मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचं निधन: जाणून घ्या त्यांचा जीवन परिचय!
मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचं दुःखद निधन झालं आहे. त्यांनी मुंबईत रस्त्याचे जाळे निर्माण केले होते. हरेश्वर पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Published : June 3, 2026 at 10:23 PM IST
मुंबई : मुंबईचे माजी महापौर कट्टर शिवसैनिक अशी ओळख असणारे हरेश्वर पाटील यांचं वयाच्या 86 व्या वर्षी बुधवारी पहाटेच्या सुमारास दुःखद निधन झालं. त्यांच्या पश्चात दोन मुलं, सुना, नातवंड असा हा मोठा परिवार आहे. सायंकाळी 5 वाजता त्यांच्या निवास्थानाहून अंत्ययात्रा काढण्यात आली. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हरेश्वर पाटील हे मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून 1985 मध्ये निवडून आले. प्रभाग 128 मधून ते निवडून आले होते.
मध्य वैतरणा धरणाच्या नवीन कामासाठी पाठपुरावा : मुंबई शहराच्या पाण्याची तहान भागवण्यासाठी मध्य वैतरणा धरणाच्या नवीन कामासाठी पाटील यांनी मोठा पाठपुरावा केला होता. याचबरोबर मुंबईतील कोळीवाडे विकसित व्हावेत, त्यांचा सर्वांगिक विकास व्हावा, यासाठी मोठा प्रयत्न त्यांनी केला. संयुक्त महाराष्ट्र कला दालन आणि सावरकर स्मारक स्विमिंग पुलासाठी त्यांनी पुढाकार घेतला. महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांसाठी संगणक प्रणाली अमलात आणण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. रिलायन्सकडून 52 माध्यमिक शाळांसाठी त्यांनी संगणक आणि संगणकीय शिक्षक उपलब्ध करून दिले. घाटकोपर येथे चिराग नगर परिसरामध्ये 2001 या वर्षात मोठी दरड कोसळली होती. 3 चाळींवर ही दरड कोसळली होती. यामध्ये जीवितहानी झाली होती. महापौर म्हणून हरेश्वर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन युद्ध पातळीवर बचावकार्य करण्यात प्रशासकीय यंत्रणेला भाग पाडलं.
16 प्रभाग समित्यांची स्थापना : हरेश्र्वर पाटील यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेच्या प्रशासनात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. विभागीय स्तरावरील लोकसहभाग वाढविण्यासाठी 16 प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात आली होती. महापालिकेच्या विविध विभागांचं संगणकीकरण सुरू करून त्यांनी प्रशासन अधिक पारदर्शक व कार्यक्षम करण्याचा प्रयत्न केला.
मुंबईत झाले सिमेंटच्या रस्त्याचे जाळे : महापौर असताना मुंबई महापालिका मुख्यालयातील हेरिटेज सभागृहात भीषण आग लागल्यानं सभागृह आणि सभागृहातील राष्ट्रीय नेत्यांचे तैलचित्र जाळून खाक झाले होते. मात्र ते महापौर असतानाच सदर जळालेल्या सभागृहाचं युद्धपातळीवर नूतनीकरण करून त्या सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू करण्यात आलं. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी सिमेंटच्या रस्त्याचे जाळे निर्माण करण्याच्या कामाला गती मिळाली.
टी एन शेषन यांचा केला विरोध : मुख्य निवडणूक आयुक्त टी एन शेषन हे पदावर असताना निवडणूक आचारसंहिता लागू होती. त्यावेळी स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करण्यासाठी परवानगी घेणं बंधनकारक होतं. मात्र हरेश्र्वर पाटील हे महापौर असताना त्यांना ध्वजारोहण करण्यात कायदेशीर अडचण आली होती. त्यांनी त्यावेळी परवानगीसाठी पाठपुरावा केला. मात्र निवडणूक विभागानं परवानगी न दिल्यास देखील स्वातंत्र्यदिनी तिरंगा झेंडा फडकवणारच, असा निर्धार व्यक्त करीत त्यांनी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी देखील दर्शवली होती. मात्र अखेर त्यांना परवानगी मिळाली आणि त्यांनी ध्वज फडकावून आपली जिद्द पूर्ण केली.
बाळासाहेबांच्या विचारांचे ते पाईक : उपमहापौर संजय घाडी म्हणाले की, "हरेश्र्वर पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही देखील काम केलं आहे. शिवसेना वाढवण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे ते पाईक होते. आगरी समाजासाठी त्यांचं मोठं काम आहे. मुंबई उपनगरातील पहिले महापौर म्हणून त्यांची ओळख नेहमीच राहील. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. माजी महापौर हरेश्र्वर पाटील यांच्या निधनाची बातमी समजताच आज स्थायी समितीचं कामकाज थांबवण्यात आलं. माजी महापौर हरेश्र्वर पाटील यांना स्थायी समितीमध्ये सभागृहनेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव आणि सर्वपक्षीय गटनेते, नगरसेवक यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. तसेच, स्थायी समितीची बैठक पुढील कोणतंही कामकाज न करता तहकूब करण्यात आली.
हेही वाचा :
- ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं वयाच्या 89व्या वर्षी निधन, जाणून घ्या त्यांची सदाबहार 5 गाणी...
- कविता कृष्णमूर्ती, अबू मलिक आणि रोहन महेंद्र कपूर यांनी वाहिली सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली!
- मनाला आधार देणारा डॉक्टर हरपला; लेखक, आयपीएच अन् मुक्तांगणचे विश्वस्त डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन

