नीरा नदीत आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, मुलीवरील अत्याचाराचा बदला घेण्यासाठी तरुणाची हत्या; दाम्पत्यासह मुलगा, सुनेला अटक
नीरा नदीपात्रात आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलण्यात फलटण ग्रामीण पोलिसांना यश आलंय. तो मृतदेह माण तालुक्यातील एका तरुणाचा होता. त्याची हत्या झाल्याची घटना तपासात समोर आलीय.

Published : March 1, 2026 at 12:53 PM IST
सातारा - फलटणमधील नीरा नदीपात्रात मृतदेह आढळून आलेल्या अंकुश बापू नरबट (22, रा. ढाकणी, ता. माण) याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना तपासात उघड झालीय. मृत तरुणाने अत्याचार केलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनीच त्याचा खून करून मृतदेह नदी पात्रात टाकला होता. या प्रकरणी एका दाम्पत्यासह त्यांचा मुलगा आणि सुनेला फलटण ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय. 'मृत तरुण हा स्त्री लंपट होता', या एका माहितीवरून फलटण पोलिसांनी तरुणाच्या हत्येचा पर्दाफाश केलाय.
वाच्यता न करता बदला घेण्यासाठी हत्येचा कट रचला : ज्ञानेश्वर भरतराव भगत, अर्चना ज्ञानेश्वर भगत, आविष्कार ज्ञानेश्वर भगत, श्रद्धा आविष्कार भगत (रा. पिंप्रद, ता. फलटण) यांना तरुणाच्या खून प्रकरणात अटक करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी दिली आहे. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल अशा पद्धतीनं संशयितांनी कट रचून हा गुन्हा केला आहे. मृत तरुणाने संशयित आरोपींच्या कुटुंबातील मुलीवर अत्याचार केला होता. परंतु, खोट्या प्रतिष्ठेपायी त्यांनी कोठेही वाच्यता न करता बदला घेण्यासाठी त्याच्या हत्येचा कट रचला.
इन्स्टाग्रामवरून मैत्री करीत प्रेमाच्या जाळ्यात ओढले : मृत अंकुश नरबट याला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्लॅन संशयितांनी आखला, त्यासाठी महिलेच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम अकाऊंट उघडले. इन्स्टाग्रामवरून त्याच्याशी मैत्री करत त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 15 ऑक्टोबर रोजी त्याला फलटणला भेटायला बोलाविले. तो आल्यानंतर आरोपींपैकी एका महिलेने त्यास एकांतात वेळ घालविण्याच्या बहाण्याने तातमगिरी डोंगराच्या पायथ्याला निर्जनस्थळी नेले.
अंकुशला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण : हत्येच्या कटानुसार बाकीचे संशयित आरोपी वेगवेगळ्या वाहनातून त्या ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांनी अंकुशला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. नंतर चारचाकी वाहनामध्ये घालून पिंप्रद (ता. फलटण) गावच्या हद्दीतील निर्जनस्थळी नेऊन त्याचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह गोखळी गावच्या हद्दीतील नीरा नदीच्या पात्रात टाकला. पाण्यात आढळलेल्या मृताच्या डोक्यावरील जखमांमुळे घातपाताची शक्यता बळावली. पोलिसांच्या हाती कोणतेही धागेदोरे नव्हते. मृत तरुण स्त्री लंपट होता, या एका माहितीवरून फलटण पोलिसांनी हत्येचा गुन्हा उघडकीस आणला.
संशयितांना फलटण न्यायालयात हजर केले जाणार : तरुणाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांना फलटण न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी दिलीय. कोणतेही धागेदोरे नसताना फलटणचे डीवायएसपी विशाल खांबे, पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे उपनिरीक्षक दीपक पवार, अंमलदार नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम, वैभव सूर्यवंशी, हणमंत दडस यांनी हा गुन्हा उघडकीस आणलाय.
हेही वाचाः
नागपुरातील एसीबीएल एनर्जी लिमिटेड कंपनीत झालेल्या स्फोटात 12 ते 15 कामगार ठार

