ETV Bharat / state

गणेशोत्सवात भेसळ रोखण्यासाठी FDA ‘ॲक्शन मोड’वर; मुंबईतील मिठाई विक्रेत्यांकडून तुकाराम मुंढेंच्या निर्णयाचे स्वागत!

गणेशोत्सवातील महाप्रसाद आणि भंडाऱ्यांमध्ये खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनानं (FDA) घेतलेल्या निर्णयाचं गणेश मंडळांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Mumbai FDA Action Mode Ahead of Ganesh Festival
गणेशोत्सवात भेसळ रोखण्यासाठी FDA ‘ॲक्शन मोड’वर (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : September 2, 2026 at 8:28 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह संपूर्ण राज्यात सणाची लगबग सुरू झाली आहे. या काळात खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ आणि नियमांचं उल्लंघन रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) ॲक्शन मोडवर येणार असल्याचं आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मुंबईतील केटरर्स आणि मिठाई विक्रेतेही अलर्ट झाले आहेत.

गणेशोत्सवात भेसळ रोखण्यासाठी FDA ‘ॲक्शन मोड’वर (ETV Bharat)

'तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय योग्य' : लालबाग येथील मिठाई विक्रेते तानाजी वाडेकर यांनी FDAच्या कारवाईचं समर्थन केलं. "नागरिकांच्या आरोग्याची काळजी असल्यानं तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. चुकीच्या पद्धतीनं व्यवसाय करणाऱ्या कोणत्याही खाद्यपदार्थ विक्रेत्यावर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही या कारवाईचं समर्थन करतो. ग्राहकांना योग्य दर्जाचा आणि गुणवत्तापूर्ण प्रसाद तसेच मिठाई देण्याचा आमचा प्रयत्न आहे," असं वाडेकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.

लालबाग येथील आणखी एक मिठाई विक्रेते राम यादव म्हणाले, "आम्ही यंदाही अतिशय दर्जेदार मिठाई विकण्याचा मानस ठेवला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही चांगल्या गुणवत्तेची मिठाई ग्राहकांना देणार आहोत. अन्न व औषध प्रशासनानं घेतलेला निर्णय योग्य असून आम्ही त्याचं स्वागत करतो. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणं ही अतिशय गंभीर बाब आहे."

केटरर्सही अलर्ट : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छतेबाबत मुंबईतील केटरर्सकडूनही विशेष काळजी घेतली जात आहे. लालबाग येथील सागर केटर्सचे मालक सागर बंदीवाडेकर यांनी सांगितलं की, गेल्या 5 वर्षांपासून मुंबईतील प्रसिद्ध गणेश गल्ली गणपती मंडळासाठी महाप्रसादाचं नियोजन करत आहेत.

'ईटीव्ही भारत'शी बोलताना सागर बंदीवाडेकर म्हणाले, "आम्ही योग्य ती काळजी घेऊन व्यवसाय करत आहोत. ताजे जेवण, ताजी भाजी, ताजं दूध आणि ताजं पनीर वापरणं हा आमच्या व्यवसायाचा महत्त्वाचा पैलू आहे. काही केटर्स कमी पैसे घेऊन शिळं किंवा निकृष्ट दर्जाचं पदार्थ वापरतात. त्यामुळे नागरिकांना विषबाधा होण्याच्या घटना घडतात. आम्ही मात्र योग्य मोबदला घेऊन उत्कृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ वापरून महाप्रसाद तयार करतो."

"खाद्यपदार्थ वाढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हातात ग्लोव्हज, डोक्यावर टोपी आणि तोंडावर मास्क असावा, याची दरवर्षीप्रमाणे यंदाही काळजी घेतली जाईल. तुकाराम मुंढे यांनी आयुक्त म्हणून केलेल्या घोषणेची आम्हाला भीती नाही. उलट एक उद्योजक म्हणून मी ती माझी जबाबदारी मानतो. आपण नागरिकांना जे खाऊ घालतो, ते चांगल्या दर्जाचं असलं पाहिजे, ही प्रत्येक केटरर्सची जबाबदारी आहे," असंही त्यांनी सांगितलं.

चेंबूर येथील पापाजी केटर्सचे मालक चंद्रकांत देशमुख म्हणाले, "तुकाराम मुंढे हे नागरिकांच्या हितासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी योग्य निर्णय घेत आहेत. आम्ही त्यांच्या सर्व निर्णयांचे स्वागत करतो. आमचे हायजिन व्यवस्थित राहावे, तसेच सर्व गोष्टी नीटनेट्या आणि स्वच्छ राहाव्यात, याची आम्ही पूर्ण काळजी घेऊ."

‘परवानगीची प्रक्रिया सुलभ करा’ : गणेशोत्सवातील महाप्रसाद आणि भंडाऱ्यांमध्ये खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि स्वच्छता राखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनानं (FDA) घेतलेल्या निर्णयाचं गणेश मंडळांकडून स्वागत करण्यात येत आहे.

परळचा महाराजा गणेश मंडळाचे सरचिटणीस प्रतीक कदम ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, "आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून महाप्रसादाचं आयोजन करत आहोत. तुकाराम मुंढे यांनी गणेश मंडळांनीही आवश्यक परवानगी घेण्याची अट सांगितली आहे. आमचे भाविक ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. मात्र, ऑनलाइन परवानगी घेताना विलंब होत असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळे FDAने ऑफलाइन परवानगी घेण्याची सुविधाही उपलब्ध करून द्यावी, एवढीच आमची विनंती आहे."

"तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय अतिशय महत्त्वाचा आणि चांगला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी कोणीही खेळू शकत नाही. उत्सवाच्या काळात चुकीच्या घटना घडत असतील, तर संबंधितांवर कारवाई होणे गरजेचे आहे," असं स्थानिक नागरिक अक्षय खराडे यांनी सांगितलं. प्रसाद आणि भंडाऱ्यामध्ये होणारी भेसळ थांबवणं अत्यंत महत्त्वाचं असून, तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचं नागरिक म्हणून स्वागत करत असल्याचंही खराडे यांनी सांगितलं.