ETV Bharat / state

'मनोज जरांगे पाटलांना कोल्हापूर गॅझेटचा विसर', खासदार शाहू छत्रपतींनी व्यक्त केली खंत

कोल्हापुरात मराठा आंदोलनादरम्यान खासदार शाहू छत्रपतींनी मनोज जरांगे पाटलांवर नाराजी व्यक्त केली. आरक्षणाचे प्रणेते शाहू महाराजांच्या 1881च्या कोल्हापूर गॅझेटचा जरांगेंना विसर पडल्याची खंत त्यांनी मांडली.

Shahu Chhatrapati Manoj Jarange
माध्यमांशी बोलताना खासदार शाहू छत्रपती महाराज (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2026 at 8:24 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

कोल्हापूर : कोल्हापुरात शनिवारी (दि.30) मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि कोल्हापूर गॅझेट लागू व्हावं या मागणीसाठी मराठा समाज एकवटला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार शाहू छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली. "आरक्षणाचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर भूमीतून देशभरात पहिल्यांदा आरक्षण देण्यात आलं. त्याच शाहू नगरीतील 1881 चं कोल्हापूर गॅझेटचा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना विसर पडलाय. हैदराबाद त्यांना जवळचं वाटतं," अशी खंत कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त केली.

Shahu Chhatrapati Manoj Jarange
कोल्हापूर गॅझेट (ETV Bharat Reporter)

हैदराबाद, सातारा गॅझेटप्रमाणं कोल्हापूर गॅझेट लागू करा : "मराठा आरक्षणासाठी भूमिका आक्रमकचं असली पाहिजे. सरकारनं मराठा समाजाच्या मागणीकडं दुर्लक्ष केलं तर नक्कीच उद्रेक होईल. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा आंदोलन सुरू केलं आहे. पार्श्वभूमीवर आज शाहू नगरीत सकल मराठा समाजाच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला तसंच हैदराबाद आणि सातारा गॅझेटप्रमाणं कोल्हापूर गॅझेट लागू करण्याची मागणी देखील करण्यात आली," असं खासदार शाहू छत्रपती महाराज माध्यमांशी बोलताना म्हणाले.

माध्यमांशी बोलताना खासदार शाहू छत्रपती महाराज (ETV Bharat Reporter)

कोल्हापूर गॅझेटमध्ये काय आहेत नोंदी : देशात इंग्रजांचं शासन असताना 1881 यावर्षी केलेल्या नोंदीनुसार कोल्हापूर जिल्ह्याची लोकसंख्या 8 लाखांच्या घरात होती. यामध्ये तीन लाख कुणबी आणि इतर समाज मराठा असल्याचा उल्लेख आहे. तर कुणबी आणि मराठ्यांमध्ये रोटी-बेटी व्यवहार होत होते. मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार हैदराबाद सातारा गॅझेट प्रमाणेच कोल्हापूर गॅझेटसुद्धा लागू करा, अशी मागणी यावेळी कोल्हापुरातील मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केली. आजपासून मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा उपोषण सुरू झालं आहे. कोल्हापूरकरांनी केलेल्या मागणीचा जरांगे पाटील विचार करतात का? याकडं आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.

हेही वाचा :

  1. सुजय विखेंचा डबल स्ट्राईक; प्राजक्त तनपुरे भाजपामध्ये, सुप्रिया सुळे, जयंत पाटील म्हणाले...
  2. पुणे दारूकांडाचं भिवंडी कनेक्शन उघड, एफडीएच्या धडक कारवाईत पुण्यात वापरलेल्या मिथेनॉलचा मोठा साठा जप्त
  3. धक्कादायक! प्रसूतीनंतर डॉक्टरांनी महिलेच्या पोटातच विसरली शस्त्रक्रियेची पट्टी, मुंबईच्या रुग्णालयातील प्रकार