मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारत दुर्घटना; 9 जणांची सुखरूप सुटका, आणखी 9 कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशी बचावकार्य सुरू आहे. एकूण 9 जणांची सुटका झाली आहे.

Published : July 9, 2026 at 10:28 AM IST
|Updated : July 9, 2026 at 11:40 AM IST
पुणे : पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी परिसरातील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात झालेल्या भीषण दुर्घटनेनंतर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. कचऱ्याचा प्रचंड ढिगारा इमारतीवर कोसळल्यानं इमारतीचा काही भाग ढासळला आहे. त्यामध्ये अनेक कर्मचारी अडकले आहेत. शोध मोहिमेमध्ये भावेश वाणी हे गंभीर अवस्थेत आढळून आले असून त्यांना पुढील वैद्यकीय तपासणीसाठी पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे.
दुर्घटनेनंतर तातडीने सुरू करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत आतापर्यंत 9 कर्मचाऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र, आणखी 9 कर्मचारी तळमजल्यात ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक तास उलटूनही त्यांच्याशी कोणताही संपर्क होत नसल्यानं बचाव पथकांसमोर मोठे आव्हान उभे ठाकलं आहे. अडकलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांच्या मदतीनं ढिगारा हटविण्याचं काम सुरू आहे.
घटनास्थळी एनडीआरएफ, लष्कर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशमन दल, पिंपरी-चिंचवड पोलीस तसेच इतर आपत्कालीन यंत्रणांची पथके संयुक्तपणे बचाव मोहिम राबवत आहेत. प्रत्येक हालचाल अत्यंत काळजीपूर्वक केली जात आहे. अडकलेल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा होऊ नये, याची खबरदारी घेतली जात आहे.

परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांची गर्दी रोखण्यासाठी घटनास्थळ सील करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्याचा सातत्यानं आढावा घेत आहेत. अतिरिक्त यंत्रसामग्री आणि मनुष्यबळही घटनास्थळी मागविण्यात आलं आहे.

तीन लोकांशी संपर्क झाला असून अग्निशामक दलाच्या जवानांकडून त्यांना चहा बिस्कीट देण्यात आलं आहे. त्यांना बाहेर काढता येत नाही. कारण बांधकाम त्यांच्या पायावर पडल असून त्यांना खूप दुखत आहे. सगळा मलबा काढण्यात येत आहे. अजून खाली जे लोक आहेत, त्यांच्याशी बोलणं सुरू आहे. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून कोणतीही जीवितहानी होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. जागा छोटी असल्यानं कोणतीही घटना घडू नये याची खबरदारी घेण्यात येत आहे-मंत्री गिरीश महाजन
दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. त्यांच्या सुरक्षित सुटकेसाठी प्रार्थना केली जात आहे. या दुर्घटनेचं नेमकं कारण काय आहे? याचा तपास सुरू असून प्राथमिक चौकशीनंतरच अधिकृत माहिती समोर येणार आहे. सध्या सर्वांचे लक्ष बचाव कार्याकडे लागलं आहे. उर्वरित 9 कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.


आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनीदेखील रात्री या घटनास्थळी भेट दिली होती. त्यांनीदेखील युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी ते म्हणाले की, "अतिशय दुर्दैवी ही घटना घडली आहे. अतिवृष्टीमुळे गेल्या 33 तासात या ठिकाणी जवळपास 600 मिलिमीटर एवढं पाऊस झाला आहे. मनात विचारही केला नसेल, एवढं पाणी या ठिकाणी आलं आहे. कचरा वाहून आला. याठिकाणी असलेली इमारत खाली पडली आहे. या इमारतीत 23 जण होते. जेव्हा इमारत कोसळली तेव्हा 5 जण तिसऱ्या मजल्यावर होते. ते तत्काळ बाहेर पडले. यानंतर अग्निशामक दल तसेच एनडीआरएफ आणि सैन्यदलाच्या जवानांकडून बचावकार्य करण्यात आलं".
हेही वाचा-

