अजित पवार विमान अपघात प्रकरणी गुन्हे दाखल करा, बारामती पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक
अजित पवार विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी आमदार रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात दाखल झाले.

Published : February 26, 2026 at 11:25 AM IST
|Updated : February 26, 2026 at 12:03 PM IST
बारामती - अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी करण्यावरुन आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सखोल चौकशी व्हावी. व्हीएसआर कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी, यासाठी आमदार रोहित पवार आक्रमक झाले आहेत.
कार्यकर्ते पोलीस ठाण्यात - रोहित पवार यांनी बुधवारी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली, अशातच आज रोहित पवार बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आले. यावेळी अजित पवारांच्या अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

गुन्हे दाखल करण्याची मागणी - अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते बारामती येथील पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त पोलीस ठाणे परिसरात तैनात करण्यात आला होता.
तपासाला गती द्या - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून “ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याचा अधिकृत अहवाल आला आहे, त्यामुळं तपासाबाबत कोणतीही विसंगती निर्माण करू नये,” असा संयमित पण ठाम संदेश देण्यात आला. बारामती शहरातील शारदा प्रांगण येथील राष्ट्रवादी भवनमध्ये ज्येष्ठ माजी नगरसेवक किरण गुजर, नगराध्यक्ष सचिन सातव आणि तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद पार पडली.

राष्ट्रवादीची पत्रकार परिषद - पत्रकार परिषदेत किरण गुजर यांनी स्पष्ट केलं, "Directorate General of Civil Aviation (DGCA) आणि Aircraft Accident Investigation Bureau (AAIB) यांचा आलेला अहवाल महत्त्वाचा असून, त्यानुसार ब्लॅक बॉक्स सुरक्षित आहे. सुरुवातीला ब्लॅक बॉक्स जळाल्याच्या चर्चेमुळे संभ्रम निर्माण झाला होता; मात्र आता अधिकृत अहवाल समोर आल्यानं तपासाच्या तांत्रिक प्रक्रियेला बळ मिळालं आहे." "आलेला अहवाल ग्राह्य धरायला हवा," असेही गुजर यांनी नमूद केले.

तपासाबाबत संभ्रम किंवा विसंगती निर्माण होऊ नये - अजित पवार विमान अपघात तपासाला गती द्यावी, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि आवश्यक असल्यास सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. पक्षाच्या वतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल आणि पार्थ पवार यांनी आधीच सीबीआय चौकशीची मागणी केली असल्याचे गुजर यांनी सांगितलं. “आमचीही मागणी रोहित पवारांसारखीच आहे,” असे सांगत किरण गुजर यांनी स्पष्ट केले की, दोषींवर गुन्हा दाखल व्हावा हीच पक्षाची भूमिका आहे. मात्र, तपास स्वतंत्र यंत्रणेमार्फत होत असल्याने तांत्रिक बाबींची सखोल छाननी आवश्यक असते. कोणत्याही अहवालाला विलंब होणे हे आपल्या हातात नसते. त्यामुळे तपास प्रक्रियेबाबत संभ्रम किंवा विसंगती निर्माण होऊ नये.
हेही वाचा -

