ETV Bharat / state

ठाण्यात 4 लाख मतदार वाढले कसे? अविनाश जाधव यांचा प्रश्न, म्हणाले "आता मनसेचा हात हाच एक पर्याय"

ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रभाग समितीच्या मतदार याद्या शनिवारी प्राप्त झाल्या. या याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला.

AVINASH JADHAV ON ELECTION
ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक यादीत घोळ (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : November 22, 2025 at 8:34 PM IST

|

Updated : November 22, 2025 at 8:56 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : सत्ताधाऱ्यांना हाताशी घेऊन मतदार याद्या बनवल्या आहेत. निवडणूक यंत्रणा विकली आहे, असा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. शनिवारी ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रभाग समितीच्या मतदार याद्या प्राप्त झाल्या. या याद्यांमध्ये अनेक ठिकाणी बोगस नावं आढळली. अनेक प्रभागात मतदार वेगवेगळ्या प्रभागात समाविष्ट करण्यात आले. शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाचं नाव तीन प्रभागात समाविष्ट करण्यात आलय, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.

अविनाश जाधव यांचा आरोप : "निवडणूक यंत्रणा प्रत्यक्षात पाहणी करत नाही. घरोघरी यंत्रणा जात नाही. सत्ताधाऱ्यांना हाताशी घेऊन मतदार याद्या बनवल्या आहेत. ही निवडणूक यंत्रणा विकली आहे. मतदारांचं नाव आणि फोटो नाही. मतदार याद्या झोपेत बनवल्या का? माहिती (डाटा) आहे, तर याद्यांमध्ये मतदाराचे फोटो का नाहीत? चुकीच्या पद्धतीनं याद्या बनवल्या आहेत. 16 लाख मतदार होते. साडेचार लाख मतदार कुठून वाढले? एका शहरात एवढी लोकसंख्या नाही, तर ही नावं वाढली कशी?" असा आरोप अविनाश जाधव यांनी केला.

प्रतिक्रिया देताना सुधीर भगत आणि अविनाश जाधव (ETV Bharat Reporter)

पालिका निवडणूक आयोगाची येत्या सोमवारी धिंड काढणार : आक्षेपार्ह याद्यांसंदर्भात मनसे नेते अविनाश जाधव ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक विभागाच्या कार्यालयात जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी महानगरपालिका निवडणूक अधिकारी कार्यालयीन वेळेत खासगी कार्यक्रमला गेले होते. हे समजातच मनसे कार्यकर्ते संतप्त झाले. आगामी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी पालिकेच्या निवडणूक विभागानं तयारी सुरू केली आहे. या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेबरोबरच आरक्षण सोडत प्रक्रिया पालिका निवडणूक विभागानं उरकली असून त्यापाठोपाठ प्रारुप मतदार याद्याही जाहीर केल्या आहेत. या याद्यांनुसार, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदारांच्या संख्येत 4 लाख 21 हजारांनी वाढ झाली आहे. प्रत्येक प्रभागातील मतदार संख्येत दहा हजाराहून अधिक वाढ झाल्याची माहिती पुढं आली आहे.

अविनाश जाधवांनी नोंदवला आक्षेप : "ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूक कार्यालयामध्ये विविध पक्षाचे प्रतिनिधी, इच्छुक उमेदवार याद्या घेण्यासाठी जात आहेत. त्यांच्याकडं पुरेशा प्रमाणामध्ये छापील याद्या उपलब्ध नाहीत. ते नावं नोंदवून त्यांना एक-दोन दिवसाची मुदत देत आहेत. जर याद्यांचं वाटपच झालं नसेल तर इतकी तोकडी मुदत ही हरकत आणि सूचना घेण्यासाठी पुरेशी आहे का?" असा आक्षेप अविनाश जाधव यांनी नोंदवला.

प्रभागात वाढली मतदारांची संख्या : "मंजूर नकाशातील मतदार संख्या आणि मतदार यादीमध्ये काही हजारांची तफावत आहे. ही देखील गंभीर बाब समोर आली आहे. हे एका प्रभागाचं निरीक्षण आहे. ठाणे महानगरपालिकेत एकूण 33 प्रभाग आहेत. नकाशामध्ये दाखवलेल्या सीमारेषेच्या बाहेरील देखील इमारती आणि मतदारांची नोंदणी मतदार यादीत केली आहे. एकूण मतदार संख्या अंदाजे 16 लाख 49 हजार एवढी आहे. त्यामध्ये साधारण चार लाखाच्या आसपास वाढीव मतदान आहेत. याचा अर्थ सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रभागांमध्ये वीस पंचवीस हजार किंवा 25 टक्के मतदार संख्या वाढली आहे," असं अविनाश जाधव यांनी सांगितलं.

अधिकाऱ्यांना जाब विचारणार : "या सगळ्याचा विचार करता निवडणूक आयोग पूर्णपणे पक्षपाती भूमिका घेत असल्याचं दिसून येतं असा आरोप त्यांनी केला आहे. सर्व प्रशासन त्यांना अनुकूल अशी भूमिका घेत आहे. या गोष्टीलाच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्षेप घेत आहे. सोमवारी महानगरपालिका मुख्यालयामध्ये याचा जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी जाणार आहेत. या गोंधळाला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारणार आहेत," असा इशारा अविनाथ जाधव यांनी दिला आहे

कोर्टात जाऊन काही होणार नाही : "निवडणूक आयोगाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. निवडणूक नीट व्हावी. अधिकारी घरी बसून काम करत आहेत. आम्हाला आक्षेपासाठी फक्त 7 दिवस देत आहेत. आम्ही किती नावांचे अर्ज करणार, आम्ही हेच करायचं का? कशा पद्धतीनं आम्ही दुबार नावे शोधावीत? मुंब्र्यातील प्रभाग क्रमांक 31 चे शिवसेना (उबाठा) तब्बल तीन टर्म असलेले माजी नगरसेवक सुधीर भगत यांचं नाव मतदार यादीतून वगळलं आहे. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक पांडुरंग पाटील यांचं नाव तीन ठिकाणी आलं आहे. आता मनसेचा हात हाच एक पर्याय आहे. कोर्टात जाऊन काही होणार नाही," अशी संतप्त प्रतिक्रिया अविनाश जाधव यांनी यावेळी दिली.

हेही वाचा :

  1. सत्तेत राहणं, या अपरिहार्यतेमुळं एकनाथ शिंदेंचा कडेलोट होणार? राजकीय विश्लेषकांचं मत काय?
  2. ठाण्यात क्रिकेटच्या विकासासाठी एमसीए सर्वतोपरी मदत करणार - अजिंक्य नाईक
  3. देशात सर्वाधिक अपघात होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये छ. संभाजीनगर जिल्ह्याचा समावेश; दुर्घटना कमी करण्यासाठी AIचा होणार वापर
Last Updated : November 22, 2025 at 8:56 PM IST