आरोप

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर सध्या सुमारे 4 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे नाफेडकडील साठवलेला कांदा दिल्लीसह इतर ठिकाणी पाठवला जात आहे.

Onion Stock Spoilage
लासलगाव गोदामात कांद्याला कीड आणि अळ्या (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 29, 2026 at 2:54 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : नाफेड आणि एनसीसीएफने खरेदी करून साठवलेला सुमारे 48 हजार मेट्रिक टन कांदा सडल्याचे समोर आलं आहे. सुमारे 1 लाख 20 हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी जवळपास 40 टक्के कांदा खराब झाल्याचा दावा कांदा उत्पादक संघटनांकडून करण्यात आला आहे.

नाफेड आणि एनसीसीएफने साडेतीन महिन्यांत 1 लाख 20 हजार मेट्रिक टन कांदा प्रतिक्विंटल 1,235 ते 2,345 रुपये दरानं खरेदी केला. मात्र, खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या घाईत खराब दर्जाचा कांदा खरेदी करण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात कांदा सडल्याचं संघटनांचं म्हणणं आहे.

लासलगाव येथील मनमाड रोडवरील सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदामात साठवलेल्या कांद्याला कीड आणि अळ्या लागल्या आहेत. अनेक ठिकाणी कांदा सडल्याने गोदाम परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

कांद्याचे दर 4 हजार रुपये प्रतिक्विंटल : दरम्यान, नाशिक जिल्ह्यात कांद्याचे दर सध्या सुमारे 4 हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे नाफेडकडील साठवलेला कांदा दिल्लीसह इतर ठिकाणी पाठवला जात आहे. मात्र, पाठवला जाणारा कांदा अत्यंत खराब आणि दर्जाहीन असल्याचा दावा कांदा उत्पादक संघटनांनी केला आहे.

दर वाढल्यानंतर नाफेडचा कांदा बाजारात आणल्याचा आरोप : शासनाने अत्यंत कमी दराने शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला. या खरेदी प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचा आरोप कांदा तज्ज्ञ जयंत होळकर यांनी केला आहे. सडका कांदाही खरेदी करण्यात आला असून, आता कांद्याचे दर वाढल्यानंतर हाच साठवलेला कांदा मोठ्या शहरांमध्ये पाठवला जात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“शासनाचे धोरण शेतकरीविरोधी आहे. मोठ्या शहरांमध्ये कांदा पाठवून बाजारातील दर पाडणे म्हणजे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूक आहे,” असा आरोप जयंत होळकर यांनी केला.

एकाच ठिकाणी मोठा साठा केल्याने कांदा खराब : नाफेडने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला मोठ्या प्रमाणातील कांदा एकाच ठिकाणी साठवण्यात आल्याने खराब झाल्याचा दावा रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दीपक पगार यांनी केला. सुमारे 50 हजार मेट्रिक टन कांदा एकाच ठिकाणी साठवण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात कांदा खराब झाला. प्रत्येक तालुक्यातून खरेदी केलेला कांदा स्वतंत्रपणे सुमारे 1 हजार मेट्रिक टन क्षमतेत साठवला असता, तर नुकसान टाळता आले असते, असे त्यांनी सांगितले.

कांद्याचे दर वाढले असले तरी शेतकऱ्यांकडे सध्या कमी प्रमाणात कांदा उपलब्ध आहे. नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी अडीच ते तीन महिने लागणार असल्याचंही पगार यांनी नमूद केलं.

800 मेट्रिक टन कांदा चेन्नईला रवाना : दरम्यान, मनमाड रेल्वे स्थानकातून आज सुमारे 800 मेट्रिक टन कांदा चेन्नईला पाठवण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेच्या 21 डब्यांमध्ये कांदा भरण्याचे काम सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणी नाफेड आणि एनसीसीएफने साठवून ठेवलेल्या गोदामांमधून ट्रकद्वारे कांदा मनमाडला आणला जात आहे. सुमारे 21 डब्यांमधून 800 मेट्रिक टन कांदा आज रात्री चेन्नईच्या दिशेने रवाना होणार आहे.