भाजपामध्ये पुन्हा राडा; नाशिक शहराध्यक्षांना कार्यालयात कोंडलं, सोनं विकून पैसा उभा केला, नाराज इच्छुक आक्रमक
राजकारणाचा स्तर इतक्या खालच्या पातळीवर गेलाय की निवडणुकीसाठी तिकीट न दिल्यानं इच्छुक उमेदवारांनी चक्क शहराध्यक्षांना कोंडून ठेवलं.

Published : January 1, 2026 at 4:31 PM IST
नाशिक - महानगरपालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यानं भाजपामध्ये राडा बघायला मिळाला. गुरुवारी चक्क इच्छुक उमेदवारांनी नाशिकरोड भाजपा मंडळ कार्यालयात भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांना कोंडून निषेध व्यक्त केला. यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना बाहेर काढलं. त्यामुळं उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांना किती धडपड करावी लागते हे यातून दिसून येतंय. मात्र, राज्यातील राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवर गेलाय, अशी भावना सर्वसामान्य मतदार व्यक्त करत आहेत.
कार्यालयात कोंडून शटर लावून घेतलं - इच्छुकांना डावलल्यानं विभागातील शेकडो इच्छुकांनी नाशिकरोड भारतीय जनता पार्टी मंडळ कार्यालयावर गर्दी केली होती. यावेळी भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार व मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे हे कार्यालयात दाखल होताच त्यांना इच्छुक उमेदवारांनी घेराव घालत आम्हाला तिकीट का नाकारलं? याबाबत विचारणा करत गोंधळ घातला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांना कार्यालयात कोंडून शटर लावून घेतलं. काही वेळानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत केदार यांना सुरक्षित बाहेर काढलं. यावेळी उपस्थित भाजपाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
सोनं विकून पैसे खर्च केले - "पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं की, तुम्ही निवडणुकीची तयारी करा. आम्ही गेल्या दोन वर्षापासून तयारी करत होतो. प्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम घेतले. घरोघरी जाऊन भेटी घेतल्या. लाखो रुपये खर्च केले. यासाठी आम्ही आमचं सोनं नाणं सुद्धा विकलं आणि त्यानंतर त्यांनी उमेदवारी नाकारून दुसऱ्याला उमेदवारी दिली. हा कुठला न्याय आहे? याचे उत्तर भाजपा नेत्यांनी द्यावे," अशी मागणी भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली.
तिकीट वाटणात आर्थिक व्यवहार झाला - "मी गेल्या 30 वर्षापासून भाजपामध्ये काम करतोय. आतापर्यंत एबी फॉर्म हे भाजपाच्या कार्यालयातून दिले जात होते. आता ते थेट एका फार्म हाऊसवरून देण्यात आले. हे फॉर्म कोणी दिले याची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी हे एबी फॉर्म वाटले ते देखील काँग्रेसमधून आले आहेत. सर्व्हेमध्ये आमचं नाव होतं आणि असं नसेल तर मी राजकारण सोडून देईन. भाजपा पक्ष हा काँग्रेसच्या वाटेवर चाललाय. तिकीट वाटताना मोठा आर्थिक व्यवहार झालाय," असा आरोप भाजपाचे नाशिकरोड पदाधिकारी सचिन हांडगे यांनी केलाय.
अहवाल वरिष्ठांना पाठवला जाईल - "भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भावना तीव्र आहेत. त्या मी लिखित स्वरूपात घेतल्या आहेत. यातील बहुतेक पदाधिकारी कोअर कमिटीतील असून, गेल्या अनेक वर्षापासून ते भाजपामध्ये सक्रिय आहेत. अशात त्यांना तिकीट न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत अहवाल तयार करून वरिष्ठांना पाठवला जाईल," अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिली.

रिपब्लिकन पार्टीला एकही तिकीट नाही - "भाजपाचे आम्ही मित्र पक्ष आहोत. विधानसभा, लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्रित काम करून त्यांचे उमेदवार निवडून आणले. त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की, महानगरपालिका निवडणुकीत आम्ही आपल्या पक्षाला काही जागा देऊ. मात्र, एकही तिकीट त्यांनी दिलं नाही. याबाबत आम्ही आता भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याशी चर्चा केली. त्यांनी दोन स्वीकृत नगरसेवक देण्याचं आश्वासन आम्हाला दिलं आहे. ते आश्वासन त्यांनी पाळलं नाही तर याचे गंभीर परिणाम होतील," असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी अमोल पगारे यांनी दिलाय.
हेही वाचा -

