ETV Bharat / state

गोष्ट हुकलेल्या आणि टिकलेल्या उमेदवाराची, कहाणी पाच मिनिटांची

नाशिकमध्ये भाजपाकडून एकाच प्रभागात दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. पुढे काय झालं? वाचा सविस्तर बातमी...

nashik corporation election 2026 bjp candidate pallavi ganore
निवडणूक निर्णय अधिकारी आणि भाजपा उमेदवार पल्लवी गणोरे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 1, 2026 at 3:20 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक - 'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह', एखाद्या ऑफरविषयीची अशी जाहिरात अनेकांनी पाहिली, ऐकली आणि वाचली असेल. नाशिक महानगरपालिकेत निवडणुकीसाठी फॉर्म दाखल करणाऱ्या एका उमेदवारानं 'हुकू शकणारी ऑफर' पाच मिनिटं लवकर पोहोचल्यानं पटकावली. त्याचं झालं असं... नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपामध्ये एबी फॉर्म वाटपावरुन भाजपामध्ये गोंधळाचं वातावरण होतं. अशात एकाच प्रभागात दोन इच्छुक उमेदवारांना भाजपाकडून एबी फॉर्म देण्यात आले होते. बुधवारी छाननीदरम्यान त्यातील एका इच्छुक उमेदवाराचा एबी फॉर्म पाच मिनिटं लवकर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे पोहोचल्यानं त्या उमेदवाराला अधिकृत भाजपाची उमेदवारी मिळाली. या अनुभवानं आपल्याला पाच मिनिटांचं महत्त्व पटल्याची प्रतिक्रिया या उमेदवाराने दिली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण? - नाशिक महानगरपालिका निवडणुकीत रंगत आलीय. 122 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाकडे एक हजारहून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आणि पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म जोडण्याचा अखेरचा दिवस असल्याने सर्वच पक्षामध्ये धावपळ दिसून आली. भाजपात माजी नगरसेवकांसह अनेकांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने भाजपातील आमदारांना आणि पदाधिकाऱ्यांना इच्छुक उमेदवारांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. याच गडबडीत भाजपाकडून प्रभाग 25 अ मधून इच्छुक उमेदवार पल्लवी राहुल गणोरे आणि सुरेखा नेरकर यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. अशात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांपुढे पेच निर्माण झाला होता. मात्र, पल्लवी गणोरे यांचा एबी फॉर्म 5 मिनिटं लवकर प्राप्त झाल्यानं त्यांना भाजपाचा अधिकृत उमेदवार घोषित करण्यात आलं. "माझ्या जीवनातली ही पाच मिनिटं मला बरंच काही शिकवून गेली," हे 'अनुभवाचे' बोल पल्लवी गणोरे यांचे पती राहुल गणोरे यांनी काढले आहेत.


मी अपक्ष लढणार - अर्ज दाखल करायला पाच मिनिटं उशीर झाल्यानं भाजपाची अधिकृत उमेदवारी दुसऱया उमेदवाराला घोषित करण्यात आली. त्यामुळं निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधीच पक्षाची उमेदवारी न मिळाल्यानं इच्छुक उमेदवारानं लढण्याची जिद्द सोडली नाही. अपक्ष लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं. "मी गेल्या 30 वर्षापासून भाजपात काम करत आहे. एबी फॉर्मवरून जो गोंधळ झाला, त्यामुळे आम्ही अडचणीत आलो. मला अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला होता. समोरील व्यक्तीने एबी फॉर्म कुठून आणला ते माहिती नाही. मात्र, निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं की, तुम्ही नामनिर्देशन पत्र दाखल करताना पाच मिनिटं उशीर केला म्हणून माझा अर्ज अवैध ठरवण्यात आला. मात्र, आमच्या प्रभागातील जनता माझ्या पाठीशी आहे. आम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी करणार आहोत," अशी प्रतिक्रिया इच्छुक उमेदवार सुरेखा नेरकर यांचे पती यशवंत नेरकर यांनी दिली.

अर्धा तासाचं महत्त्व - असाच प्रकार नाशिक रोड भागातील प्रभाग 18 ब मध्ये घडला. त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार शीतल शिवाजी तकाते आणि रंजना बोराडे या दोन इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, रंजना बोराडे यांचा एबी फॉर्म अर्धा तास अगोदर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडं पोहोचल्याने तो फॉर्म अधिकृत म्हणून त्यांना राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

चार दिवस झोपलो नाही - "भाजपानं आम्हाला एबी फॉर्म देऊन आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी आभार मानतो. पाच मिनिटं अगोदर एबी फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडं सादर केल्याने तो वेध ठरला आहे. याचा मला खूप आनंद झाला. या पाच मिनिटांसाठी मी चार दिवस झोपलो नाही," अशी प्रतिक्रिया भाजपाच्या उमेदवार पल्लवी गणोरे यांचे पती राहुल गणोरे यांनी दिली.

...म्हणून असं झालं - "भाजपानं सर्वे, सामाजिक समीकरण, निवडून येण्याची क्षमता पाहून इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म दिले होते. सुरुवातीला 108 एबी फॉर्म व्यवस्थित वाटप झाले. परंतु, नंतर पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. त्यामध्ये काही एबी फॉर्म गहाळ झाले होते. भाजपानं सर्व 122 जागांवर सक्षम उमेदवार उभे केले असून, पक्षानं 100 प्लसचा दिलेला नारा पूर्ण करू. भाजपाच्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचा गैरसमज दूर झाला असून, आम्ही सर्व जण एकजुटीनं व एकदिलानं काम करू. केंद्र व राज्य सरकारचे विकासकामे, सर्वसामान्य नागरिकांना दिलेल्या योजना, सोयी सवलती, सुशासन, आगामी कुंभ मेळ्याच्या दृष्टीने होत असलेली विकासकामे हे सर्व मुद्दे नाशिककर मतदारांपुढे नेऊ व पुन्हा एकदा नाशिक महानगरपालिकेवर भाजपाचा एकहाती झेंडा फडकेल," असा विश्वास भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांनी व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. जागावाटपावरून नाराज झालेल्या रामदास आठवलेंनी उपमुख्यमंत्री शिंदेंची घेतली भेट; कार्यकर्त्यांसाठी काय केली मागणी?
  2. चक्क प्रतिस्पर्ध्याचा खाऊन टाकला एबी फॉर्म; शिवसेना उमेदवारावर गुन्हा दाखल
  3. अमरावती महापालिका निवडणूक : संतप्त भाजपा कार्यकर्त्यांचा रोष पाहून पदाधिकाऱ्यांनी काढला पळ