तिकीट नाकारल्यानं भाजपाच्या आमदार पुत्रास काँग्रेसमध्ये येण्याची काँग्रेस आमदाराची ऑफर, भाजपा आमदार आणि पुत्राचा पलटवार
भाजपानं कृष्णा खोपडे यांचा चिरंजीव रोहित खोपडे यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी सर्व पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली.

Published : January 1, 2026 at 6:58 PM IST
|Updated : January 1, 2026 at 7:42 PM IST
नागपूर - भारतीय जनता पार्टी पक्षाचे जेष्ठ नेते आमदार कृष्णा खोपडे यांच्या चिरंजीवाला भाजपाने उमेदवारी देण्यास नकार दिल्यानंतर रोहित खोपडे यांनी आपल्या सर्व पदाचा राजीनामा दिल्याची पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाली. त्यानंतर ही एक राजकीय संधी असल्याचं ओळखून काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी रोहित खोपडे यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. रोहित खोपडे यांचं काँग्रेस पुनर्वसन करेल, त्यांना पद आणि प्रतिष्ठा देऊ अशी ऑफर अभिजित वंजारीनी दिल्यानंतर आता रोहित याने देखील प्रतिउत्तर दिलं आहे. अभिजित वंजारी हे मानसिक रोगी आहेत, त्यांनी मला ऑफर देण्यापूर्वी स्वतःचं मानसिक आरोग्य तपासून घ्यावं असं म्हटलेलं आहे.
रोहित यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे, याचा अर्थ असा की रोहित नाराज आहे. रोहित हा चांगला मुलगा आहे आणि अशा युवकांची आम्हाला ही गरज आहे. त्यामुळे मी रोहितला काँग्रेस पक्षात येण्याची थेट ऑफर दिलेली असल्याचं काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितलं. यावर आमदार कृष्णा खोपडे आणि रोहित याने संताप व्यक्त केला आहे. अभिजित वंजारी आमच्या घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप आमदार खोपडे आणि रोहित खोपडे यांनी केलाय.
रोहितचा वडिलांवर विश्वास नाही : वंजारी - रोहित खोपडे आमच्या पक्षात येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे. रोहितचे वडील गेल्या चार टर्मपासून पूर्व नागपूरचे आमदार आहेत. मात्र ते जर स्वतःच्या मुलाला न्याय देऊ शकले नसतील म्हणूनच रोहितचा वडिलांच्या नेतृत्वावर विश्वास राहिलेला नसेल असं अभिजित वंजारी म्हणाले आहेत.
आमदार वंजारीचे मानसिक संतुलन बिघडले : रोहित खोपडे - मला आज समजलं की काँग्रेस पक्षाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी मला काँग्रेस पक्षामध्ये येण्याची ऑफर दिलीय. ते रोज हास्यास्पद वक्तव्य करत असल्याचा आरोप रोहित खोपडे यांनी केलाय. पूर्व नागपूर मतदारसंघ हा काँग्रेस मुक्त झालेला आहे. त्यामुळे वंजारी यांनी आधी स्वतःच्याच पक्षाचा विचार केला पाहिजे. माझे नेते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस हे माझा योग्य विचार करतील असंसुद्धा रोहित खोपडे म्हणाले. मी माझ्या पक्षात समाधानी आहे, मी कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नाही हे केवळ काँग्रेसने केलेला अपप्रचार असल्याचा दावा ही रोहित खोपडे यांनी केलाय.
हा आमच्या घरात फूट पडण्याचा प्रयत्न-कृष्णा खोपडेंचा आरोप - काँग्रेस आमदार अभिजीत वंजारी यांनी माझ्या मुलाची चिंता सोडून द्यावी सर्वात आधी त्यांनी स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांची चिंता करावी असा सल्ला भाजपाचे आमदार कृष्ण खोपडेंनी अभिजित वंजारी यांना दिलाय. स्वतः कधीही विधानसभा निवडणूक लढण्याची हिंमत त्यांनी केली नाही आणि ते माझ्या मुलाला महाराष्ट्रात मोठ्या पदावर घेण्याची भाषा बोलत आहेत तर मी त्यांना सांगू इच्छितो की सर्वात आधी त्यांनी काँग्रेस पक्षात गेले अनेक वर्षे मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना मोठं करून दाखवावं.
हेही वाचा...

