नागपुरात अवकाळी पावसाचा तडाखा, पुढील पाच दिवस 'असं' असेल हवामान
आज पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे नागपूरकरांची झोप उडाली. वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडं पडल्याची घटना घडली, तर काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला.

Published : February 23, 2026 at 3:39 PM IST
नागपूर : तापमानात वाढ होत असतानाच विदर्भातील अनेक जिल्ह्यांत अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाचा फटका नागपूरला बसला.
सोमवारी (23 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे नागपूरकरांची झोप उडाली. वादळी वाऱ्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडं व फांद्या कोसळल्या, तर काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरकडून विदर्भात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील 5 दिवसांचा हवामान अंदाज : नागपूर जिल्ह्यासाठी पुढील 5 दिवसांचा हवामान आधारित कृषी सल्ला जाहीर करण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागच्या प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरच्या वतीनं 23 फेब्रुवारी 2026 रोजी प्रसारित केलेल्या अंदाजानुसार 23 आणि 24 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर 25, 26 आणि 27 फेब्रुवारी दरम्यान हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
23 फेब्रुवारी रोजी काही ठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वादळी वारं, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शेतमाल सुरक्षित ठेवावा : या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आवश्यक खबरदारीचा सल्ला देण्यात आला आहे. परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, तूर, जवस, मोहरी आदी पिकांची कापणी व मळणी तातडीने पूर्ण करावी. कापणी केलेला शेतमाल उघड्यावर साठवलेला असल्यास तो प्लास्टिक शीट किंवा ताडपत्रीने झाकून सुरक्षित ठेवावा. बाजारात विक्रीयोग्य फळं व भाजीपाला पिकांची काढणी करावी. वादळी वाऱ्याची शक्यता लक्षात घेऊन फळबागा व भाजीपाला पिकांना बांबूचा आधार द्यावा.
मेघगर्जना व विजांच्या कडकडाटाच्या शक्यतेमुळे शेतकरी व शेतमजूर यांनी स्वतःची तसेच पशुधनाची काळजी घ्यावी. मेघगर्जनेची चाहूल लागताच सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा आणि झाडाखाली थांबणं टाळावं.
नागपूर शहराला झोडपलं : तत्पूर्वी, आज पहाटे नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये, विशेषतः चंद्रपूर आणि गडचिरोली इथं वादळी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला होता. मात्र, नागपूर शहरात पहाटेच्या सुमारास जोरदार वादळासह पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसानं शहरातील गोधनी, वर्धा रोड, वाडी ते बेसा परिसरात जोरदार बरसात केली.
अनेक भागांमध्ये वीज पुरवठा खंडित : नागपूरमध्ये सकाळीही अनेक भागांत कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू होता. अचानक तासभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची झोपमोड झाली. वादळामुळे शहरातील अनेक ठिकाणी झाडे व फांद्या उन्मळून पडल्या. वर्धा रोडवर झाड कोसळून एका कारचे नुकसान झाले. तसेच विजेच्या तारा तुटल्यानं काही भागांत वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.
11 मिलिमीटर पावसाची नोंद : झाडं कोसळल्यानं काही ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहनांचेही नुकसान झालं. रस्त्यांवर पडलेली झाडं व फांद्या हटविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सकाळीच धावपळ करावी लागली. पावसामुळे शहरातील खोलगट भागांत पाणी साचलं, तर अनेक ठिकाणी पालापाचोळा विखुरलेला दिसून आला. सकाळी 8:30 पर्यंत शहरात 11 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
हेही वाचा
- मेरी आवाज ही पहचान है! सोशल मीडियाच्या काळात रेडिओचं महत्त्व सांगणारा अवलिया, घरात केलं विविध कंपन्यांच्या रेडिओंचं संकलन
- तरुणीच्या पोटातून 14 किलो वजनाचा ट्यूमर काढला, शस्त्रक्रियेनंतर तरुणीला मिळालं जीवनदान
- अवघ्या 22 मिनिटांत अडीच कोटी रुपयांची घरफोडी, 247 तोळे दागिन्यांसह 65 लाखांवर चोरट्याने मारला डल्ला

