ETV Bharat / state

एसटी बस स्थानकं झाली डिजिटल! बसचा अचूक वेळ, स्थान, वेग आणि मार्ग फलाटावर दिसणार

बस स्थानकाच्या फलाटावरच बस आगमनाची अचूक आणि थेट माहिती देणारी 'पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम' कार्यान्वित करण्यात आली आहे.

MSRTC Bus GPS system
एसटी बस डिजिटल प्रवास (ETV Bharat Reporter/GFX)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : February 24, 2026 at 11:50 AM IST

|

Updated : February 24, 2026 at 12:52 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

By - Ravindra Mahale

अहिल्यानगर (शिर्डी) - बस कधी येणार? या एकाच प्रश्नासाठी प्रवाशांना वारंवार चौकशी खिडकीवर जावं लागायचं. येईल पाच मिनिटात, येईल दहा मिनिटात, बसचा वेळ झालाय येईलच आता अशा प्रकारची उत्तरं चौकशी कक्षातून दिली जायची. ही दिली जाणारी उत्तरं मोघमच असायची, कारण ती बस कुठं आहे ही समजणारी सुविधाच उपलब्ध नसायची. मात्र, काळ बदलला आणि काळानुसार 'लालपरी'ही बदलत गेली. लालपरीच्या डिजिटल प्रवासाचा घेतलेला हा आढावा...

माहिती देताना कोपरगाव आगारप्रमुख अमोल बनकर (ETV Bharat Reporter)

लालपरीचा डिजिटल प्रवास - विमानतळ, रेल्वे स्थानकं जशी हायटेक आणि डिजिटल होत राहिली तशी आपली लालपरीची सेवा देखील डिजिटल होत गेली. सुरुवातीच्या काळात कंडक्टरच्या खांद्याला लावलेल्या एका पिशवीत तिकीटाचा गठ्ठा ठेवलेला असायचा. त्यात एक रुपयांपासून ते 50, 100 रुपयांची तिकीट असायची. जिथं जायचं तिथपर्यंतचं तिकीट किती आहे हे पाहून ती तिकीटं फाडली जायची. मात्र, काळ बदलला आणि एसटीनं तिकीट काढायचं मशीन आणलं. कोरोनाकाळानंतर ऑनलाईन पेमेंटकडं कल वळला. एसटीनंही आपल्या प्रवाशांसाठी ऑनलाईन पेमेंटची सुविधा सुरु केली. तिकीट बुकिंगसाठी ऑनलाईन App, वेबसाईट आली, तिकीटासाठी स्मार्ट कार्ड आलं. सर्वकाही ऑनलाईन झालं. आता तर चक्क आपली एसटी कुठं आहे आणि किती वेळात ही बस स्थानकात येणार याची माहिती देखील प्रवाशांना एसटी फलाटावर लावलेल्या डिस्प्लेवर दिसणार आहे.

fst bus gps track time
एसटी बसमध्ये आधुनिक प्रणाली (ETV Bharat Reporter)

बस स्थानक फलाटावर लागली स्क्रीन - बस स्थानकाच्या फलाटावरच बस आगमनाची अचूक आणि थेट माहिती देणारी 'पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम' शिर्डी बस स्थानकावर कार्यान्वित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या या आधुनिक उपक्रमामुळं प्रवाशांना वेळेचं अचूक नियोजन करता येत असून, प्रवास अधिक वेगवान झाला आहे.

st bus gps track time
एसटी बसमध्ये आधुनिक प्रणाली (ETV Bharat Reporter)

काळानुरूप एसटीची सेवा अधिक सक्षम - महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बससेवेवर दररोज लाखो प्रवासी अवलंबून असतात. ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, नोकरदार तसेच शहरातील प्रवासी मोठ्या प्रमाणात एसटीचा वापर करतात. काळानुरूप सेवा अधिक सक्षम करण्यासाठी महामंडळानं तंत्रज्ञानाचा स्वीकार केला आहे. त्याअंतर्गत प्रत्येक बसमध्ये जीपीएस-आधारित 'व्हेईकल ट्रॅकिंग डिव्हाइस' बसवण्यात आलं आहे. या प्रणालीमुळं बसचं अचूक स्थान, वेग आणि मार्ग याची माहिती मुख्य नियंत्रण कक्षाला मिळते. तेथून ही माहिती तत्काळ संबंधित बसस्थानकावरील डिजिटल स्क्रीनवर प्रदर्शित केली जाते.

