'इन्फ्रामॅन हरवला' म्हणत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं; मुसळधार पावसामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभराकरिता स्थगित
मुंबईसह परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि हवामान विभागानं दिलेल्या 'रेड अलर्ट'च्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं आहे.

Published : July 6, 2026 at 2:00 PM IST
मुंबई - "हरवला, हरवला, इन्फ्रामॅन हरवला" असे नारे देत विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी विरोधकांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. भारतीय जनता पक्ष आणि महायुती कमिशन घेऊन नागरिकांचा जीव घेत असल्याचा यावेळी आरोप विरोधकांनी केला.
तुमच्या सत्तेत तुम्ही काय दिवे लावले? : याविषयी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अंबादास दानवे म्हणाले की, जीर्ण इमारतीचं ऑडिट करणं ही मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी असते. मात्र, याकडं मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी संपूर्णतः दुर्लक्ष केलं आहे. मानखुर्दमध्ये झालेल्या घटनेला संपूर्णतः सत्ताधारीच जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी इतके वर्ष मुंबई महानगरपालिकेत काय केलं? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. मात्र, तुमच्या सत्तेत तुम्ही काय दिवे लावले? असा सवाल यावेळी अंबादास दानवे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना विचारला.
मिसिंग लिंकच्या सुरुवातीलाच दरड कोसळली : मुंबईतील माणसाला मुंबईमध्ये चालता येत नाही. चालायला भीती वाटते आहे. सरकारनं याकडं त्वरित लक्ष देणं गरजेचं आहे. दुसरीकडं मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या सुरुवातीलाच दरड कोसळली आहे. स्वतःला इन्फ्रामॅन म्हणून घेणारे लोक आज कुठे आहेत, असा प्रश्न यावेळी अंबादास दानवे यांनी विचारला.
नैसर्गिक परिस्थिती, राजकारण कोणीही करू नये : दुसरीकडं याविषयी बोलताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, "मुंबई-पुणे रस्ता बंद करण्यामागे जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आला आहे. कनेक्टिंग लिंकमधून दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. हे नैसर्गिक परिस्थिती आहे. याचं कोणीही राजकारण करू नये."
पत्र देऊनही वॉर्ड ऑफिसरने काम केलेलं नाही : मुंबईमध्ये झाड पडून मृत्यू झालेल्या घटनेविषयी बोलताना मुंबईचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष, आमदार अमित साटम यांनी म्हणाले की, "वॉर्ड ऑफिसरला कित्येकदा पत्र देऊनही वॉर्ड ऑफिसरनं काम केलं नाही. वॉर्ड ऑफिसरवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा लागेल, असे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आले आहेत. प्रशासन काय करतंय? याकडं आमचं लक्ष आहे. झालेल्या घटनेची जबाबदारी ही प्रशासनाचीच आहे. त्यांना कोणताही प्रकारे कव्हर केलं जाणार नाही. प्रशासन अलर्ट मोडवर राहिले पाहिजे, असं यावेळी निर्देश देण्यात आले आहेत".
आजचे विधानसभा कामकाज स्थगित : मुसळधार पावसामुळे विधानसभेचं आजचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे. याची घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळात केली. दुसरीकडे दुपारी यापेक्षा अधिक गंभीर परिस्थिती उद्भवू शकते. यामुळं नागरिकांनी प्रवास टाळावा आणि घराबाहेर पडू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
मिसिंग लिंकचे उद्घाटन झाल्यानंतर सोशल मीडियात इन्फ्रामॅन म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक करण्यात आलं होतं. दोघांमध्ये मिसिंग लिंकचे श्रेय घेण्यावरून तसेच 'इन्फ्रामॅन' म्हणवून घेण्यात स्पर्धा सुरू असल्याचा त्यावेळी विरोधकांनी आरोप केला होता.
हेही वाचा -

