पावसाळ्यात आजारांपासून बचावासाठी काय कराल? BMC ने दिल्या महत्त्वाच्या आरोग्य सूचना
पावसाळ्यात नागरिकांनी काय काळजी घ्यावी? याबाबत मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी काही सुचना केल्या आहेत.

Published : July 4, 2026 at 7:39 AM IST
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असून, या काळात संसर्गजन्य आजारांचा धोका वाढत असल्यानं नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी केलं आहे. 'ईटीव्ही भारत'शी बोलताना हरीश भांदिर्गे म्हणाले की, पावसाळ्यात सर्वप्रथम पिण्याचं पाणी उकळूनच प्यावं. अशुद्ध पाण्यामुळे शरीरात जंतू प्रवेश करून विविध आजार होण्याची शक्यता असते. तसेच उघड्यावर मिळणारे अन्नपदार्थ खाणं टाळावं.
पावसाळ्यात काय काळजी घ्यावी? : याशिवाय घरात आणलेल्या भाज्या स्वच्छ धुऊनच शिजवाव्यात. पावसाळ्यात स्वच्छता आणि सुरक्षित आहार याकडे विशेष लक्ष दिल्यास संसर्गजन्य आजारांपासून बचाव होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.
याशिवाय, नागरिकांनी पावसाळ्यात शक्यतो पाण्यानं भरलेल्या डबक्यांतून चालणं टाळावं, असं आवाहन हरीश भांदिर्गे यांनी केलं. मात्र, मनपा कर्मचारी, फेरीवाले, हातमजूर तसेच नियमितपणे पावसात काम करणारे किंवा प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आठवड्यातून दोनदा डॉक्सीसायक्लिन (Doxycycline) औषधाचा प्रतिबंधात्मक डोस घ्यावा, असंही त्यांनी सांगितलं.
घराच्या परिसरात पाणी साचू देऊ नये आणि पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी पाणी साचते, त्या पाण्याची तातडीनं विल्हेवाट लावावी. तसेच परिसरात पडून असलेले टायर, नारळाच्या करवंट्या किंवा पाणी साचू शकणाऱ्या इतर वस्तू हटवाव्यात, कारण अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते.
घरातील पाण्याच्या टाक्या नियमितपणे स्वच्छ आहेत का, याचीही खात्री करावी. पाण्याच्या टाक्यांमध्येही डास अंडी घालू शकतात, त्यामुळे पावसाळ्यात डासजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. तसेच कणकण, ताप, सर्दी, खोकला किंवा इतर कोणतीही लक्षणे आढळल्यास ती अंगावर काढू नयेत. त्वरित जवळच्या मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यात जाऊन वैद्यकीय तपासणी व उपचार करून घ्यावेत, असं आवाहनही त्यांनी केलं.
महापालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश : दरम्यान, संपूर्ण पावसाळ्यात मुंबईकरांना दर्जेदार आणि अखंड आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्य समितीचे अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांनी दिली. पावसाळ्यात जलजन्य आणि संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, तसेच आरोग्य यंत्रणेत पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावं, असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.

