पावसानं उडवली दाणादाण : मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरीतील शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी
मुंबईत मुसळधार पावसानं मोठा हाहाकार उडाला आहे. भारतीय हवामान विभागानं उद्या ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, रत्नागिरीमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.


Published : July 5, 2026 at 10:20 PM IST
|Updated : July 5, 2026 at 10:33 PM IST
मुंबई : रत्नागिरी, ठाणे आणि मुंबईतील सर्व शासकीय खासगी, महानगरपालिका शाळा व महाविद्यालयांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागानं मुंबई महानगराला सोमवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट तसेच सोसाट्याचे वारे वाहतील असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शासकीय, खासगी शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती महानगरपालिका प्रशासनानं दिली आहे. दुसरीकडं शासकीय व खासगी कार्यालय नियमितपणे सुरूच राहतील. आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, असं आवाहन देखील मुंबई महानगरपालिकेनं केलं आहे.

142 झाडे, फांद्या पडण्याच्या घटनांच्या नोंदी : बृहन्मुंबई क्षेत्रात म्हणजेच मुंबई शहर व उपनगरामध्ये विविध भागांमध्ये गेल्या 24 तासांमध्ये सुमारे 150-170 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ताशी 72 ते 75 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे बृहन्मुंबई क्षेत्रामध्ये झाडं किंवा फांद्या पडण्याच्या एकूण 142 घटनांची नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे दहा हजार अधिकारी, कर्मचारी शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीही आपल्या कार्यक्षेत्रात काम करत असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेनं दिली आहे. याचबरोबर वरिष्ठ अधिकारी देखील प्रत्येक घडामोडीवर सातत्यानं बारकाईनं लक्ष ठेवून असल्याचंही यावेळी सांगण्यात आलं.
आज घडल्या 3 दुर्दैवी घटना : कुर्ला कमानी इथं गोम्स टाऊन इमारती जवळील दुकानावर झाडांची फांदी तुटून युनूस कुंदावाला वय 63 या व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसरीकडं आरे कॉलनीमध्ये युनिट 16 हद्दीत झाड कोसळून कुमार हसन रजा जहांगीर आलम सईद या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर आरे डेअरी जवळ खान अब्दुल गफारखान मार्गावर तीन मजली रिकामं असलेलं बांधकाम पडल्याची देखील नोंद झाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
ठाण्यातील शाळांनाही सुट्टी : मुंबई प्रमाणंच ठाणे जिल्ह्यासाठी भारतीय हवामान विभागानं उद्या ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या तसेच प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना उद्या सोमवारी सुट्टी जाहीर केली आहे. जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी रात्री उशिरा परिपत्रक प्रसिद्ध केलं. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन विभाग तसेच संबंधित विभागांना सतर्क राहण्यास सांगितलं असून नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये असं, आवाहन ठाणे महापालिका प्रशासनानं केलं आहे.
रत्नागिरीमध्ये नद्यांनी ओलांडली इशारा पातळी : रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सततच्या पावसामुळे जगबुडी नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यानं शहराला पुराचा धोका निर्माण झाला. तर वाशिष्ठी नदीनंही इशारा पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यातील बिघडलेली पूरस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
हेही वाचा :

