मुंबईकरांनो, विकेंडला बाहेर पडण्यापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासा; पश्चिम, मध्य आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
रविवारी मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 1.30 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

Published : August 29, 2026 at 1:34 PM IST
मुंबई : मुंबईकरांच्या विकेंडच्या प्रवासाचे नियोजन करताना लोकलच्या वेळापत्रकाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आज शनिवारी (29 ऑगस्ट) रात्री पश्चिम रेल्वेवर वसई रोड-भाईंदरदरम्यान जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानंतर रविवारी (30 ऑगस्ट) मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गासह ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचवेळी टिटवाळा स्थानकावरील फलाट विस्ताराच्या कामासाठी मध्य रेल्वेचा विशेष रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकही सुरू झाला आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, कल्याण, टिटवाळा, कसारा तसेच नवी मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना लोकलच्या वेळेत बदलांचा सामना करावा लागू शकतो.
पश्चिम रेल्वेवर शनिवार रात्री जम्बो ब्लॉक : पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री ते रविवार पहाटेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वे रुळ, सिग्नल यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, अप जलद मार्गावर रात्री 11.30 ते पहाटे 3 वाजेपर्यंत, तर डाऊन जलद मार्गावर रात्री 1.15 ते पहाटे 4.45 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात जलद मार्गावरील गाड्या विरार ते भाईंदर/बोरिवलीदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. काही उपनगरी लोकल रद्दही राहणार आहेत. मात्र रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे.
मध्य रेल्वेवर विद्याविहार-ठाणे मार्गावर सकाळी ब्लॉक : रविवारी मध्य रेल्वेच्या विद्याविहार आणि ठाणे स्थानकांदरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी 8 ते दुपारी 1.30 या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे केली जाणार आहेत.
ब्लॉकदरम्यान डाऊन मार्गावरील मेल-एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार येथे डाऊन जलद मार्गावर वळवून पुढे ठाणे येथे पुन्हा नियोजित मार्गावर आणल्या जातील. अप दिशेच्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांनाही ठाणे येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसकडे जाणाऱ्या काही गाड्या विद्याविहार येथे सहाव्या मार्गावर वळवल्या जातील. या बदलांमुळे काही मेल-एक्स्प्रेस गाड्या सुमारे 10 ते 15 मिनिटे उशिराने धावण्याची शक्यता आहे.
ट्रान्स-हार्बरवर पाच तास सेवा बंद : रविवारीच ठाणे-वाशी/नेरुळ ट्रान्स-हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या वेळेत मेगाब्लॉक राहणार आहे. या काळात ठाणे-वाशी, ठाणे-नेरुळ आणि ठाणे-पनवेल दिशेच्या ट्रान्स-हार्बर लोकल सेवा बंद राहतील. ठाण्याहून वाशी, नेरुळ आणि पनवेलकडे जाणाऱ्या काही सेवा सकाळी 10.35 ते सायंकाळी 4.07 या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे वाशी, नेरुळ आणि पनवेलहून ठाण्याकडे येणाऱ्या सेवा सकाळी 10.25 ते सायंकाळी 4.09 या कालावधीत रद्द राहतील.
टिटवाळा-कसारा मार्गावर सलग रात्री ब्लॉक : याशिवाय टिटवाळा स्थानकावर 15 डब्यांच्या लोकलसाठी फलाटाचा विस्तार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी मध्य रेल्वेने शनिवारी मध्यरात्रीपासून ते 11 आणि 12 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकचे नियोजन केले आहे. प्रत्येक रात्री साधारण रात्री 11.30 ते पहाटे 5.10 या काळात हा ब्लॉक असेल. हा ब्लॉक कल्याण-वाशिंददरम्यानच्या अप आणि डाऊन नॉर्थ-ईस्ट मार्गावर लागू राहणार आहे.
या कामामुळे टिटवाळा-कसारा मार्गावरील रात्रीच्या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या ठाणे किंवा कल्याणपर्यंतच धावतील, तर काही सेवा आसनगावपर्यंत वाढवण्यात येणार आहेत. 29 ऑगस्टच्या रात्रीपासून 1 सप्टेंबरच्या रात्रीपर्यंतच्या नियोजनातही अनेक लोकलच्या वेळा आणि मार्गांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
टिटवाळा-कसारा मार्गावरील रात्रीच्या ब्लॉकमुळे काही मेल-एक्स्प्रेस गाड्यांवरही परिणाम होणार आहे. शालीमार-एलटीटी जननेश्वरी एक्स्प्रेस, शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस, हावडा-सीएसएमटी मेल आणि मऊ-एलटीटी एक्स्प्रेस या गाड्या सुमारे 10 ते 20 मिनिटे उशिरानं धावण्याची शक्यता रेल्वेनं व्यक्त केली आहे.
प्रवाशांनी काय काळजी घ्यावी? : रविवारच्या सुट्टीच्या दिवशी ठाणे, नवी मुंबई, कल्याण, टिटवाळा आणि कसारा परिसरात प्रवास करणाऱ्यांनी विशेष खबरदारी घ्यावी. विशेषतः ट्रान्स-हार्बर मार्गावर दुपारच्या वेळेत सेवा बंद राहणार असल्याने पर्यायी मार्गाचा विचार करणे आवश्यक आहे. रात्री टिटवाळा-कसारा दिशेने प्रवास करणाऱ्यांनी नेहमीची शेवटची लोकल उपलब्ध आहे की नाही, हे स्थानकावर किंवा रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकातून तपासूनच प्रवास करावा.
एकूणच, शनिवारी रात्री पश्चिम रेल्वेचा जम्बो ब्लॉक आणि रविवारच्या दिवशी मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक, त्यात टिटवाळा परिसरातील सलग रात्रीचे विशेष ब्लॉक यामुळे विकेंडला मुंबईकरांच्या लोकल प्रवासावर परिणाम होणार आहे. प्रवाशांनी घरातून निघण्यापूर्वी आपल्या मार्गावरील लोकलचे ताजे वेळापत्रक तपासणे आणि शक्य असल्यास प्रवासासाठी अतिरिक्त वेळ राखून ठेवणे योग्य ठरेल.
कुठल्या लोकल रद्द?
ट्रान्स-हार्बर :
- ठाणे - वाशी
- ठाणे - नेरुळ
- ठाणे - पनवेल
- वाशी/नेरुळ/पनवेल - ठाणे
कालावधी : साधारण सकाळी 10.25/10.35 ते सायंकाळी 4.07/4.09 दरम्यान विविध सेवा.
टिटवाळा-कसारा मार्ग :
- रात्रीच्या काही लोकल रद्द
- काही लोकल ठाणे किंवा कल्याणपर्यंतच
- काही सेवा आसनगावपर्यंत वाढवण्यात येणार
पश्चिम रेल्वे :
- 29 ऑगस्टच्या रात्री वसई रोड-भाईंदरदरम्यान काही लोकल रद्द/मार्गात बदल
- जलद लोकल काही काळ धीम्या मार्गावरून धावणार.
हेही वाचा
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! सणासुदीच्या काळात मध्य रेल्वेचा 15 दिवसांचा मेगा ब्लॉक; लोकल अन् एक्स्प्रेस गाड्यांवर परिणाम
- सहयोग पोर्टलद्वारे जिओ ब्लॉकिंग: I4C नं 10,000हून अधिक भारतीय व्हॉट्सॲप खाते हायजॅकपासून बचावले
- '20 वर्षांखालील मुलांसाठी इन्स्टाग्रामसह फेसबुक ब्लॉक करा'-आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या मुलीची पंतप्रधानांकडे मागणी

