ETV Bharat / state

अमरावतीत मान्सूनची दमदार एन्ट्री; शासकीय कार्यालयासह जिल्हा सामान्य रुग्णालय जलमय

अमरावती शहरात मान्सूनच्या पहिल्याच जोरदार पावसामुळं अनेक शासकीय कार्यालय आणि घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

Heavy Rainfall in Amravati
शासकीय कार्यालयात पावसाचे पाणी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 25, 2026 at 1:26 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

अमरावती : अमरावती शहरात बुधवारी सायंकाळी आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालं. मान्सूनच्या पहिल्याच दमदार सरींनी शहरातील अनेक भाग जलमय झालं आहे. शासकीय कार्यालये, जिल्हा सामान्य रुग्णालय, व्यावसायिक प्रतिष्ठान आणि घरांमध्ये पाणी शिरल्यानं मोठी तारांबळ उडाली. काही भागात वादळी वाऱ्यामुळं झाडही कोसळल्यानं‌ वाहतुकीवर परिणाम झाला.



जिल्हा परिषद मुख्यालयात शिरलं पाणी : मुसळधार पावसाचा फटका अमरावती जिल्हा परिषद मुख्यालयालाही बसला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयात थेट पावसाचे पाणी शिरल्यानं कार्यालय परिसराला अक्षरशः नदीचं स्वरूप आलंय. कार्यालय बंद होण्याच्यावेळी मुसळधार पाऊस कोसळल्यानं पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात कार्यालयात शिरलं. यामुळं कार्यालयातील महत्त्वाच्या शासकीय फाईल, संगणक तसेच इतर साहित्य पाण्याच्या संपर्कात आल्यानं मोठा नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान पावसामुळं वीज पुरवठा खंडित झाल्यानं कर्मचाऱ्यांना रात्री अंधारातच साचलेल्या पाण्यातून मार्ग काढत कार्यालयीन साहित्य सुरक्षित स्थळी ठेवण्यासाठी धावपळ करावी लागली.

अमरावतीत मान्सूनची दमदार एन्ट्री (ETV Bharat Reporter)



जिल्हा सामान्य रुग्णालयातही पाणी : जिल्हा सामान्य रुग्णालयातही पावसाचं पाणी शिरल्यानं रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची गैरसोय झाली. सिटीस्कॅन विभागासह अनेक वार्ड तसेच पोलीस चौकीपर्यंत पाणी तुंबलं. रुग्णालयातील अनेक वादांमध्ये पाणी शिरल्यानं प्रशासनाची चांगली धावपळ झाली. रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची यामुळं हाल झाले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नानंतर सुमारे दोन अडीच तासात साचलेलं पाणी बाहेर काढण्यात आलं.



घरांमध्ये शिरलं पावसाचं पाणी : शहरातील सखल भागांमध्ये पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला. गांधी चौक परिसर, श्री अंबादेवी मंदिर परिसर, रवी नगर, नमुना या भागात काही घरांमध्ये पाणी साचलं. गाडगे नगर परिसरातील पंचवटी चौक भागात देखील काही घरांमध्ये पाणी शिरलं. नाल्यांची वेळेवर सफाई न झाल्यामुळं पावसाच्या पाण्याचा निचरा मंदावल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याची नागरिकांकडून ओरड करण्यात आली.


दुकानं व प्रतिष्ठानचं नुकसान : सलग अडीच तीन तास कोसळलेल्या पावसामुळं शहरातील अनेक दुकान आणि व्यावसायिक प्रतिष्ठानमध्ये पाणी शिरलं. त्यामुळं व्यापाऱ्यांचा आर्थिक नुकसान झालं आहे. काही ठिकाणी माल भिजल्याच्या घटना समोर आल्या. बाजारपेठांमधील रस्ते पाण्याखाली गेल्यानंतर ग्राहक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय झाली.


झाड कोसळल्यानं वाहतूक ठप्प : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं शहरातील बियाणी चौक परिसरात मोठं झाड रस्त्यावर कोसलं. त्यामुळं विद्यापीठ मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांची मोठी लांब रांग मार्गावर लागली. चपराशी पुरा आणि कॅम्प परिसरात देखील झाडं कोसळली. रात्री उशिरापर्यंत महापालिका प्रशासनाच्या वतीनं रस्त्यावर उमळून पडलेली झाड कापून मार्ग सुरळीत करण्याचं काम सुरू होतं.


वीज पुरवठा खंडित झाल्यानं अडचण : मुसळधार पावसासोबत शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला. यामुळं रात्री शासकीय कार्यालयात पाण्यात तुंबलेल्या फाईल आणि संगणक यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली. अनेक भागात गुरुवारी सकाळपर्यंतदेखील वीज पुरवठा सुरळीत झाला नाही. वीज वितरण कंपनीच्यावतीनं वीज सेवा सुरळीत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.



आजही पावसाचा अंदाज : बुधवारी सायंकाळी आणि रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर गुरुवारी देखील आकाशात काळे ढग जमले आहेत. हवामान विभागाच्या वतीनं आजदेखील मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तविला आहे.

हेही वाचा -

  1. अरुणाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळं पूर आणि भूस्खलन, 5 जण बेपत्ता
  2. जागतिक तापमानवाढीच्या युगातील भारतीय मान्सून : संभाव्य 'सुपर अल निनो' पासूनचे घ्यायचे धडे आणि इशारे
  3. विदर्भात मान्सूनचे आगमन! मात्र, शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नका, कृषी विभागाचे आवाहन