ऐन सणासुदीत केळीचे भाव कोसळले; नांदेड जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात
ऐन सणासुदीच्या काळात केळीचे भाव प्रतिक्विंटल 3100 रुपयांवरून थेट 1100 रुपयांवर कोसळल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड परिसरातील उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेत.

Published : August 29, 2026 at 8:52 PM IST
|Updated : August 31, 2026 at 11:10 AM IST
नांदेड : ऐन सणासुदीच्या काळात केळीचे भाव अचानक कोसळल्याने नांदेड जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरची केळी देशभरात प्रसिद्ध असून, अर्धापूर, नांदेड आणि मुदखेड परिसरात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. या भागातील अनेक शेतकऱ्यांचं संपूर्ण अर्थकारण केळीच्या उत्पादनावर अवलंबून आहे.
सध्या केळीचा हंगाम सुरू असून केळीची काढणी मोठ्या प्रमाणात सुरू झालीय. मात्र, काढणीच्या ऐनवेळी केळीच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दोन महिन्यांपूर्वी याच केळीला प्रतिक्विंटल तीन हजार ते तीन हजार शंभर रुपयांपर्यंत भाव मिळत होता; मात्र आता केळीला केवळ अकराशे ते बाराशे रुपयांचा भाव मिळत असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
केळीच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांना लागवड, खते, औषध फवारणी, सिंचन, मजुरी आणि वाहतूक यांसाठी मोठा खर्च करावा लागतो. मात्र, बाजारात मिळणारा सध्याचा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
केळीचे भाव व्यापाऱ्यांकडून पाडले जात असल्याचा गंभीर आरोप केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केलाय. बाजारातील केळीच्या दरावर कोणाचंही नियंत्रण नसल्यानं व्यापारी मनमानी पद्धतीनं दर ठरवत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. ऐन सणासुदीच्या काळात केळीला चांगली मागणी असतानाही शेतकऱ्यांना मात्र योग्य भाव मिळत नसल्यानं संताप व्यक्त होत आहे. केळीला योग्य दर मिळावा, बाजारभावावर नियंत्रण ठेवावं आणि शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या तुलनेत समाधानकारक भाव मिळावा, अशी मागणी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केलीय.
3 हजारांवरून थेट 1200-1300 रुपयांवर दर : केळीच्या दरातील घसरणीसाठी व्यापाऱ्यांकडून विविध कारणं सांगितली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. युद्धजन्य परिस्थिती, बाजारातील स्थिती आणि केळीच्या गुणवत्तेबाबत कारणं सांगून व्यापारी दर पाडत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, प्रत्यक्ष बागेत केळीची स्थिती चांगली असून, मालामध्ये कोणत्याही मोठ्या प्रमाणात पिकापिकी झालेली नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय.
विशेष म्हणजे, केळीच्या व्यापारावर बाजार समितीचे प्रभावी नियंत्रण नसल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय. यासंदर्भात काही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन चर्चा केली. मात्र, अद्याप ठोस उपाययोजना झाल्या नसल्याची नाराजी शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.
खतं, औषध फवारणी, मजुरी, सिंचन आणि इतर शेती निविष्ठांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. एका शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार, दोन हजार केळीच्या झाडांच्या बागेसाठी तब्बल दीड ते पावणेदोन लाख रुपयांचा खर्च झालाय. मात्र, सध्याच्या दरात या बागेतून मिळणारं उत्पन्न जेमतेम दोन ते सव्वादोन लाख रुपये होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे उत्पादन खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळच बसत नसल्यानं केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. व्यापाऱ्यांच्या मनमानीला आळा घालून केळीला योग्य भाव मिळावा आणि बाजार समिती व प्रशासनानं या व्यवहारावर प्रभावी नियंत्रण ठेवावं, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जातेय.
हेही वाचा -

