ETV Bharat / state

नागपूरमधील शाळा उडवण्याचा मेल; आज अनेक शाळांना सुट्टी, पालकांमध्ये दहशत

शहरातील शाळांसह जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा आल्यानंतर आज शाळांना सुट्टी देण्यात आली. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलिसांनी केलं.

Nagpur Top School Closed Today
पोलिसांचा बंदोबस्त (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 31, 2026 at 12:15 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : नागपूर शहरातील 18 शाळांसह जिल्हाधिकारी कार्यालय बॉम्ब स्फोटानं उडवून देण्याची धमकी देणारा ई- मेल 18 ऑगस्ट रोजी शाळांना प्राप्त झालेला होता. त्या धमकीच्या ई-मेलमध्ये आज म्हणजे 31 ऑगस्टचा उल्लेख असल्यानं शाळा व्यवस्थापनानं आज शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागपूर पोलीस प्रशासनही अलर्ट मोडवर असून प्रत्येक शाळांमध्ये पोलीस तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलीस उपायुक्त एस सिंगारेड्डी यांनी केलं आहे.

अनेक शाळांना आला धमकीचा मेल : अनेक शाळांमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा धमकीचा ई-मेल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली होती. धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर 18 ऑगस्टला पोलिसांनी शाळांची कसून तपासणी केली. मात्र या तपासणीत काहीही आक्षेपार्ह आढळून आलं नाही. तरीही सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी आणि शाळा व्यवस्थापनांनी आज शाळेला सुट्टी जाहीर केली आहे.

'त्या' धमकीच्या पार्श्वभूमीवर : 18 ऑगस्टला नागपूर शहरातील काही शाळांना धमकीचा मेल प्राप्त झाल्यानंतर शाळांमध्ये खळबळ उडाली. एकाचवेळी नागपूरच्या अनेक शाळा बॉम्ब ब्लास्टनं उडवण्याची धमकी देणारा मेल मिळाल्याची माहिती समोर येताच नागपूर शहर पोलिसांनी तातडीनं दखल घेतली. पोलिसांनी संबंधित सर्वच शाळांमध्ये सुरक्षा तपासणी केली. त्यावेळी त्यात काहीही धोकादायक असं आढळून आलं नव्हतं. नागपूर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधक, नाशक पथकाला घटनास्थळी पाचारण केलं होतं.

तातडीनं वाढवली सुरक्षा व्यवस्था : धमकीचे ई- मेल नेमके कोणत्या शाळांना प्राप्त झालेत, याचा तपशील पोलिसांकडून तपासण्यात आला. यात काही माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. धमकीचा ई-मेल बांगलादेश, फ्रान्समधून पाठवण्यात आल्याची माहिती पुढं आली होती. शाळांमध्ये कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी तातडीनं सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.

कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही : वर्धमान नगर परिसरात असलेल्या एका शाळेत बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे. शाळेतील विविध भागात व वर्गखोल्या आणि परिसराची पाहणी करून कोणतीही संशयास्पद वस्तू आढळते का, याची खातरजमा करण्यात आली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू अथवा स्फोटक पदार्थ आढळून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी किंवा पालकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

ईमेल पाठवणाऱ्याचा शोध सुरू : धमकीचे ई-मेल नेमके कुठून पाठवण्यात आले, त्यामागं नेमका कोणाचा हात आहे. हा प्रकार खोडसाळपणातून करण्यात आला आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. ई- मेलचा स्रोत शोधण्यासाठी तांत्रिक तपासही केला जात आहे. या घटनेमुळे पालकांमध्ये काही काळ चिंतेचं वातावरण निर्माण झालं असलं तरी, पोलिसांकडून परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत आहे. कोणताही धोका पत्करू नये, म्हणून खबरदारीचा उपायासाठी शाळांची तपासणी केली, जात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं.

पोलिसांकडून आवाहन : "धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्यानं नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणतीही संशयास्पद माहिती किंवा वस्तू आढळल्यास स्वतःहून हाताळण्याऐवजी तातडीनं पोलिसांना माहिती द्यावी," असं आवाहन पोलीस उपायुक्त एस सिंगारेड्डी यांनी केलं आहे.

हेही वाचा :

  1. मुंबईच्या महापौरांना धमकीचा ई-मेल, 15 ऑगस्टपूर्वीच बॉम्ब हल्ल्याचा उल्लेख
  2. दिल्ली उच्च न्यायालय, लाल किल्ला, आयजीआय विमानतळाला बॉम्बच्या धमक्या; 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला पाठवलेल्या ईमेलमुळे भीतीचं वातावरण
  3. उपचारासाठी पैसे नसल्याने रचला कट; पुणे हॉस्पिटल बॉम्बसदृश प्रकरणाचा उलगडा