ETV Bharat / state

'भाजपाचा खरा चेहरा अजित पवार यांनी उघडकीस आणला'; नाना पटोले यांची टीका, बिनविरोध निवडीवरही केलं भाष्य

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी शिर्डी साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी महानगरपालिका निवडणुकीवर भाष्य केलं.

nana patole saibaba darshan shirdi
माध्यमांशी बोलताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 3, 2026 at 4:45 PM IST

|

Updated : January 3, 2026 at 5:14 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

शिर्डी - नवीन वर्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी, तरुणांसाठी आणि गोरगरीबांसाठी सुखाचं आणि समृद्धीचं जावं तसंच काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात आणि देशात सत्ता मिळावी, असं साकडं काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी साईबाबांच्या चरणी घातलं. यावेळी बोलताना त्यांनी भाजपावर जोरदार टीका केली.

नाना पटोले यांनी घेतलं साईदर्शन - काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी आज शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतलं. साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, "स्थानिक निवडणुका या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांच्या विचारानं लढल्या जातात. त्यामुळं महायुतीची स्वबळावर लढण्याची परिस्थिती आहे. त्यामुळं महाविकास आघाडीत वेगळं काही चित्र राहील असं मला वाटत नाही."

माध्यमांशी बोलताना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नाना पटोले (ETV Bharat Reporter)

आम्ही सर्वधर्म समभावाला मानणारे लोक - "आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत. सर्वधर्म समभावाला मानणारे लोक आहोत. महाराष्ट्रात शाहू-फुले यांचा सर्वसमभावचा विचार होता. त्याच महाराष्ट्रात आम्ही राहतोय. त्यामुळं भाषा वाद, धर्म वाद हा विषय होऊ शकत नाही. काही लोक असे प्रकार करत असतील तर तो त्यांचा विषय आहे, असंही नाना पटोले यांनी सांगितले.

भाजपाचा खरा चेहरा उघड - "उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिद्ध केलं की, भाजपा किती मोठा भ्रष्टाचारी पक्ष आहे. कालपर्यंत आम्ही आरोप करत होतो की, 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे अजित पवार आहेत. तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना सत्तेत घेतलं. उपमुख्यमंत्री केलं आणि अर्थमंत्री करून राज्याच्या तिजोरीची चावी पवारांच्या हातात दिली. 'तुम्ही पैसे लुटा' अशा पद्धतीनं भाजपाचा खरा चेहरा अजित पवारांनी आज उघडकीस आणला," अशी टीका यावेळी नाना पटोले यांनी भाजपावर केली.

महाराष्ट्राचं विद्रुपीकरण करण्याचं काम - महानगरपालिका निवडणूक लागण्याआधीच महायुतीचे 67 उमेदवार बिनविरोध निवडून येत असल्याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, "या प्रकरणी निवडणूक आयोगानं चौकशी सुरू केली आहे. यामध्ये कशा तक्रारी झाल्या आणि दबावतंत्र वापरले गेले हे आपण महाराष्ट्रात पाहतोय. उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी गुन्हे दाखल झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. महाराष्ट्राचे विद्रुपीकरण करण्याचं काम भाजपा करत असून ते महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही."

भाजपा गुंडांचा पक्ष - पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाकडून गुन्हेगारांना तिकीट देण्यात आल्याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की, "भाजपा हा गुंडांचा पक्ष झाला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांचे सरकार असो किंवा राज्यातील भाजपा सरकार असो. यात सगळे गुंड भरले आहेत. हे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे."

हेही वाचा -

  1. विरोधकांचा बिन'विरोध'! योग्य पायंडा म्हणत सत्ताधाऱ्यांनी केलं स्वागत, जाणून घ्या बिनविरोध उमेदवारांची संपूर्ण यादी
  2. चूक झाली माफ करा, मात्र भाजपासोबतच राहा; चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाराज कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मागितली माफी
  3. निवडणूक प्रचाराच्या साहित्यांवर मकरसंक्रांती आणि 'लाडक्या बहिणीं'ची छाप; साडी, मंगळसूत्र, टिकल्या, झुमक्यांना विशेष मागणी
Last Updated : January 3, 2026 at 5:14 PM IST