शहराची अवस्था नांगरून ठेवलेल्या शेतासारखी; खासदार राजाभाऊ वाजेंनी व्यक्त केला संताप; महापालिका आय़ुक्त म्हणाल्या . . . .
नाशिक शहरात आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. मात्र शहरात खोदलेल्या रस्त्यावरुन आता मोठं राजकारण रंगलं आहे. खासदार राजाभाऊ वाजे यांनी रस्त्यावरुन प्रशासनावर टीका केली आहे.

Published : June 3, 2026 at 8:46 PM IST
नाशिक : शहरातील रस्त्यांची दिवसेंदिवस खालावत चाललेली अवस्था आणि अवकाळी पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. याबाबत नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तांना पत्र पाठवून तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली. शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून अपघातांचं प्रमाण वाढण्याची भीती खासदार वाजे यांनी व्यक्त केली.

मंगळवारी नाशिक शहरात पावसाची हजेरी : मंगळवारी नाशिक शहरात पावसानं हजेरी लावली असून आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांची वास्तविक अवस्था समोर येऊ लागली आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांवरील डांबरीकरण उखडलं असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. विशेषतः शहरी विस्ताराच्या नव्या भागांमध्ये तसेच वाढत्या लोकवस्तीच्या परिसरांमध्ये रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट झाल्याचं नागरिकांकडून सातत्यानं निदर्शनास आणून दिलं जात आहे, असं खासदार राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगानं विकसित होणारं शहर : "नाशिक हे महाराष्ट्रातील सर्वाधिक वेगानं विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असून औद्योगिक, धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचं केंद्र आहे. अशा शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था ही केवळ पायाभूत सुविधांच्या कमतरतेचं लक्षण नसून नागरिकांच्या सुरक्षिततेशी थेट संबंधित बाब आहे. पावसाळ्यात खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. नागरिक त्रस्त, वाहतूक कोंडीची समस्या तीव्रशहरातील विविध भागांत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावला असून अनेक ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. कार्यालयीन वेळा, शाळा-महाविद्यालयं आणि बाजारपेठांच्या परिसरात नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे वाहनांचं नुकसान होत असून नागरिकांच्या आर्थिक भारातही वाढ होत असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे. विशेषतः अंबड, सातपूर, इंदिरानगर, सिडको, पंचवटी, मखमलाबाद, गंगापूर रोड, नाशिक रोड तसेच शहरालगतच्या नव्या विकसित होणाऱ्या भागांमध्ये रस्त्यांची अवस्था चिंताजनक बनल्याच्या तक्रारी सातत्यानं पुढं येत आहेत. अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचत असल्यानं डासांची उत्पत्ती वाढून आरोग्याच्या समस्याही निर्माण होण्याची शक्यता आहे," असं खासदार वाजे यांनी म्हटलं आहे.
रस्त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह : खासदार वाजे यांनी रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामांबाबतही चिंता व्यक्त केली आहे. "काही ठिकाणी नुकतेच करण्यात आलेले रस्ते पावसाच्या पहिल्याच सरीत उखडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. त्यामुळे संबंधित कामांची गुणवत्ता, देखरेख आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. करदात्यांच्या पैशातून करण्यात येणारी विकासकामं टिकाऊ आणि दर्जेदार असणं आवश्यक आहे. रस्ते तयार झाल्यानंतर अल्पावधीतच त्यांची दुरवस्था होत असेल, तर संबंधित यंत्रणा आणि ठेकेदारांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे," असं मत खासदार वाजे यांनी व्यक्त केलं आहे
महापालिकेकडं चार प्रमुख मागण्या :
- शहरातील सर्व खड्डेमय रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी.
- निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी
- मुख्य व अंतर्गत रस्त्यांच्या डागडुजीसाठी विशेष कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी
- शहराच्या विस्तार क्षेत्रात दीर्घकालीन आणि टिकाऊ रस्ते विकासासाठी स्वतंत्र नियोजन करावे.
शहर नांगरून ठेवलेल्या शेतासारखं झालं : "कुंभमेळ्याची कामं करताना नियोजनाचा अभाव, मंजुरी आणि निधीला झालेला उशीर, ठेकेदारांवर नसलेला वचक आणि घीसडघाई यामुळे शहराची ही विदारक अवस्था झाली आहे. तसेच मागील काही वर्षात कॉलनी रस्ते तसेच नव्यानं झालेल्या वस्त्यांमध्ये याकडं पूर्णतः दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे शहर नांगरून ठेवलेल्या शेतासारखं झालं आहे," असं खासदार राजाभाऊ वाजे यांनी म्हटलं
विलंब करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाईचा बडगा : "आगामी सिंहस्थ कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील रस्ते व पायाभूत सुविधांच्या कामांना गती देण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि नाशिक महानगरपालिकेनं कठोर भूमिका घेतली आहे. निर्धारित मुदतीत कामं पूर्ण न करणाऱ्या तसेच कामांच्या गुणवत्तेबाबत त्रुटी आढळलेल्या कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारांनी मनुष्यबळ, यंत्रसामग्री आणि आवश्यक साधनसामग्रीमध्ये तातडीनं वाढ करावी, असे निर्देश देण्यात आले. निर्धारित वेळापत्रक, गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या निकषांकडं दुर्लक्ष केल्यास संबंधितांवरील दंडात्मक कारवाई अधिक कठोर करण्यात येईल," असं महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा :

