नांदेडमध्ये अनोखं रक्षाबंधन! ‘उत्कर्ष’कडून भटक्या जनावरांना रेडियम सुरक्षा बेल्ट
नांदेडमध्ये 'उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन'नं रस्त्यावरील भटक्या जनावरांना रेडियमचे सुरक्षा बेल्ट बांधून अनोख्या पद्धतीनं रक्षाबंधन साजरं केलंय. या उपक्रमामुळे रात्रीच्या अंधारात जनावरं दुरूनच नजरेस पडणार आहेत.

Published : August 26, 2026 at 2:39 PM IST
नांदेड : रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमासोबतच एकमेकांच्या रक्षणाची आणि सुरक्षिततेची भावना जपणारा सण म्हणून ओळखला जातो. याच संरक्षणाच्या भावनेला सामाजिक बांधिलकीची जोड देत, 'उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन'च्या वतीनं यंदाचं रक्षाबंधन अनोख्या पद्धतीनं साजरं करण्यात आलं. माणसांसोबतच रस्त्यावर भटकणाऱ्या मुक्या जीवांच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारत, फाउंडेशननं भटक्या जनावरांना सुरक्षा बेल्ट (रिफ्लेक्टिव्ह कॉलर) लावण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.
रात्रीच्या वेळी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात भटक्या गाई, म्हशी : नांदेड शहरातील विविध रस्त्यांवर रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात भटक्या गाई, म्हशी तसेच श्वान फिरताना दिसतात. अनेकदा अंधारामुळे ही जनावरं वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत. त्यामुळे अचानक वाहनांसमोर जनावरं आल्यानं अपघात होण्याची शक्यता निर्माण होते. काही वेळा अशा अपघातांमध्ये वाहनचालकांसोबतच मुक्या प्राण्यांनाही गंभीर दुखापत होते. हीच गंभीर समस्या लक्षात घेऊन 'उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन'नं जनावरांची आणि वाहनचालकांची सुरक्षितता वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरू केलाय.
भटक्या श्वानांसह जनावरांना सुरक्षा बेल्ट : या उपक्रमांतर्गत जनावरांच्या गळ्यात विशेष प्रकारचे सुरक्षा बेल्ट लावण्यात येत आहेत. या बेल्टवर प्रकाश परावर्तित करणारी (रिफ्लेक्टिव्ह) पट्टी असल्यानं, रात्रीच्या अंधारात वाहनांच्या प्रकाशात ही जनावरं दुरूनच वाहनचालकांच्या निदर्शनास येण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना वेळीच सावध होता येईल आणि संभाव्य अपघात टाळता येतील. या सामाजिक उपक्रमाची सुरुवात देगलूर नाका येथील पशुवैद्यकीय रुग्णालय परिसरातून करण्यात आली. त्यानंतर वर्कशॉप परिसर आणि शहरातील इतर विविध भागांमध्ये फिरणाऱ्या भटक्या श्वानांसह जनावरांना सुरक्षा बेल्ट लावण्यात आले. येत्या काळात शहरातील अधिकाधिक भटक्या जनावरांपर्यंत हा उपक्रम पोहोचवण्याचा फाउंडेशनचा प्रयत्न आहे.
'उत्कर्ष ग्लोबल फाउंडेशन'चे ट्रस्टी दगडू लोंढे आणि असिस्टंट मॅनेजर सिंधू वासमवार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येत आहे. केवळ उत्सव साजरा न करता, त्या उत्सवातून समाजोपयोगी संदेश देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आलाय. रक्षाबंधनाच्या निमित्तानं मुक्या जीवांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारून, त्यांच्या जीवितासोबतच नागरिकांच्या सुरक्षिततेचाही मोठा विचार यामध्ये करण्यात आलाय.
मुक्या जीवांचं रक्षण आणि नागरिकांची सुरक्षा : रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांमुळे होणारे अपघात ही अनेक शहरांसमोरील गंभीर समस्या आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रकाश कमी असलेल्या रस्त्यांवर काळ्या रंगाची जनावरे किंवा श्वान वाहनचालकांना खूप उशिरा दिसतात. अशा परिस्थितीत वाहनाचा वेग अधिक असल्यास अपघात टाळणं कठीण होतं. सुरक्षा बेल्टवरील परावर्तित पट्ट्यांमुळे जनावरांची उपस्थिती वाहनचालकांना काही अंतरावरूनच जाणवू शकते. त्यामुळे वेळीच ब्रेक लावणं किंवा वाहनाची दिशा बदलणं शक्य होणार आहे. या उपक्रमामुळे एका बाजूला भटक्या जनावरांचं संरक्षण होणार असून, दुसऱ्या बाजूला वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेलाही हातभार लागणार आहे. म्हणूनच या सामाजिक उपक्रमातून 'मुक्या जीवांचं रक्षण आणि नागरिकांची सुरक्षा' असा दुहेरी संदेश देण्यात आलाय.
हेही वाचा :

