इतिहास, निसर्ग अन् थराराचा संगम; सातपुड्याच्या कुशीतील नरनाळा किल्ला अन् जंगल सफारी!
सातपुडा पर्वतरांगेतील नरनाळा किल्ला परिसर आता निसर्ग आणि वन्यजीवांचे केंद्र बनलाय. धारगड ते केलपाणी दरम्यानची विस्थापित गावे आणि घनदाट जंगलातील सफारी पर्यटकांना रोमांचक अनुभव देतेय.

Published : April 9, 2026 at 3:44 PM IST
|Updated : April 9, 2026 at 6:16 PM IST
अमरावती : सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेला नरनाळा किल्ला परिसर आज इतिहास, निसर्ग आणि वन्यजीवांचा अद्भूत संगम म्हणून ओळखला जातोय. एकेकाळी मानवी वस्तीनं गजबजलेला हा परिसर आता पूर्णतः निसर्गाच्या अधिपत्याखाली आला असून विस्थापित गावांच्या खुणा आणि घनदाट जंगलातील सफारी पर्यटकांना थरारक आणि भावनिक अनुभव देत आहेत. या जंगल सफारीत धारगड ते केलपाणी अशा पूर्वी असणाऱ्या काही गावांच्या परिसरात आज घनदाट जंगल वेढलेलं या ठिकाणी दिसतं.
विस्थापनातून बहरलं जंगल : वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीनं 2010 ते 2012 या कालावधीत मेळघाटात चिखलदरा तालुक्यात येणाऱ्या या भागातील अनेक गावांचं टप्प्याटप्प्यानं पुनर्वसन करण्यात आलं. धारगड, कुंड, कोलखेड, केलपाणी, गुलरघाट अशी गावं मेळघाट बाहेर स्थलांतरित झालीत. आज या ठिकाणी मानवी वस्ती नाही, पण निसर्गानं पुन्हा आपलं साम्राज्य निर्माण केलं आहे. या रिकाम्या जागांमध्ये वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून जंगल पुन्हा जिवंत झालं आहे.
अवशेष सांगतात इतिहास : ज्या ठिकाणी कधी गावं वसली होती. त्या ठिकाणी आजही ग्रामदेवताची मंदिरं, पक्क्या घरांचे अवशेष, दगडी भिंत, विहिर आणि पानवठ्यांचा खुणा स्पष्टपणे दिसतात. विशेषतः धारगड आणि केलपाणी परिसरात मंदिराचे अवशेष अजूनही ठळकपणे उभे आहेत. हे अवशेष केवळ इतिहास सांगत नाही, तर त्या गावाच्या आठवणी जिवंत ठेवतात.

जंगल सफारीचा रोमांचक अनुभव : वन्यजीव विभागाच्या मार्गदर्शनाखाली अकोट वन्यजीव विभागांतर्गत 70 किलोमीटर अंतराची शहानुर जंगल सफारी आणि 24 किलोमीटर अंतराची नरनाळा किल्ला सफारी या भागात पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. 70 किलोमीटरच्या जंगल सफारी दरम्यान पर्यटकांना हरीण, सांबर, रानगवे, कोल्हा, अस्वल अशा प्राण्यांसह मोठ्या संख्येनं मोर, सर्पगरुड आणि विविध पक्षी असे अनेक वन्यजीव सहज पाहायला मिळतात. या जंगलात वाघ देखील आहे. जंगल सफारी दरम्यान अनेकांना वाघाचं दर्शन देखील घडतं. अनेकदा वाघ आणि बिबट्या दिसत नाही. मात्र, जंगलातील जैवविविधतेचा अनुभव जंगलप्रेमी पर्यटकांना समृद्ध करणारा ठरतो.

गुल्लरघाट जंगलात पर्यटन स्थळ : जंगल सफारी दरम्यान जंगलाच्या मध्यभागी असलेलं गुल्लरघाट हे पर्यटकांसाठी आकर्षक असं पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी वनविभागाच्या वतीनं चहा, नाश्ता पर्यटकांना मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. निसर्गाच्या सानिध्यात विसावा घेण्याचा हा एक सुंदर अनुभव ठरतो. या ठिकाणी वाहणारी नदी, मचाणावर बसून दूरपर्यंत जंगल पाहण्याचा अनुभव घेता येतो.

उन्हाळ्यातील सफारीचं महत्व : उन्हाळा हा जंगल अनुभवण्यासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो. पानगळ झाल्यामुळं जंगल विरळ होतं. अशा विरळ जंगलात प्राणी सहज नजरेस पडतात. तलाव आणि पाणवठ्यांवर वन्यजीवांची गर्दी दिसते. शहानुर जंगल सफारी करताना हरिण, रानगवे आणि असंख्य मोर जागोजागी दिसतात. जंगल फिरताना मोराचे थवे मुक्तपणे विहार करताना अनेक ठिकाणी दिसतात. विविधरंगी पक्षांचा किलबिलाटही पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध करतो. खरं तर ही सफारी केवळ प्राण्यांचं दर्शन घडवणारी नसून संपूर्ण जैवविविधतेचा जिवंत अनुभव देणारी ठरते.

पर्यटकांचे अनुभव :
जंगल सफारी करणं खरंच महत्त्वाचं : "मेळघाट फिरायला मी नेहमीच येतो. विशेषतः शहानुर जंगल सफारी ही नेहमीच अविस्मरणीय ठरते. या भागातील गावांचं पुनर्वसन झाल्यानं या भागात मोठ्या प्रमाणात कुरण वाढलं. त्यामुळं प्राणी वाढलेत. सफारी दरम्यान आम्हाला अस्वल, सांबर, चितळ (स्पॉटेड डियर), कोल्हा आणि पक्षांमध्ये सर्पगरुड दिसला. एकाच सफारीत इतकं सगळं पाहायला मिळणं हे एक आश्चर्य आहे. खरंतर जंगलात वाघ बघायच्या इच्छेनं सारेच येतात आणि ती इच्छा चुकीची पण नाही. मात्र, जंगल बघायला येणं हे देखील तितकच महत्त्वाचं. आपण जंगलाचा नाश करत असलो तरी निसर्ग आपलं अस्तित्व टिकवून ठेवतो. निसर्ग आपल्यावर सदैव कृपा करतो, असा अनुभव घेण्यासाठी अशी जंगल सफारी करणं खरंच महत्त्वाचं आहे," अशी प्रतिक्रिया नाशिकमधून आलेले पर्यटक प्रसाद समर्थ यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

हा आनंद अविस्मरणीय : "या जंगल सफारीत आम्ही वाघ सोडला तर सर्वच प्राणी बघितले. हरिण, रानगवे अनेक लहान-मोठे पक्षी या ठिकाणी पाहायला मिळालेत. जंगलातून बाहेर पडताना आम्हाला अस्वलाचं दर्शन घडलं. हा आनंद आमच्यासाठी लहान मुलांसाठी अविस्मरणीय असा आहे." असं वाशिम इथून आलेले पर्यटक पवन भुते 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.

निसर्ग अन् इतिहासाचा संगम : "नरनाळा परिसर आज केवळ पर्यटन स्थळ नाही, तर पर्यावरण संवर्धनाचा आदर्श बनला आहे. विस्थापित गावांच्या खुणा जपत निसर्गांना इथं पुन्हा आपलं अस्तित्व प्रस्थापित केलं आहे. या भागात जंगल सफारी करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आम्ही योग्य मार्गदर्शन करतो. प्रत्येक ऋतूत हे जंगल आगं वेगळं दिसतं," असं वन मार्गदर्शक दीपक धुर्वे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
हेही वाचा :

