ETV Bharat / state

डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणातील आरोपी अनंत गर्जे यांना जामीन मंजूर

याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीनं आपलं आरोपपत्र काही दिवसांपूर्वीच न्यायालयात दाखल केलंय.

Mumbai sessions court grants bail to Anant Garje in wife suicide abetment case
मुंबई सत्र न्यायालय (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 23, 2026 at 8:40 PM IST

|

Updated : February 23, 2026 at 9:03 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : डॉ. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि त्यांचे पती अनंत गर्जे यांना मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीनं आपलं आरोपपत्र काही दिवसांपूर्वीच न्यायालयात दाखल केलंय. त्यामुळं याप्रकरणातील तपास पूर्ण झालेला असून आरोपीला आणखी कस्टडी देण्याची गरज नाही, असं न्यायालयानं हा जामीन देताना स्पष्ट केलंय. तसंच कोणत्याही साक्षीपुराव्यांशी छेडछाड करू नये, पोलिसांना तपासात पूर्ण सहकार्य करावं आणि खटल्याला नियमित हजेरी लावावी, या अटीशर्तींसह न्यायालयानं हा जामीन मंजूर केलाय. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रुपाली जयसिंग-पवार यांनी हा जामीन मंजूर केला. दरम्यान, याप्रकरणी गर्जे कुटुंबीयांविरोधात कोणताही पुरावा नसल्याचं कबूल करत मुंबई पोलिसांनी याप्रकरणी केवळ भाजपाच्या कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडे यांचे खाजगी सहाय्यक अनंत गर्जे या एकमेव आरोपी विरोधात आपलं आरोपपत्र दाखल केलंय.


अनंत गर्जे तपासात पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा : या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे गेल्यानंतरही अनंत गर्जे चौकशीत पूर्ण सहकार्य करत असल्याचा दावा अनंत गर्जे यांच्यावतीनं जामीन अर्जातून करण्यात आलाय. "ईटीव्ही भारत"शी बोलताना अनंत गर्जे यांचे वकील मंगेश देशमुख यांनी सांगितलं की, "डॉ. गौरी यांच्या मृत्यूमागचं सत्य काय आहे?, ते लवकरच पुराव्यांनिशी सिद्ध होईल. याप्रकरणी अनंत गर्जे यांच्यावर जे आरोप होतायेत त्यात काहीही तथ्य नाही. या आत्महत्येमागे काही कौटुंबिक कारणं आहेत, प्रत्येक घरात काही ना काही वाद असतात. मात्र कधीकधी ते विकोपाला जातात. त्यातून एखाद्यावर हत्या केल्याचा आरोप लावणं चुकीचं आहे. याप्रकरणी सुरूवातीला अनंत गर्जेंनीच ही हत्या केल्याचे आरोप झाले. मात्र फॉरेन्सिकचे पुरावे आणि अत्याधुनिक पद्धतीनं केलेला तपास यातून ही हत्या नाही तर आत्महत्या असल्याचा पोलिसांनीच निष्कर्ष काढला. गौरी आणि अनंत गर्जे या दोघांनाही एकमेकांच्या पूर्वआयुष्याची पूर्ण माहिती होती. जबाब नोंदवलेल्या साक्षीदारांनीही या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. मात्र तरीही अनंत गर्जे यांचं चारित्र्यहनन करण्यात आलं," असा दावा अनंत गर्जे यांचे वकील मंगेश देशमुख यांनी सांगितलं.

वकील मंगेश देशमुख यांची प्रतिक्रिया (ETV Bharat Reporter)


अनंत गर्जे यांच्या जामीनाला एसआयटीचा विरोध होता : दरम्यान, या प्रकरणात अनंत गर्जे यांच्या जामीन अर्जाला तपास यंत्रणेकडून विरोध करण्यात आला होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या एसआयटीनं आपलं 1054 पानांचं आरोपपत्र 28 जानेवारी रोजी मुंबई सत्र न्यायालयात दाखल केलंय. त्यामुळं पोलिसांचा तपास पूर्ण झाला असून आता आरोपीकडे चौकशीसाठी काहीही उरलेलं नाही. तसंच याप्रकरणातील तपास पूर्ण झाल्यामुळं आता अनंत गर्जे यांना जामीन मंजूर करावा. त्यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य केलेलं आहे, असा दावा त्यांचे वकील मंगेश देशमुख यांनी न्यायालयापुढे केला. अनंत गर्जे यांच्या जामीनाला तपासयंत्रणेच्यावतीनं मात्र जोरदार विरोध करण्यात आला होता. आरोपीनं तपासात सहकार्य केलेलं नाही, त्यांची राजकीय पार्श्वभूमी पाहता ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, तसंच पुराव्यांशी छेडछाडही करू शकतात. एका महिला डॉक्टरच्या आत्महत्येचं प्रकरण असल्यामुळं घटना अतिशय संवेदनशील आहे, अशी भूमिका घेत एसआयटीनं या जामीनाला विरोध करताना घेतली होती.


अनंत गर्जे यांच्या कुटुंबीयांना क्लीन चीट : याप्रकरणी अनंज गर्जेंसोबत त्यांची बहीण शीतल गर्जे-आंधळे व भाऊ अजय गर्जे यांनाही मुंबई पोलिसांनी एफआयआरमध्ये आरोपी बनवलं होतं. या सर्वांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108, 85, 352 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यानंतर हे दोघेही फरार झाले होते. त्यांचा शोध घेत असतानाच या दोन्ही फरार आरोपींना मुंबई सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर करत मोठा दिलासा दिला होता. दरम्यान, डॉ. गौरी पालवे यांनी त्यांच्या राहत्या घरात आत्महत्या केल्यानंतर त्यांचा पती अनंत गर्जे यांना अटक केली होती. मात्र पुढील तपासात डॉ. गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिसांना अनंत गर्जे व्यतिरिक्त कुणाविरोधातही ठोस पुरावे सापडले नाहीत, असं पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात नमूद केलंय. मुंबई पोलिसांनी याप्रकरणी एकूण 111 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र डॉ. गौरी पालवे यांची नणंद शीतल गर्जे-आंधळे आणि दीर अजय गर्जे यांच्याविरोधात कोणताही पुरावा सापडला नाही, असं स्पष्ट करत त्यांचा या आरोपपत्रात समावेश करण्यात आलेला नाही.

हेही वाचा :

  1. शरद पवार यांच्या तब्येतीबाबत डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती, कधी मिळणार डिस्चार्ज?
  2. 'बांबू कसा लावायचा आम्हाला सांगत चला'; खासदार अशोक चव्हाण यांचा टोमणा कोणाला?
  3. 'नरेंद्र-देवेंद्र महोत्सवा'त अशोक चव्हाण यांना 'नांदेड भूषण' पुरस्कार; कर्जमाफीवर सरकारची भूमिकादेखील केली स्पष्ट
Last Updated : February 23, 2026 at 9:03 PM IST