ETV Bharat / state

नागपूरच्या श्री हिरा स्वीटवर एफडीएची कारवाई; किचनमध्ये आढळला मृत उंदीर, परवाना निलंबित

नागपूरच्या श्री हिरा स्वीटच्या किचनमध्ये एफडीएला मृत उंदीर आढळला. त्यामुळं उत्पादन बंद करून दुकानाचा परवाना पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करण्यात आला आहे.

Nagpur FDA Action
स्वीट्सच्या किचनमध्ये मृत उंदीर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 8, 2026 at 4:58 PM IST

|

Updated : July 8, 2026 at 6:15 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर : अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) विभागानं संपूर्ण राज्यभरात कारवाईचा धडाका लावलेला आहे. नागपुरातील प्रसिद्ध मिठाई मिष्टान्न भंडार 'श्री हिरा स्वीट'च्या किचनमध्ये चक्क एक मेलेला उंदीर आढळून आल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं 'श्री हिरा स्वीट'वर कारवाई केली. 3 जुलै रोजी एफडीएनं श्री हिरा स्वीटच्या किचनमध्ये धाड टाकली होती. त्यात अनेक त्रुटी आणि मेलेला उंदीर आढळून आला होता. त्यावेळी तत्काळ कारवाई करत एफडीएनं तिथे सुरू असलेले उत्पादनही थांबवलं होतं. मात्र, आता श्री हिरा स्विटच्या कारखान्याचा परवानासुद्धा निलंबित करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचं सहआयुक्त सचिन केदारे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे.



भिंतीजवळ मृत उंदीर आढळला : 3 जुलै रोजी एफडीएने श्री हिरा स्विट प्रायव्हेट लिमिटेडच्या पाचपावली येथील कारखान्यावर कारवाई केली होती. त्यावेळी किचनमध्ये एका भिंतीजवळ मृत उंदीर आढळला होता, शिवाय स्वच्छतेतील त्रुटींची नोंद करण्यात आली होती. सुरुवातीला एफडीएने श्री हिरा स्वीट्सला सर्व उत्पादन थांबवण्याचे आदेश दिले होते. तसंच एफडीएने त्यांचा परवाना पुढील आदेश येईपर्यंत निलंबित केल्याची माहिती सहाय्यक आयुक्त अनिल सदार यांनी दिली.

माहिती देताना सहायक आयुक्त अनिल सदार (ETV Bharat Reporter)


आधी नोटीसनंतर परवाना निलंबित : एफडीएच्या एका पथकाने 3 जुलै रोजी श्री हिरा कारखान्याची नियमित तपासणी केली. यावेळी एका भिंतीजवळ मृत उंदीर आढळला. हा उंदीर उत्पादन साहित्याच्यापासून दूर असल्याची नोंद अधिकाऱ्यांनी केली. याशिवाय काही ठिकाणी धूळ आणि घाण, काही भांड्यांना गंज, लोखंडी पत्र्यांवर गंज तसेच स्वच्छतेशी संबंधित इतर त्रुटीही निदर्शनास आल्या. अधिकाऱ्यांनी आवश्यक नोंदी करून त्या कंपनीला तत्काळ नोटीस बजावली होती.



दोन भावांची मालकी : श्री हिरा स्विटची मिठाई आणि नमकीन विक्री देशासह परदेशातील काही बाजारपेठांमध्येही केली जाते. त्यामुळंच कारवाईची माहिती उघड झाल्यानंतर मिठाई उद्योगात खळबळ उडालेली आहे. श्री हिरा स्विटच्या सध्या दोन स्वतंत्र फर्म आहेत. त्या दोन भावांच्या मालकीच्या आहेत. सध्या कारवाई पाचपावली येथील एका उत्पादन युनिटपुरतीच मर्यादित आहे. दुसऱ्या भावाच्या उत्पादन युनिटचा कारवाईशी संबंध नसल्याची माहिती पुढे आली. शहरातील विक्री केंद्रांबाबत या आदेशात कोणताही उल्लेख नाही.



...तर कारवाई मागे घेतली जाईल : एफडीएच्या निर्देशानुसार, या कंपनीला उत्पादन युनिटमधील नमूद करण्यात आलेल्या त्रुटी दूर कराव्या लागतील. त्यानंतर कंपनी अपील करू शकते. त्याच्या अपीलवर एफडीएच्या आयुक्तांकडं सुनावणी होईल, पुन्हा तपासणी करण्यात येईल. आवश्यक सुधारणा झाल्याचं आढळल्यानंतर नियमानुसार परवाना निलंबन मागे घेतला जाऊ शकतो अशी माहिती एफडीएकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा -

  1. मुंबईतील मोहरम मिरवणुकीत घातपाताचा मोठा कट उधळला; ‘पेन किलर’ सांगून उंदीर मारण्याच्या गोळ्यांचं वाटप
  2. नाटकाच्या प्रयोगावेळी महिलेच्या साडीत शिरला उंदीर; पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात घडली घटना
  3. Opposition Protested Against Government : 'बजेटचा डोंगर, निघाला उंदीर...' अश्या आगळ्यावेगळ्या घोषणांनी विधान भवन दणाणले
Last Updated : July 8, 2026 at 6:15 PM IST