मरिन ड्राईव्हनंतर बारामती पोलिसांकडूनही एफआयआर नाही; रोहित पवार म्हणाले,'पोलिसांचे चेहरे पाहूनही दबाव जाणवतो'
मरिन ड्राईव्हनंतर बारामती पोलिसांनीदेखील एफआयआर दाखल करायला टाळाटाळ केल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला. ते बारामतीत माध्यमांशी बोलत होते.

Published : February 26, 2026 at 4:07 PM IST
बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी बारामतीत आक्रमक भूमिका घेतली. डीजीसीएच्या अहवालातून विमानातील त्रुटी आणि निष्काळजीपणा स्पष्ट होत असल्याचा दावा करत व्हीएसआर कंपनीसह संबंधित अधिकारी आणि संस्थांवर एफआयआर दाखल करण्याची त्यांनी मागणी केली.
बारामतीतील शंभरहून अधिक वकील आमदार रोहित पवार यांच्या समर्थनार्थ पोलीस ठाण्यात दाखल झाले. तर अनेक कार्यकर्ते आणि ‘अजित दादा’ प्रेमींनी पोलीस स्टेशनच्या प्रवेशद्वारात बसून आंदोलन केले.
गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ - पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार म्हणाले, "डीजीसीएचा फेब्रुवारी महिन्यातील अहवाल समोर आल्यानंतर हा अपघात नसून घात असल्याची शंका अधिक बळावली आहे. अहवालात नॉन-कम्प्लायन्स आणि निष्काळजीपणाचा उल्लेख आहे. खराब विमान अजित पवारांना कोणी दिले, याची फौजदारी चौकशी व्हावी. यासाठी आम्ही एफआयआर दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आलो आहोत. मात्र, दोन तास चर्चा होऊनही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केला", असा त्यांनी आरोप केला.
कायद्यानुसार कुठेही ‘झिरो एफआयआर’ दाखल करता येतो. मुंबईत प्रयत्न करूनही एफआयआर स्वीकारला गेला नाही. त्यामुळे बारामतीत पुन्हा प्रयत्न केला जात आहे. एखाद्या मोठ्या नेत्याच्या मृत्यूनंतरही एफआयआर होत नसेल तर सामान्य नागरिकांचे काय? आमदार, अजित पवारांचे पुतणे, रोहित पवार
राजकारण करण्याचा हेतू नाही- डीजीसीएच्या अहवालानंतर संबंधित लेअर जेट विमाने ग्राउंड करण्यात आली आहेत. संबंधित कंपनी, विमानाची स्थिती योग्य असल्याचे सांगणारे अधिकारी, दृश्यमानता तपासणाऱ्या संस्था आणि दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्याची आमदार रोहित पवार यांनी मागणी केली. व्हॉट्सअॅप चॅटमधूनही अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणाचे संकेत मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.या प्रकरणात काही अधिकाऱ्यांवर दबाव असल्याची शंका व्यक्त करत रोहित पवार म्हणाले, “पोलिसांचे चेहरे पाहूनही दबाव जाणवतो. कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहेत.” अजित पवारांना न्याय मिळावा, हीच आमची भूमिका आहे. यात राजकारण करण्याचा हेतू नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही न्यायासाठी लढा सुरू ठेवणार- AAIB ही केवळ तांत्रिक चौकशी करणारी संस्था असून गुन्हेगारी बाजू तपासत नाही. त्यामुळे एफआयआर आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितले. तसेच हवाई वाहतूक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी केली. या प्रकरणात केंद्र सरकारनंही दखल घ्यावी. संसदेत मुद्दा मांडला जाईल, असेही त्यांनी नमूद केले. पोलिसांनी एक ते दीड तास वेळ मागितल्याचं सांगत रोहित पवार यांनी सीआयडी कार्यालयात जाऊन तपासाची माहिती घेणार असल्याचं जाहीर केले. ब्लॅक बॉक्स संदर्भात स्वतंत्र पत्रकार परिषद घेणार असल्याचही त्यांनी सांगितलं. “अजित दादांवर अन्याय झाला आहे. राज्यातील ११ कोटी जनता न्यायाची अपेक्षा करत आहे. आम्ही न्यायासाठी लढा सुरू ठेवणार,” असा इशाराही त्यांनी दिला.
सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या मृत्यूच्या तपासाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, " प्रकरणाचा योग्य दिशेनं तपास सुरू आहे. अनेक यंत्रणांच सहकार्य मिळत आहे. घात की अपघात याबाबत तपास सुरू आहे. तपासात काही तज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. तपासाच्या निष्कर्षानंतर पुढील कारवाया होतील. तपासाला कुठलीही मर्याद नसते, हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. भरपूर पुरावे गोळा केले आहेत. सर्व काही माहिती घेऊन निष्कर्ष काढणार आहोत. पुणे आणि नवी मुंबईचे पोलीस अधीक्षक तपास करणार आहेत. अनेक तपास संस्था असल्यानं वेळ लागणार आहे. AAIB चा अहवाल आल्यावर निष्कर्ष काढला जाईल. कोणी कट रचला होता का, याबाबतही तपास सुरू आहे. तपासात काही तज्ञांचा सल्ला घेतला जात आहे. 28 दिवसात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. तपासात घातपात आढळल्यास योग्य कलमाखाली गुन्हा दाखल करणार आहोत.
हेही वाचा- अजित पवार विमान अपघात प्रकरणी गुन्हे दाखल करा, बारामती पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
अजित पवारांच्या अपघाताची एसआयटीमार्फत न्यायालयीन देखरेखीखाली चौकशी करा, हायकोर्टात जनहित याचिका

