ETV Bharat / state

सलग तिसऱ्या दिवशी मुंबईची 'तुंबई'; लोकल रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं, चाकरमान्यांचे हाल

मुंबईमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे मुंबईची लाईफ लाईन असणाऱ्या लोकलचं वेळापत्रक देखील कोलमडलं आहे.

Mumbai Rain Update
सलग तिसऱ्या दिवशी मुंबईची 'तुंबई' (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : July 3, 2026 at 9:04 AM IST

|

Updated : July 3, 2026 at 10:53 AM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : मायानगरी मुंबईमध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे सखल भागात पाणी शिरायला सुरुवात झाली असून मुंबईची लाईफ लाईन असणाऱ्या लोकलचं वेळापत्रक देखील कोलमडलं आहे. मुंबई शहरासह पश्चिम आणि पूर्व उपनगरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, वांद्रे, घाटकोपर, भांडुप, कुर्ला या सर्व ठिकाणी रात्रभर पाऊस सुरू आहे. यामुळे या ठिकाणच्या सखल भागामध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली आहे. दरम्यान मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे आज सकाळच्या सुमारास बंद करण्यात आला आहे.

मुंबईत रात्रभर पावसाची संतधार सुरू : मुंबईत रात्रभर पावसाची संतधार सुरू असल्यामुळे याचा फटका थेट मुंबईच्या लोकल सेवेला बसला आहे. मध्य रेल्वेवरची लोकल वाहतूक दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावत असून पश्चिम रेल्वे वरची लोकल वाहतूक पाच मिनिटे उशिरा धावत आहे. हार्बर लाइन देखील दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावत आहे. यामुळे सकाळच्या वेळी सर्वसामान्य मुंबईकरांचे चांगलेच हाल होताना पाहायला मिळत आहेत.

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा : राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानं नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. पाण्यानं भरलेले रस्ते आणि पूल ओलांडणं टाळण्याचं, झाडं व कमकुवत इमारतींपासून दूर राहण्याचं तसेच केवळ अधिकृत हवामान विभाग आणि प्रशासनाच्या सूचनांवरच विश्वास ठेवण्याचं आवाहन केलं आहे. मच्छीमारांनाही समुद्र खवळलेला असल्यानं पुढील सूचना मिळेपर्यंत समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील पावसाची परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत तातडीनं मदत उपलब्ध करून देण्यासाठी नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत आहेत.

हेही वाचा :

  1. मुंबईत पावसामुळे लोकल ट्रेन सेवेवर परिणाम; अनेक भागांमध्ये पाणी साचले, पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट
  2. मुंबई, ठाणे, पालघरला रेड अलर्ट; विदर्भातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, अनेक भागांतील शाळांना सुट्टी
  3. मुंबईत साकीनाक्यावर मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू; नक्की काय घडलं
Last Updated : July 3, 2026 at 10:53 AM IST