आरएसएस मुख्यालय, स्मृति मंदिर परिसरात 'रेडिओ ऍक्टिव्ह' पदार्थ टाकला, निनावी पत्रानंतर नागपूर पोलीस हाय अलर्टवर!
धमकी देणारं निनावी पत्र नागपूर पोलीस आयुक्तांना प्राप्त झालं आहे. यात आरएसएस मुख्यालयाचा उल्लेख आहे.

Published : April 30, 2026 at 3:57 PM IST
|Updated : April 30, 2026 at 4:54 PM IST
नागपूर - शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल यांच्या नावानं 27 एप्रिलला पोलीस आयुक्त कार्यालयाला एक निनावी पत्र प्राप्त झालं होतं. त्या पत्रातील मजकूर पोलिसांना धडकी भरावणारा आहे. या पत्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल येथील मुख्यालय व रेशीमबागच्या डॉ. हेडगेवार स्मृति मंदिर परिसरात 'रेडिओ ऍक्टिव्ह' पदार्थ टाकल्याचं नमूद आहे. पत्राची पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी गंभीर दखल घेतली आहे.'डीएसएस' नावाच्या संघटनेनं पत्र पोलीस आयुक्तांना पाठवलं असल्याचं समोर आलं.
यासंदर्भात एटीएसनं सदर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगानं एटीएससह सदर पोलीस समांतर तपास करत आहेत. संघ मुख्यालय आणि स्मृति मंदिराला सीआयएसएफचं सुरक्षा कवच आहे.
गेल्याच महिन्यात नागपुरातील सी.ए मार्गवरील दोसरभवन मेट्रो स्टेशनजवळ मोठ्या प्रमाणात स्फोटकं आढळून आली होती. त्या पार्श्वभूमीवर पत्रातील धमकीला पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं आहे. निनावी पत्रात संघ मुख्यालय, स्मृति मंदिर, मेट्रोसारख्या महत्त्वाच्या अनेक ठिकाणी ही 'रेडिओ ऍक्टिव्ह' पावडर टाकल्याचं नमूद आहे. या पत्रात ज्या पावडरचा उल्लेख करण्यात आलाय, ती प्रचंड विनाशकारी असल्याची माहिती आहे.
सुरक्षा व्यवस्था चोख - निनावी पत्र नागपूरच्या पोलीस आयुक्तांना प्राप्त झाल्यानंतर संघ मुख्यालयासह हेडगेवार स्मृति मंदिर आणि शहरातील सर्वच महत्त्वाच्या ठिकाणांवर पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणांचा सुरक्षा आढावाही घेतला जात आहे.

कडक कारवाई होणार - संघ मुख्यालयासंदर्भात धमकीचं पत्र आलं आहे. त्याची सखोल चौकशी सुरू आहे. आधीसुद्धा असा खोडसाळपणा झाला आहे, संपूर्ण सखोल तपास सुरू आहे. संघ मुख्यालयाला या आधीसुद्धा अशा प्रकारच्या धमक्या आलेल्या आहेत. पोलीस दक्ष आहेत. खोडसाळपणा करणाऱ्यांना पोलीस प्रशासन शोधून काढेल व त्यांच्यावरती निश्चित कारवाई केली जाणार असल्याचं गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केलं.

आरोपींचा शोध सुरू - या विषयावर बोलताना नागपूर शहराचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल म्हणाले, "एक पत्र मिळालं असून, त्यामध्ये स्फोट होईल अशी धमकी देण्यात आली. त्या पत्रात 'रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट'बद्दल उल्लेख करण्यात आला असून, घातपात केला जाईल, अशीसुद्धा धमकी देण्यात आली. पोलिसांनी हे पत्र गांभीर्यानं घेतलं असून, हे पत्र कोणी लिहिले आहे? त्यामागे कोण आहे? याचा शोध सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलीस इतरही विभागांची मदत घेत आहेत. त्या पत्रामध्ये नमूद सर्व स्पॉट्स तपासले जात आहेत. तसेच इतर संवेदनशील ठिकाणी बीडीडीएस व इतर पथकांकडून चेकिंग करण्यात येत आहे."

