ETV Bharat / state

काल मनसेत, आज भाजपात! उमेदवारी अर्ज मागे घेत नाशिकमधील माजी नगरसेविकेनं घेतलं कमळ हाती

मनसेच्या एका माजी नगरसेविकेनं निवडणुकीतून माघार घेत भाजपात प्रवेश केलाय.

sujata dhere joins bjp
मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता ढेरे यांनी भाजपात प्रवेश केला (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 4, 2026 at 6:39 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक - महानगरपालिका निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसलाय. मनसेच्या एका माजी नगरसेविकेनं निवडणुकीतून माघार घेत भाजपात प्रवेश केलाय. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता ढेरे यांनी भाजपात प्रवेश केला.

मनसेच्या माजी नगरसेविकेचा भाजपात प्रवेश - मुंबईसह नाशिकमध्ये महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आलेत. त्यामुळं मनसे आणि शिवसेना - उबाठा पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र, दुसरीकडं मनसेला एका पाठोपाठ एक धक्के बसत आहेत. प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी ठाकरे बंधू एकत्र आल्याचा आनंद साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच मनसेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला होता. या पाठोपाठ मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता ढेरे यांना प्रभागा 12 मधून मनसेकडून एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, त्यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेत आज थेट भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.

sujata dhere joins bjp
सुजाता ढेरे यांचा भाजपात प्रवेश (ETV Bharat Reporter)

मनसेच्या तीन उमेदवारांची माघार - मुंबई, नाशिकसह इतरत्र ठाकरे बंधू एकत्रित महानगरपालिका निवडणुका लढवत आहेत. नाशिक महानगरपालिकेत महाविकास आघाडीत चौथा मित्र पक्ष असलेल्या मनसेला 33 जागा मिळाल्या होत्या. मात्र, शुक्रवारी माघारीच्या दिवशी प्रभाग क्रमांक 18 मधून रोहिणी पिल्ले, प्रभाग क्रमांक 16 मधून मीरा सहाणे आणि प्रभाग क्रमांक 12 मधून सुजाता ढेरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळं आता नाशिकमधून मनसेचे 30 उमेदवार रिंगणात आहेत. अशात राज ठाकरे यांची 9 जानेवारीला नाशिकमध्ये जाहीर सभा होणार असून, त्यात राज ठाकरे काय बोलणार? याकडं मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नाशिककरांचं लक्ष लागलं आहे.

आयारामांमुळं भाजपात नाराजी - नाशिक महानगरपालिका निवडणुकीत 122 जागांसाठी सर्वाधिक एक हजाराहून अधिक इच्छुक उमेदवार भाजपात होते. त्यात ऐनवेळी इतर पक्षातील माजी नगरसेवकांना भाजपातून उमेदवारी दिल्यामुळं मोठा गोंधळ उडाला होता. अनेक भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी नाराजी व्यक्त करून दाखवली. अशात नाशिकरोड भागातील भाजपा मंडळ कार्यालयात तर शहराध्यक्ष सुनील केदार यांना कोंडून ठेवत त्यांना गाजर भेट देण्यात आलं होतं. अशात पुन्हा मनसेतून नव्याने भाजपात दाखल झालेल्या सुजाता ढेरे यांच्यामुळं भाजपा कार्यकर्त्यांमधील नाराजीत अधिक भर पडेल, असं म्हटलं जात आहे.

हेही वाचा -

  1. राज ठाकरे यांनी तब्बल 20 वर्षांनी चढली शिवसेना भवनची पायरी, उद्धव ठाकरे म्हणाले...
  2. निवडणुकीसाठी खून सहन करणार नाही, अमित ठाकरेंनी घेतली सरवदे कुटुंबीयांची भेट, अश्रू अनावर
  3. 'शब्द ठाकरेंचा' शिवसेना-मनसे-राष्ट्रवादीचा वचननामा जाहीर, घोषणेच्या वेळी राष्ट्रवादीची सावध भूमिका