बेवारस समजून हिंदू स्मशानभूमीत दफन केला मुस्लिम इसमाचा मृतदेह; न्यायालयाच्या आदेशानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन
मृतकाच्या नातेवाईकांनी आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याकडे अर्ज केला होता. सज्जाद खान असे त्या मृत इसमाचे नाव असून, ते नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे रहिवासी होते.


Published : March 3, 2026 at 4:40 PM IST
नागपूर- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशाने हिंदू स्मशानभूमीत दफन असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा मृतदेह सुरक्षितरीत्या उत्खनन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलाय. त्यानंतर मुस्लिम पद्धतीनं मृतदेहाचा दफनविधी नाशिक येथील मालेगाव येथे पार पडला आहे. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या पुढाकाराने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आलीय. मृतकाच्या नातेवाईकांनी आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्याकडे अर्ज केला होता. सज्जाद खान असे त्या मृत इसमाचे नाव असून, ते नाशिक जिल्ह्यातील मालेगावचे रहिवासी होते.
संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आणि सुरक्षित पद्धतीने पार : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर आणि सुरक्षित पद्धतीने पार पाडण्यात आलीय. मृत व्यक्ती मूळ रहिवासी मालेगाव येथील असून, ते नागपूर येथे ताजाबाग दर्ग्यात दर्शनासाठी आले होते. 27 जानेवारी रोजी रेल्वे प्रवासादरम्यान बुट्टीबोरी परिसरात रेल्वेमधून पडल्याने त्यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला होता.
नातेवाईकांनी शोध सुरू केल्यानंतर झाला खुलासा : अपघातानंतर पोलिसांना मृत व्यक्तीची ओळख पटली नाही. त्यामुळेच त्यांना अनोळखी व्यक्ती समजून मोक्षधाम घाट येथे हिंदू स्मशानभूमीत दफन करण्यात आला होते. नातेवाईकांनी शोध घेतल्यानंतर बाब महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून अध्यक्ष प्यारे खान यांनी तात्काळ दखल घेतली. त्यांच्या पुढाकाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. न्यायालयाच्या आदेशानुसार मृतदेहाचे सुरक्षित उत्खनन करण्यात आले आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आलाय.
मूळगावी मालेगाव येथे झाला दफनविधी : त्या मृत व्यक्तीचा दफनविधी त्यांच्या मूळ गावी मालेगाव येथे मुस्लिम रितीरिवाजानुसार पार करण्यात आलाय. या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे विशेष कार्यकारी अधिकारी मुस्ताक पठाण तसेच अधिवक्ता अॅड. ताबीर यांनी उपस्थित होते. या घटनेमुळे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची मानवी संवेदना, कायदेशीर बांधिलकी आणि अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांसाठी केलेले कार्य अधोरेखित झालंय.

