नांदेड मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा; मुलांनीच केला आई-वडिलांचा खून, नंतर स्वत: केली आत्महत्या
नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पोलिसांच्या तपासातून चौघांच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे.

Published : December 27, 2025 at 5:31 PM IST
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांच्या मृत्यू प्रकरणात अतिशय धक्कादायक खुलासा समोर आलाय. पोलिसांच्या तपासानंतर आत्महत्या की घातपात? या चर्चेला आता पूर्णविराम मिळालाय. रमेश लखे यांच्या दोन्ही मुलांनीच आपल्या जन्मदात्या आई-वडिलांचा खून केल्याचं शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झालं आहे. याबाबतची माहिती नांदेड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून पत्रकाद्वारे देण्यात आली.
भावांनीच केला आई-वडिलांचा खून : 25 डिसेंबरला मुदखेड तालुक्यातील जवळा मुरहार या गावात एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या प्रकरणात रमेश लखे आणि त्यांची पत्नी राधाबाई लखे या राहत्या घरात मृत अवस्थेत आढळल्या होत्या. तर त्यांची दोन मुलं उमेश लखे आणि बजरंग लखे यांचा मृतदेह मुगट रेल्वे स्टेशनजवळच्या रेल्वे रुळावर सापडला होता. त्यामुळं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. आत्महत्या की घातपात? अशा विविध चर्चा जिल्ह्यात सुरु होत्या. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला होता. आता चौघांच्या शवविच्छेदन अहवालातून विविध चर्चांना पूर्णविराम मिळालाय. शवविच्छेदन अहवालानुसार, रमेश लखे आणि राधाबाई लखे यांचा खून केल्याचं निष्पन्न झालंय. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, उमेश आणि बजरंग यांनी आई-वडील रात्री झोपेत असताना त्यांचा खून केला. त्यानंतर दुचाकीनं मुगट रेल्वे स्टेशन गाठून स्वत:चं जीवन संपवलं.
भावांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल : रमेश लखे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होती. अर्धांगवायूमुळं ते दीर्घकाळ आजारी होते. तसंच त्यांच्याकडं कमी शेतजमीन होती. या आर्थिक विवंचनेतूनच मुलांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेच्या रात्री दोन्ही भाऊ घरातून निघताना गावातील पानटपरी चालकाकडं थांबले होते. आम्हाला बाहेरगावी जायचे आहे, असं त्यांनी पानटपरी चालकाला सांगितलं होतं. या संपूर्ण प्रकरणी बारड पोलिसांनी मयत उमेश लखे आणि बजरंग लखे या दोन्ही भावांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयानं दिली आहे.
हेही वाचा :