st bus gps track time
एसटी बसमध्ये आधुनिक प्रणाली (ETV Bharat Reporter)

बसची वेळ, स्थानक अचूक समजणार - पूर्वी बसची वेळ जाणून घेण्यासाठी प्रवाशांना चौकशी कक्षात जाऊन विचारणा करावी लागत असे. बस उशिरा येत असल्यास किंवा काही कारणास्तव रद्द झाल्यास स्पष्ट माहिती मिळत नसे. त्यामुळं प्रवाशांना अनिश्चिततेत ताटकळत थांबावं लागे. आता मात्र फलाटावर बसवलेल्या स्क्रीनवर संबंधित बस सध्या कुठं आहे, किती अंतरावर आहे आणि किती मिनिटांत दाखल होणार याची अचूक माहिती मिनिटागणिक झळकते. बस विलंबानं येत असल्यास किंवा फेरी रद्द झाल्यास त्याची स्पष्ट नोंदही स्क्रीनवर दर्शवली जाते. यामुळं प्रवाशांना पर्यायी नियोजन करता येतं आणि वेळेचा अपव्यय टळतो.

st bus gps track time
एसटी बसमध्ये आधुनिक प्रणाली (ETV Bharat Reporter)

कोपरगाव आगाराचा स्तुत्य उपक्रम - कोपरगाव आगारांतर्गत कोपरगाव, शिर्डी आणि राहाता या बसस्थानकांवर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. विशेषतः शिर्डीसारख्या धार्मिक पर्यटनस्थळी देशभरातून येणाऱ्या भाविकांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरत आहे. अपरिचित ठिकाणी बसची प्रतीक्षा करताना निर्माण होणारा संभ्रम आणि ताण यावर या प्रणालीमुळं मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवता आलं. प्रवाशांमध्येही या सुविधेबद्दल समाधान व्यक्त होत आहे. एसटी महामंडळाची ही डिजिटल झेप पारंपरिक लालपरीला आधुनिकतेची जोड देणारी ठरत आहे. सेवा अधिक पारदर्शक, विश्वासार्ह आणि प्रवाशाभिमुख करण्याच्या उद्देशानं हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती कोपरगाव आगाराचे प्रमुख अमोल बनकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.

st bus gps track time
एसटी बसमध्ये आधुनिक प्रणाली (ETV Bharat Reporter)

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा पुढाकार - एसटीचं रुप पालटण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुढाकार घेतला आहे. परिवहनमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली 'आपली बस' हे App देखील प्रवांशासाठी तयार करण्यात आलं आहे. मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, एसटी ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. किफायतशीर दर, सुरक्षित प्रवास आणि शासनाच्या विविध सवलतींमुळं प्रवाशांचा ओघ वाढत असताना सेवेत वक्तशीरपणा नसेल तर ही वाढ टिकणार नाही. “प्रवाशांना ताटकळत ठेवणं म्हणजे त्यांना पर्याय शोधायला भाग पाडणं,” असं ते म्हणाले.

st bus gps track time
एसटी बसमध्ये आधुनिक प्रणाली (ETV Bharat Reporter)

एकूणच डिजिटल फलाट संकल्पनेमुळं एसटी प्रवास अधिक माहितीपूर्ण आणि सुलभ झाला आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीनं प्रवाशांना वेळेवर अचूक माहिती देण्याचा हा प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह मानला जात आहे.

हेही वाचा -

  1. एसटी महामंडळाच्या ताफ्यात 8 हजार 300 नवीन बसेस दाखल होणार; दैनंदिन तोट्यातून एसटी सावरणार
  2. एसटीच्या नव्या बसेसचे नामकरण राजमाता जिजाऊ; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
  3. एसटीला उशीर, गाडीचा बिघाड आणि रद्द फेऱ्यांवर परिवहन मंत्री नाराज, वक्तशीरपणा वाढवण्याचे आदेश
Last Updated : February 24, 2026 at 12:52 PM IST