ETV Bharat / state

नागपूर महापालिका निवडणुकीत अपक्षांना स्वपक्षातच मिळेना मान; अपक्ष उमेदवारी दाखल करताच वधारला भाव

उमेदवारी मिळेल या आशेवर असलेल्या कार्यकर्त्यांनी आधीच अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता त्यांची समजूत काढण्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांना मनधरणी करावी लागणार आहे.

Nagpur Municipal Corporation elections independent candidates
नागपूर महापालिका निवडणुकीत अपक्षांना स्वपक्षातच मिळेना मान (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : January 1, 2026 at 3:16 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर- नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणापर्यंत सर्वच राजकीय पक्षांत प्रचंड नाराजीनाट्य रंगलेलं होतं, त्यातच बंडखोरांनी राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढवण्यास सुरुवात केलीय. भाजपाने बंडखोरांना शांत करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केलेत. मात्र, काँग्रेसने आघाडीत असलेल्या मित्र पक्षांच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसने कुणाशीही आघाडी न करता सर्व 151 जागांवर आपले उमेदवार उभे केलेत, तर भाजपाने शिवसेनेसाठी 8 जागा सोडत 143 जागी आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी मिळेलच याच आशेवर असलेल्या कार्यकर्त्यांनी आधीच अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेला असल्याने आता त्यांची समजूत काढण्यात राजकीय पक्षांच्या नेत्यांना मनधरणी करावी लागणार आहे.

नागपूर महापालिका निवडणुकीत अपक्षांना स्वपक्षातच मिळेना मान (Source- ETV Bharat)

राजकीय पक्षांचे कार्यकर्ते संपूर्ण पाच वर्ष प्रभागात घाम गळतात : खरं तर ही निवडणूक कार्यकर्त्यांना ओळख मिळावी यासाठी असते, असं म्हटलं जातं, त्यामुळेच आपणदेखील नगरसेवक होऊ शकतो ही महत्त्वाकांक्षा बाळगून राजकीय पक्षांचे कार्यकर्ते संपूर्ण पाच वर्ष प्रभागात घाम गळतात. मात्र, ऐन वेळी पक्ष उमेदवारी नाकारतो, त्यावेळी इच्छुकांकडे अपक्ष उमेदवारी दाखल करण्याशिवाय पर्यायच उरत नाही. त्यामुळे हेच इच्छुक अपक्ष उमेदवार यंदा राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढवण्यास सज्ज झालेत. अनेकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिलीय. तर अनेक कार्यकर्त्यांनी नाराजीचा झेंडा बुलंद करत बंडखोरीचे निशाण फडकावलंय.

Nagpur Municipal Corporation elections independent candidates
नागपूर महापालिका निवडणुकीत अपक्षांना स्वपक्षातच मिळेना मान (Source- ETV Bharat)

हलबा समाजाचे प्रतिनिधी नाराज, भाजपाला निवडणूक कठीण जाणार : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघात हलबा समाजाचे मोठे प्राबल्य आहे. मात्र, यंदा भाजपाने माजी नगरसेवकांना उमेदवारी नाकारलीय, त्यामुळेच माजी नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे. अनेकांनी तर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. प्रभाग क्रमांक 20 मधून इच्छुक असलेले भाजपाचे माजी नगरसेवक भास्कर पराते यांनी तर पक्षातील अनेक नेत्यांना धडा शिकवणारच असल्याचा निश्चय पक्का केलाय. जाणीवपूर्वक मला उमेदवारी मिळू नये यासाठी काहींनी प्रयत्न केलेत. त्यांनासुद्धा अद्दल घडवणार असल्याचे ते म्हणालेत. येत्या काही दिवसांत भाजपामध्ये असलेल्या सर्व हलबा समाजातील माजी नगरसेवकांची बैठक घेऊन पक्षाच्या सर्व पदांचे राजीनामा देण्याचा निर्णय घेणार असल्याचे ते म्हणालेत.

...म्हणून राष्ट्रवादीसोबत आघाडी झाली नाही- विकास ठाकरे : शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आघाडी करण्याच्या तयारीत होतो. 12 जागा आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीला देण्याचे ठरले होते. मात्र उत्तर नागपूरमध्ये 4 जागांसाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठा असंतोष उफाळला, कार्यकर्त्यांच्या रोषाकडे पाहून आम्हाला आघाडी थांबवावी लागली आहे, असं काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास ठाकरे म्हणालेत. हायकमांडच्या आदेशानेच कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, म्हणून आघाडी तोडली आणि आमच्या पक्षाच्या 151 कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्याचे विकास ठाकरे म्हणालेत. मित्र पक्षांना सगळ्या बाबी माहीत आहेत, त्यांच्या समोरच सर्व घटनाक्रम घडलाय. भाजपाविरोधी पक्षांना सोबत घेऊन लढावं हा काँग्रेस पक्षाचा आग्रह होता.

मित्र पक्षांनी स्वतःचं आकलन करावे- विकास ठाकरे : उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आधी स्वतःचा चेहरा पाहावा, नागपुरात आपली किती ताकद आहे, त्याचे आधी आकलन त्यांनी करावं आणि किती नगरसेवक आहे ते पाहावे. आपण किती पाण्यात आहोत याच आकलन करावे मग बोलावं. आम्ही लोकसभेत साडेपाच लाख मतं घेतो. विधानसभा जिंकतो, त्यामुळे मित्र पक्षांनी स्वतःचा आकलन करावं, असा टोला काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी लगावलाय.

कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार- भाजपा : नागपूर महानगरपालिकेच्या 151 जागांसाठीचे 1470 उमेदवारी अर्ज दाखल झालेत. यात 700पेक्षा अधिक उमेदवार अपक्ष आहेत, त्यातही सर्वाधिक अपक्ष हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. त्यामुळे इतक्या मोठ्या अपक्षांना शांत करायचे कसे हा मोठा प्रश्न भाजपाच्या नेत्यांसमोर आहे. या संदर्भात शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी सांगितले की,भाजपाकडे सर्वाधिक कार्यकर्त्यांनी उमेदवारी मागितली होती, परंतु ज्या इच्छुकांना उमेदवारी मिळाली नाही, अशा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असणे स्वाभाविकच आहे. मात्र, भाजपा ज्येष्ठ नेत्यांच्या माध्यमातून सर्वांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यकर्त्यांशी आमचे केवळ राजकीय नाही, तर कौटुंबिक ही संबंध आहेत. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याची नाराजी दूर केली जाणार आहे, असं ते म्हणालेत.

हेही वाचाः

नवीन वर्षाची पार्टी महागात! लघुशंकेसाठी गेलेला तरूण 400 फूट दरीत कोसळला, रेस्क्यू टीममुळे वाचला जीव
राहुल नार्वेकर विसरलेत की ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत, संजय राऊतांचा टोला