कबुतरांमुळे आरोग्याला धोका! बोरिवली गोराईसह मुलुंड येथील प्रस्तावित कबुतरखान्याला मनसेचा विरोध
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं बोरिवली गोराईसह मुलुंड येथील प्रस्तावित कबुतरखान्याला विरोध केला आहे. बृहन्मुंबई महापालिकेनं निर्णय रद्द न केल्यास तीव्र आंदोलन करणार असल्याचा मनसेनं इशारा दिला.

Published : November 10, 2025 at 9:46 AM IST
मुंबई - कबुतरखान्यावर मुंबई उच्च न्यायालयानं बंदी घातल्यानंतर भूतदया म्हणून अन्य ठिकाणी नवे कबुतरखाने सुरू करण्यास जागा द्यावी, अशी मागणी जैन समाजाच्या वतीनं पालिकेकडे करण्यात आली. त्यानुसार बृहन्मुंबई महापालिकेनं बोरिवली गोराई आणि मुलुंड परिसरात कबुतरखान्यासाठी जागा निश्चित केली आहे. मात्र, या प्रस्तावित कबुतरखान्याला मनसेच्यावतीनं तीव्र विरोध करण्यात आला.
कबुतरांमुळे मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महानगरपालिकेला कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, या बंदीविरोधात जैन समाज आक्रमक झाल्यानंतर न्यायालयानं मुंबई महापालिका प्रशासनाला लोकवस्तीपासून दूर ठिकाणी कबुतरखानासाठी पर्यायी जागा सूचवण्याचे निर्देश दिले. यानंतर पालिका प्रशासनानं कबुतरांना खाणे देण्यासाठी मुंबईतील काही ठिकाणे निश्चित केली. यात बोरिवली गोराई आणि मुलुंड इथल्या पालिकेच्या जागेचा समावेश आहे. या जागा कबुतरखान्यासाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती मिळताच विरोधात मनसेनं थेट आंदोलनाचा इशारा पालिकेला दिला आहे.
या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते आणि वकील सागर देवरे यांनी सांगितलं की, “पालिकेचा हा निर्णय मुलुंड वासियांच्या आरोग्याशी खेळणारा आहे. ही बाब आम्ही पालिकेच्या निदर्शनास आणून देणार आहोत. आमच्या अपेक्षांकडे पालिका दुर्लक्ष करणार नाही, अशी आम्हाला आशा आहे. तरीदेखील, पालिकेनं आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर आम्ही या प्रस्तावित जागांच्या ठिकाणी जाऊन आंदोलन करू. तसेच या निर्णयाविरोधात न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहोत."
ज्याठिकाणी पालिका कबुतरखाना तयार करू इच्छिते, त्या परिसरात किमान २० -२५ हजार लोक राहतात. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण होत आहे. पालिकेनं हा निर्णय रद्द न केल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्यात येईल-कबीरदास मोरे, बोरिवली विधानसभा विभाग अध्यक्ष
सविस्तर माहिती सार्वजनिक करा-कबुतरांच्या विष्ठेमुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरुन नागरिकांना आरोग्यविषयक त्रास होत असल्याचं मनसेचे बोरिवली विधानसभा विभाग अध्यक्ष कबीरदास मोरे यांनी म्हटलं आहे. पालिकेनं कबुतरांची अनियंत्रित वाढ थांबवण्यासाठी धोरण आखण्याची मागणी मोरे यांनी केली आहे. हा प्रस्ताव कोणाच्या पुढाकाराने ठेवला गेला? त्यामागील कारणमीमांसा काय? याबाबतही सविस्तर माहिती सार्वजनिक करण्याचं आवाहन मोरे यांनी पालिकेला केलं आहे. तर पालिकेच्या या निर्णयाविरोधात स्थानिक नागरिकांकडूनदेखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं नागरिकांसोबत मिळून हा प्रश्न न्याय्य मार्गानं सोडवण्याचा निर्धार व्यक्त केला असल्याचं मोरे यांनी सांगितलं.
हेही वाचा-

