नाशिक महापालिकेला तपोवनातील झाडे तोडण्यास मनाई करावी, मनसे नेत्याकडून हायकोर्टात याचिका
तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा आता थेट मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन पंडित यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय.


Published : December 17, 2025 at 8:14 AM IST
|Updated : December 17, 2025 at 9:14 AM IST
मुंबई - आगामी कुंभमेळ्यासाठी नाशिकमधील तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्यासाठी तिथल्या हजारो झाडांची कत्तल करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. या निर्णयाला स्थानिकंसह पर्यावरणवाद्यांकडून जोरदार विरोध करण्यात येतोय. अशा परिस्थितीत मनसे नेत्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या तपोवनातील वृक्षतोडीला आव्हान दिलं आहे.
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात मनसेची हायकोर्टात याचिका - तपोवनातील वृक्षतोडीविरोधात आता कायदेशीर लढा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सरसावली आहे. तपोवनातील वृक्षांची कत्तल करू नका, अशी मागणी करत मनसेच्या एक स्थानिक नेत्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय. ही याचिका मंगळवारी हायकोर्टात सादर करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण - नाशिकमध्ये येत्या वर्षात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देशभरातील साधुसंतांसह लाखो भक्तगण इथं जमा होतील. त्यांच्या व्यवस्थेसाठी तपोवनमध्ये एक भव्य साधुग्राम बनवलं जाणार आहे. मात्र, यासाठी इथल्या सुमारे दोन हजार झाडांची कत्तल केली जाणार आहे. त्याला स्थानिक लोकांसह अनेक पर्यावरणवाद्यांनी जोरदार विरोध दर्शवलाय. तपोवनात साधुग्राम आणि प्रदर्शनी केंद्र (माईस हब) उभारण्यासाठी प्रस्तावित वृक्षतोड आणि पुनर्रोपण याविरोधात आता मनसेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. नाशिक महापालिकेला तपोवनातील झाडे तोडण्यास मनाई करावी, अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आलीय. मनसेचे नाशिक शहर उपाध्यक्ष ॲड. नितीन पंडित यांनी याचिका दाखल केलीय. तपोवनातील झाडे तोडू नयेत. प्रस्तावित प्रदर्शनी केंद्राच्या प्रकल्पाला स्थगिती द्यावी अथवा तो रद्द करावा, अशा त्यांच्या याचिकेतील मागण्या आहेत.
अभिनेता सयाजी शिंदेंनीदेखील झाडे तोडण्यास केला विरोध- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधुग्राम उभारणीसाठी तपोवनातील वृक्षतोड करावी लागणार या भूमिकेवर नाशिक मनपा प्रशासन ठाम आहे. तपोवनातील एकही झाड तोडून देणार नाही, असा पवित्रा पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी आणि पालिका प्रशासन यांच्यात झालेली बैठक निष्फळ ठरली होती. अभिनेता सयाजी शिंदे यांनीदेखील तपोवनातील झाडे तोडण्याला कडाडून विरोध केला. त्यांनी २९ नोव्हेंबरला नाशिकमध्ये ईटीव्ही भारतशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली होती. ते म्हणाले होते, "तपोवनातील लहान झाडं तोडता कामा नये. साधू आले-गेले तरी काही फरक पडत नाही. झाडं गेली तर नाशिककरांचं नुकसान होईल. ही सगळी झाडं वाचली पाहिजेत. शासन आपलं आहे की, इंग्रजांचं राज्य आहे? आपला राष्ट्रीय वृक्ष वड आहे. पण, हा वृक्ष सर्वात जास्त भारत सरकारनेच तोडलाय. ही मोठी झाडं जास्त ऑक्सिजन देणारी असतात. वडाच्या झाडावर पाचशे सहाशे प्रजाती जगतात. आमच्या आईबापांवर हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही", असा इशारादेखील त्यांनी दिला.
हेही वाचा-

