मुंबईकरांनो सुट्टीचा रविवार म्हणून घराबाहेर पडताय? आधी जाणून घ्या ही माहिती
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा तडाखा आज देखील तसाच सुरू असणार आहे. यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडणं टाळायला पाहिजे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Published : July 5, 2026 at 10:47 AM IST
मुंबई - मुंबईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारतीय हवामान खात्याने (IMD) बृहन्मुंबई क्षेत्रात आज रविवार 5 जुलै 2026 रोजी अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा दिला आहे. यामुळे संपूर्ण रविवार मुंबईभर धो धो पाऊस पडणार आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा तडाखा आज देखील तसाच सुरू असणार आहे. यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडणं टाळायला पाहिजे, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
नागरिकांनी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे : मिळालेल्या माहितीनुसार, आज रविवारदरम्यान मुसळधार ते अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता IMD ने वर्तविली आहे. यामुळेच मुंबई शहरासह मुंबई उपनगर या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे आज मुंबईची लाईफलाईन म्हणवणारी मुंबई लोकलदेखील उशिराने धावत आहे. याचबरोबर आज दुपारी रविवारी 3.22 वाजता समुद्राला 4.19 मीटर उंचीची भरती येणार आहे, यामुळे समुद्रकिनारी जाणं देखील नागरिकांनी टाळावं. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहावे आणि अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलंय.
लोकल उशिरानं धावतायत : रविवार हा सुट्टीचा दिवस असला आणि रविवारी जास्त गर्दी ही लोकलला होत नसली तरी देखील मुंबई लोकल ही सतत कोसळणाऱ्या पावसामुळे उशिराने धावत आहे. मध्य रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिराने धावत आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे व हार्बर लाइन रेल्वे तिन्ही मार्गिकेवरील लोकल उशिराने धावत आहेत.
पावसाची आकडेवारी काय सांगते? : मुंबईत वर्षभरात सुमारे 2318 मिलीमीटर पाऊस पडतो. तर जुलै महिन्यात साधारणपणे 800 मिलीमीटर इतका पाऊस होतो. मागील चार दिवसांपासून बृहन्मुंबई क्षेत्रात संततधार पाऊस कोसळत आहे. या चार दिवसांत मुंबईत सुमारे 588 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण 74 टक्के इतके आहे. तर 3 ते 4 जुलै 2026 या 24 तासांच्या कालावधीत मुंबईत सुमारे 250 ते 300 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हे प्रमाण वार्षिक हंगामी पावसाच्या 25 टक्के आणि जुलै महिन्याच्या 40 टक्के इतके आहे. मागील 24 तासांत मुंबई उपनगरातील विक्रोळी येथे सर्वाधिक 316 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, ही मागील वर्षातील सर्वोच्च नोंद आहे, असे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे.
हेही वाचाः

