ETV Bharat / state

मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत संमिश्र प्रतिक्रिया; चालक म्हणतात ‘मराठी आलीच पाहिजे’

महाराष्ट्रात टॅक्सी आणि रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आलं आहे. यानंतर मुंबईतील बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली आहे.

Mumbai Auto Taxi Drivers and Passengers Respond to Mandatory Marathi
मराठीच्या मुद्द्यावर मुंबईत संमिश्र प्रतिक्रिया (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 25, 2026 at 5:45 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : महाराष्ट्रात टॅक्सी आणि रिक्षाचालकांना व्यवहारासाठी मराठी भाषा शिकणं अनिवार्य करण्यात आल्यानंतर या निर्णयाचे विविध पडसाद उमटत आहेत. बहुतांश रिक्षा-टॅक्सी चालकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून, काही चालकांनी विरोध केल्याचंही समोर आलं. मात्र, हा विरोध अफवांमुळे झाल्याचा दावा शिवसेना उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष शिवदयाल मिश्रा यांनी केला आहे.

मुंबईतील बहुतांश रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकण्यास सुरुवात केली आहे. अनेक चालकांना मराठी बोलता येत असल्याचंही मिश्रा यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारचा व्यापक विरोध झालेला नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

आरटीओकडून मराठी येत नसल्यानं रिक्षा चालकांना दंड आकारला जात असल्याची चुकीची माहिती काही चालकांपर्यंत पोहोचवण्यात आली. त्यानंतर उत्तर मुंबईतील काही रिक्षा चालकांनी या निर्णयाला विरोध केला. मात्र, प्रत्यक्षात अशा प्रकारे दंड आकारण्यात आलेला नसल्याचं मिश्रा यांनी सांगितलं. काही समाजकंटकांकडून रिक्षा चालकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असं रिक्षा चालकांना सांगितलं आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

माध्यमांशी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (ETV Bharat)

‘महाराष्ट्रात मराठी यायलाच हवी’ : वडाळा येथील टॅक्सी चालक मोजाउद्दीन खान म्हणाले की, महाराष्ट्रात मराठी येणं गरजेचं आहे. “मी संपूर्ण मुंबईत टॅक्सी चालवतो. बहुतांश लोक मराठी आहेत. त्याचबरोबर कोणाला हिंदी येत नाही, असंही नाही. मात्र मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे. मातृभाषेचा सन्मान प्रत्येकानं करायला हवा. तुम्हीही करता आणि माझ्यासारखे असंख्य टॅक्सी चालकही करतात,” असे त्यांनी सांगितलं.

मानखुर्द येथील टॅक्सी चालक अफजल अन्सारी म्हणाले, “मला मराठी येतं याचा मला अभिमान आहे. मी मुंबईत वाढलो असल्यानं आपोआप मराठी शिकलो. मात्र, माझे अनेक मित्र आहेत, ज्यांना मराठी बोलता येत नाही. आरटीओ अधिकारी समोर आल्यावर ते मराठी बोलायला घाबरतात. त्यामुळे हा निर्णय चुकीचा नाही. मराठी आलीच पाहिजे. मात्र, काही लोकांना आणखी वेळ देणे गरजेचं आहे.”

‘बेकायदेशीर कारवाई सहन करणार नाही’ : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कोणतीही बेकायदेशीर कारवाई सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, अशी वृत्तीही सहन केली जाणार नाही, असे त्यांनी सांगितलं.

मराठी शिकणाऱ्या सर्वांचे स्वागत असून, ज्यांना मराठी शिकायची आहे त्यांच्यासाठी शासनाचे वर्ग अद्याप सुरू आहेत. महाराष्ट्र शासन कोणत्याही व्यक्तीचा रोजगार हिरावून घेणार नाही. मराठी शिकण्याची इच्छा असणाऱ्यांना शासनाकडून मराठी शिकवली जात आहे. मराठीच्या मुद्द्यावर जाणीवपूर्वक वाद निर्माण करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असंही सरनाईक यांनी स्पष्ट केलं.

तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याची मागणी : मुंबई ऑटो रिक्षा टॅक्सी युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी नुकतीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेतली. मराठी शिकण्यासाठी आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी प्रशासनाकडे केली. यावेळी सरनाईक यांनी चालकांना यापूर्वीच तीन महिन्यांचा कालावधी देण्यात आल्याचे स्पष्ट केले.

‘महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखलाच पाहिजे’ : महाराष्ट्राची मराठी ही मातृभाषा आहे. महाराष्ट्रात मराठीचा सन्मान राखलाच गेला पाहिजे. युती सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. अमराठी रिक्षा चालक मराठी शिकत आहेत, त्यांच्या सोबत आम्ही उभे आहोत. मात्र महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही आणि मराठीच्या विरोधात संप पुकारू, ही भावना आम्ही सहन करणार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई उपशहर अध्यक्ष कुणाल माईनकर यांनी सांगितलं.

‘मुंबईत आल्या आल्या मराठीत संवाद साधता आला’ : मी आज नांदेडहून मुंबईत प्रवास केला. मुंबईत आल्यानंतर रिक्षा-टॅक्सी चालकांशी मराठीत संवाद साधता आला. मराठी असल्याचा त्याचा मला फायदा झाला. सरकारच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो, असे प्रवासी अजय राठोड यांनी सांगितले.

‘मराठीचे व्याकरण शिकवण्याचा आग्रह नाही’ : मुंबईत मराठी यायलाच हवी. आम्ही रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठीचे पूर्ण व्याकरण शिकण्याचा आग्रह करत नाही. मात्र, ‘नाही जाणार’, ‘जाणार नाही’ किंवा ‘एवढे पैसे झाले’ यांसारख्या दैनंदिन व्यवहारातील साध्या वाक्यांना उत्तर देता यायला हवे. शासनाच्या निर्णयाचं मी समर्थन करते, अशी भूमिका एका प्रवाशानं व्यक्त केली.

हेही वाचा

  1. रिक्षासह टॅक्सी चालकांच्या मराठीची तपासणी सुरू; पहिल्याच दिवशी 1268 नोटीस जारी!
  2. मराठी येत नसेल तर उद्यापासून रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई; प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
  3. हिंदी बोलल्यास प्रशासनाने कारवाई करू नये; गोंदियातील ऑटोचालक संघटनांची मागणी