ETV Bharat / state

नाशिक : दोन दिवस अन्न-पाण्याविना विहिरीत! 75 वर्षीय आजीला गावकऱ्यांनी दिलं जीवदान

चंद्रभागा व्हरकटे या 29 ऑगस्ट रोजी मुलाकडे जाते असं सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत.

Chandrabhaga Vharkate
चंद्रभागा व्हरकटे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 1, 2026 at 1:21 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नाशिक : जिल्ह्यातील चांदवड इथं एका वृद्ध महिलेनं मृत्यूशी दिलेल्या झुंजीमुळे सर्वांना थक्क केलं आहे. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 75 वर्षीय चंद्रभागा व्हरकटे या उघड्या विहिरीत पडल्या होत्या. अन्न-पाण्याविना दोन दिवस विहिरीत अडकलेल्या चंद्रभागा यांना गावकऱ्यांनी अथक प्रयत्न करून सुखरूप बाहेर काढलं.

नेमकी घटना काय? : मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रभागा व्हरकटे या 29 ऑगस्ट रोजी मुलाकडे जाते असं सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत. कुटुंबीयांकडून दोन दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, चांदवड बसस्थानकाजवळील उघड्या विहिरीत त्या पडल्याचं आज निदर्शनास आलं. विहिरीत पडल्यानंतर चंद्रभागा यांनी मोटारीच्या पाईपला आणि दोरीला घट्ट धरून ठेवलं. त्यामुळे त्या दोन दिवस विहिरीत तग धरू शकल्या.

चांदवड येथील युवक गणेश पारवे हे विहिरीजवळून जात असताना त्यांनी विहिरीत डोकावून पाहिलं. त्यावेळी त्यांना चंद्रभागा दिसून आल्या. त्यांनी तातडीनं नागरिक आणि पोलिसांना माहिती दिली. यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चंद्रभागा यांना विहिरीबाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केलं. अखेर त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं.

खाटेच्या सहाय्याने आजीला विहिरीतून बाहेर काढले : चंद्रभागा आजींना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी स्थानिक युवकांनी बचावकार्य सुरू केलं. खाटेला दोरी बांधून ती विहिरीत सोडण्यात आली. त्यानंतर खाटेच्या सहाय्यानं चंद्रभागा आजींना अलगद विहिरीबाहेर काढण्यात आलं.

दोन दिवसांच्या संघर्षानंतर त्यांची सुखरूप सुटका होताच परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला. दोन दिवस अन्न-पाण्याविना राहिल्याने चंद्रभागा यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी पिंपळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी काय सांगितलं? : चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी सांगितलं की, आजी बेपत्ता असल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी चांदवड पोलिसांत दाखल झाली होती. आजी विहिरीत असल्याचं समजल्यावर स्थानिकांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि पिंपळगाव रुग्णालयात दाखल केलं. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्या शुद्धीवर आल्यावर जबाब नोंदवू.

घात की अपघात? पोलिसांकडून तपास : चंद्रभागा आजी घराबाहेर पडल्यानंतर विहिरीजवळ का गेल्या, विहिरीला कठडा असतानाही त्या विहिरीत कशा पडल्या, तसेच रस्त्यापासून काही अंतरावर असलेल्या विहिरीजवळ त्या का गेल्या, याचा तपास चांदवड पोलीस करत आहेत. हा अपघात आहे की त्यांच्यासोबत घातपाताचा प्रयत्न झाला, या सर्व शक्यतांचा तपास केला जात आहे. तपासानंतरच घटनेचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा

  1. मनपा शाळेत शैक्षणिक गुणवत्ता निर्माण करणाऱ्या कुंदा बच्छाव यांनी कोणते उपक्रम राबविले? ; 5 सप्टेंबरला स्वीकारणार आहेत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार
  2. लासलगाव गोदामात कांद्याला कीड आणि अळ्या; नाफेडच्या खरेदी प्रक्रियेवर कांदा उत्पादक संघटनांचे गंभीर आरोप
  3. नेपाळ पूर : नाशिक जिल्ह्यातील 50 हून अधिक प्रवासी सुरक्षित, लवकरच परतीचा प्रवास