नागपूरच्या पर्यटक वृद्ध महिलेची काठमांडूत प्रकृती चिंताजनक, एअर ॲम्बुलन्सनं परत आणण्याची कुटुंबीयांची मागणी
नेपाळमधील काठमांडू येथे पशुपतिनाथ मंदिराच्या दर्शनासाठी गेलेल्या नागपूरच्या वृद्ध महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. त्यांना एअर ॲम्बुलन्सनं (Air Ambulance) नागपुरात आणण्याची कुटुंबीयांनी मागणी केलीय.

Published : August 31, 2026 at 3:36 PM IST
|Updated : August 31, 2026 at 7:17 PM IST
नागपूर : पशुपतिनाथ मंदिराच्या दर्शनासाठी नागपुरातून नेपाळला गेलेल्या 115 जणांच्या समूहातील निर्मला पांडे या वृद्ध महिला पर्यटकांची काठमांडूमध्ये अचानक प्रकृती गंभीर झाली आहे. त्यांना उपचारासाठी काठमांडू येथील शहीद गंगालाल नॅशनल हार्ट केअर इन्स्टिट्यूटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिलीय.
निर्मला पांडे यांना हृदयाशी संबंधित गंभीर त्रास जाणवल्यानंतर तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर त्वरित अँजिओप्लास्टी करण्याची आवश्यकता असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. मात्र, रक्तातील साखरेची पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्यानं सध्या अँजिओप्लास्टी करता आलेली नसल्याचं कुटुंबीयांनी सांगितलं. पांडे कुटुंबीयांच्या मदतीसाठी केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी तसेच केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडूनही मदतीचे प्रयत्न सुरू आहेत.
भारतीय दूतावासाने कुटुंबाशी साधला संपर्क : निर्मला पांडे यांच्या प्रकृतीबाबत माहिती घेण्यासाठी नेपाळमधील भारतीय दूतावासाने पांडे कुटुंबीयांशी संपर्क साधला. तसेच, भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी काठमांडूतील रुग्णालयात जाऊन निर्मला पांडे यांच्या प्रकृतीची प्रत्यक्ष विचारपूस केली. निर्मला पांडे यांना लवकरात लवकर एअर ॲम्बुलन्सद्वारे नागपुरात आणून पुढील उपचार उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार नितीन गडकरी यांच्याकडं केलीय.
एअर ॲम्बुलन्सने भारतात आणण्याची मागणी : पशुपतिनाथ मंदिराच्या दर्शनासाठी नागपुरातून 115 जणांचा समूह काठमांडूला गेला होता. त्यापैकी चार जण दिल्लीमार्गे नागपुरात परतले. तर सुमारे 106 प्रवासी बिहारमार्गे रेल्वेने नागपूरला पोहोचले. मात्र, निर्मला पांडे यांची प्रकृती अचानक बिघडल्यानं त्यांना काठमांडूतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्यासोबत त्यांचा 22 वर्षीय नातू आदित्य पांडेही काठमांडूला पोहोचला असून, तो सध्या त्यांच्यासोबत आहे. निर्मला पांडे यांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना तातडीनं भारतात, विशेषतः नागपुरात आणून पुढील उपचार करावेत, यासाठी एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात यावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारनं आवश्यक ती मदत करावी, अशी विनंती रुपेश पांडे यांनी केलीय.
हेही वाचा -

