ETV Bharat / state

नांदेडला रेल्वेची मोठी भेट! दोन नव्या एक्सप्रेस गाड्यांचा शुभारंभ, नांदेडहून मुंबई आणि उत्तराखंडसाठी थेट रेल्वे सेवा सुरू

नांदेडहून मुंबईसाठी स्वतंत्र रेल्वे सुरू (Nanded Mumbai Express Train) करण्याची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी अखेर रेल्वेनं पूर्ण केली आहे.

Nanded Mumbai Express
नांदेडला रेल्वेची मोठी भेट (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 6, 2026 at 4:00 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नांदेड : नांदेडकरांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. हजूर साहिब नांदेड येथून दोन महत्त्वाच्या नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवांचा शुभारंभ करण्यात आला. हजूर साहिब नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई एक्सप्रेस आणि टनकपूर–नांदेड साप्ताहिक एक्सप्रेसला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उत्तराखंडचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवला. या दोन नव्या रेल्वे सेवांमुळं मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबई आणि उत्तराखंडकडं जाण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. तसंच पर्यटन, तीर्थयात्रा, व्यापार, उद्योग आणि शिक्षण क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार असल्याचं सांगितलं जातय.


नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्सप्रेस - या उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय राज्यमंत्री देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. तर हजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावर झालेल्या स्थानिक कार्यक्रमात खासदार, महापौर, विधान परिषदेचे सदस्य यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, रेल्वे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेड–लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई एक्सप्रेस ही गाडी आठवड्यातून दोन दिवस धावणार आहे. त्यामुळं नांदेड, परभणी, हिंगोली आणि मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबईकडं जाण्यासाठी आणखी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध झाला आहे. यामुळं व्यवसाय, नोकरी, शिक्षण आणि वैद्यकीय उपचारांसाठी मुंबईला जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

माहिती देताना अशोक चव्हाण आणि रवींद्र चव्हाण (ETV Bharat Reporter)


टनकपूर–नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस : दुसरीकडं, टनकपूर–हजूर साहिब नांदेड साप्ताहिक एक्सप्रेसमुळं महाराष्ट्र आणि देवभूमी उत्तराखंड यांच्यात प्रथमच थेट रेल्वे संपर्क प्रस्थापित झाला आहे. उत्तराखंडमधील धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांसाठी तसेच हजूर साहिब नांदेड येथे दर्शनासाठी येणाऱ्या शीख भाविकांसाठी ही रेल्वे सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. या मार्गामुळं धार्मिक पर्यटनासोबतच व्यापार आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

टनकपूर–नांदेड एक्सप्रेसचा कसा असणार प्रवास? : दक्षिण मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, टनकपूर–नांदेड उद्घाटन विशेष एक्सप्रेस 6 जुलै रोजी सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी टनकपूर येथून रवाना झाली असून 7 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजता हजूर साहिब नांदेड येथे पोहोचणार आहे. या गाडीचा मार्ग पिलीभीत, इज्जतनगर, बरेली, बदायूं, कासगंज, मथुरा, आग्रा कॅन्ट, धौलपूर, ग्वाल्हेर, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, ललितपूर, बीना, राणी कमलापती, इटारसी, खंडवा, मलकापूर, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा असा असून अखेर ती नांदेड येथे दाखल होणार आहे.

नांदेडला मिळाल्या दोन नव्या एक्सप्रेस : या गाडीत एकूण 19 अत्याधुनिक एलएचबी डबे असून त्यामध्ये वातानुकूलित प्रथम, वातानुकूलित द्वितीय व तृतीय श्रेणी, शयनयान तसेच सामान-रक्षक डब्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या गाडीचे संपूर्ण संचालन एंड-टू-एंड इलेक्ट्रिक ट्रॅक्शनद्वारे होणार असल्यानं प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि पर्यावरणपूरक ठरणार आहे. एकूणच, नांदेडला एकाच दिवशी मिळालेल्या या दोनं नव्या एक्सप्रेस रेल्वे सेवांमुळं मराठवाड्याच्या रेल्वे विकासात महत्त्वाचे पाऊल पडले असून प्रवाशांसाठी ही मोठी आनंदाची बातमी ठरली आहे.


नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न : नांदेड-बिदर रेल्वे मार्गासाठी कर्नाटक सरकारने अद्यापही त्यांचा 50 टक्के खर्चाचा वाटा देण्यास नकार दिला आहे, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली. नांदेड-लातूर रेल्वे मार्गाला गती मिळत असतानाच, बहुप्रतीक्षित नांदेड-बिदर रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न मात्र अजूनही रखडलेला आहे. या प्रकल्पावर आता अशोक चव्हाण यांनी काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांना साद घालत, तिकडं काँगेसचं सरकार आहे, तुम्ही पुढकार घ्या आम्ही सोबत आहोत हा प्रश्न मार्गी लावा अशी साद घातली.

काय म्हणाले खासदार रवींद्र चव्हाण? : तर या प्रकल्पा संदर्भात नक्की कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के शिवकुमार आहे. त्याचासोबत नक्की चर्चा करू अधिवेशनात मल्लिकार्जुन खरगे यांच्यासमोर हा विषय मांडून मार्गी लावू. कर्नाटक सरकारची काय अडचण आहे यांची देखील त्यांच्यासोबत चर्चा करू अशी प्रतिक्रिया खासदार रवींद्र चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा -

  1. साई भक्तांसाठी पुणे- साईनगर शिर्डी दैनंदिन रेल्वे सुरू; केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दाखवला हिरवा झेंडा
  2. पुणेकरांसाठी खुशखबर! साईबाबांच्या दर्शनासाठी बुधवारपासून सुरू होतेय 'पुणे-शिर्डी' दैनंदिन एक्सप्रेस
  3. बीडकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; बीड-अहिल्यानगर रेल्वे गोपीनाथ मुंडेंना अर्पण - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस