ETV Bharat / state

MPSC पेपरफुटी : 'अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अन्यथा...'; आमदार रोहित पवारांचा पुण्यातून थेट अल्टिमेटम

MPSC पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून आयोग अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, अन्यथा 1 सप्टेंबर 2026 रोजी तीव्र आंदोलनाचा इशारा आमदार रोहित पवार यांनी दिला आहे.

MLA Rohit Pawar speaking to the media
MPSC पेपरफुटीवरून रोहित पवारांचा आंदोलनाचा इशारा (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : August 26, 2026 at 4:37 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं (MPSC) अन्न व औषध प्रशासन विभागातील 'औषध निरीक्षक, गट-ब' पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेबाबत गैरप्रकाराचे आरोप झाल्यानंतर आयोगानं चौकशी सुरू केली होती. अखेर ही प्रक्रिया रद्द करण्यात आली. याबाबत सातत्यानं आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. "या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी; तसंच या प्रकरणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सचिवांनी राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू," असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अन्न व औषध प्रशासन विभागातील 'औषध निरीक्षक, गट-ब' पदाची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल, आज विद्यार्थ्यांच्या वतीनं आमदार रोहित पवार यांचा पुण्यात सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं.

माध्यमांशी बोलताना आमदार रोहित पवार (ETV Bharat)

यावेळी आमदार रोहित पवार म्हणाले, "एक महिन्यापूर्वी आम्ही आयोगाच्या अध्यक्षांची आणि राज्याच्या आयजींची भेट घेतली होती. त्यांना आमच्याकडील पुरावे देऊन, 'एमपीएससी'च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या 'एफडीए' परीक्षेचा पेपर फुटला असून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार तपास झाल्यावर काल रात्री आयोगानं पेपर फुटल्याचं मान्य केलं. या पेपरफुटीबाबत आयोगाचे अध्यक्ष तसंच सचिवांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून या महिन्याअखेरपर्यंत राजीनामा द्यावा आणि आयोगावर एका स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी, अशी आमची मागणी आहे."

सरकारकडून पैसे न मिळाल्यानं एका कंत्राटदारानं आत्महत्या केल्याबाबत रोहित पवार यांना विचारलं असता, ते म्हणाले की, देवकाते नावाचे जे कंत्राटदार आहेत, त्यांनी दुर्दैवानं आत्महत्या केली आहे. माझी सर्व मराठी कंत्राटदारांना विनंती आहे की, सर्वांनी एकजूट दाखवून रस्त्यावर उतरून लढलं पाहिजे. आजपर्यंत राज्यात सहा कंत्राटदारांनी आत्महत्या केल्या असून हे सर्व कंत्राटदार मराठी आहेत. गुजराती, तसंच आंध्र प्रदेश येथील कंत्राटदारांचे पैसे वेळेवर दिले जात आहेत; मात्र मराठी कंत्राटदारांचे 90 हजार कोटी रुपये दिलेले नाहीत. अनेक कंत्राटदारांनी आपले घरदार तसंच घरातील सोन्याचे दागिने गहाण ठेवून कामं केली आहेत. सरकारनं या सर्व कंत्राटदारांचे पैसे लवकरात लवकर द्यावेत.

हेही वाचा -

  1. साईनगरीतून 'राखी सन्मान रथ' रवाना; संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे जवानांसाठी 1 लाखांहून अधिक राख्या
  2. अनोखं रक्षाबंधन! वर्षभरापूर्वी बहिणीचं निधन, पण तिच्याच हातांनी राखी बांधली
  3. साईबाबांना बांधली अनोखी राखी, 'ऑपरेशन सिंदूर' थीमवर असलेल्या राखीनं भाविकांचं लक्ष वेधलं